विरोधकांनो, पोटदुखी थांबवा हो! मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची अनलॉक्ड मुलाखत

0
434

विरोधकांनो, पोटदुखी थांबवा हो! मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची अनलॉक्ड मुलाखत

कोरोनाचे संकट हे जागतिक संकट आहे. तिसरे महायुद्ध समजा…मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

संपूर्ण जग, देश आणि महाराष्ट्र कोरोनाशी झुंज देत आहे. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हे ‘रण’ सुरू असतानाच ‘सामना’ला मुलाखत दिली. मुख्यमंत्र्यांनी ‘कोरोना’ युद्धाची सविस्तर माहिती जनतेसमोर मांडली. ‘कोरोनाचे संकट हे जागतिक संकट आहे. तिसरे महायुद्ध समजा. संपूर्ण जग विषाणूशी लढत आहे. गाफील राहून चालणार नाही. लोकांचे प्राण वाचवणे हेच महत्त्वाचे आहे!’

मुख्यमंत्री ठाकरे यांनी अत्यंत परखडपणे सांगितले, ‘‘लॉकडाऊन उठवा, हे उघडा आणि ते उघडा असे सांगणारे लोकांच्या जीविताची जबाबदारी घेणार आहेत काय? पुनश्च हरिओमचा अर्थ समजून घ्या.’’

अंतिम वर्षाच्या पदवी परीक्षांचा निर्णय घेतला आहे. परीक्षा होणार नाहीत. विरोधी पक्षाने राजकीय उत्सव साजरे करू नयेत. संकटाचे गांभीर्य ओळखून जबाबदारीने वागावे, असा दणकाही उद्धव ठाकरे यांनी दिला.

मुख्यमंत्र्यांची प्रदीर्घ मुलाखत ‘अन्लॉक’ म्हणजे एकदम मोकळी झाली. आतापर्यंत फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधणारे मुख्यमंत्री ‘सामना’ मुलाखतीच्या माध्यमातून सर्व शंकांचे निरसन करण्यासाठी जनतेसमोर आले. मुलाखत अशी सुरू झाली…

आपण कसे आहात?

– बघा. तुमच्या समोर आहे.

हो, ते खरं आहे, पण खूप दिवसांनी म्हणा किंवा खूप महिन्यांनी आपला चेहरा या मुलाखतीच्या निमित्ताने जनतेनं स्वच्छ पाहिला. आपल्या चेहऱयाला मास्क नाहीय…

– बिल्कूल. माझा चेहरा स्वच्छच आहे आणि तुम्ही आताच फेसबुक लाइव्हचा उल्लेख केलात. तर या फेसबुक लाइव्हमध्येसुद्धा माझा फेस हा स्वच्छच होता.

आज खूप प्रसन्न दिसताय…

– अर्थात त्याचं कारण ही ‘सामना’ची मुलाखत आहे.

चेहऱयावर कोणताही तणाव नाहीय. फक्त थोडे डोक्यावरचे केस तेवढे गेलेले दिसताहेत. हा सहा महिन्यांतला परिणाम आहे का?

– एकतर पहिली गोष्ट अशी की, मगाशी आपण सांगितलंत की फेसबुकच्या माध्यमातून मी जनतेशी संवाद साधला म्हणा किंवा बौद्धिक घेतलं म्हणा किंवा काही म्हणा. त्याला काहीही म्हटलं तरी एक गोष्ट त्यातून स्पष्ट होते की, मी जनतेशी असलेलं माझं नातं तुटू दिलं नाही. जनतेशी माझा संबंध दुरावू दिला नाही. त्यांच्यासोबत मी म्हणजे महाराष्ट्र सरकार त्यांच्या खांद्याला खांदा लावून प्रत्येक संकटात, प्रत्येक पावलावर त्यांच्यासोबत आहे हे महत्त्वाचे.

विश्वासाचे नाते आहे हे…

– मला नक्कीच एका गोष्टीचा आनंद आहे की, जनता माझ्यावर म्हणजे अर्थातच महाराष्ट्र सरकारवर विश्वास ठेवते आहे. सरकारचं ऐकते आहे. सहकार्य करते आहे. त्यामुळे तुम्ही जे आता म्हणालात की, माझ्या चेहऱयावर ताणतणाव नाही. जनता सोबत असल्यावर कोणत्याही ताणतणावाची चिंता करण्याचं कारण नाहीय. आमच्यासोबत जनता आहे. जनतेचा विश्वास आहे. तो विश्वास माझ्यासाठी मोठं बळ देणारा आहे. तो विश्वास जोपर्यंत माझ्यासोबत आहे, हे बळ जोपर्यंत माझ्यासोबत आहे तोपर्यंत मला ताणतणावाची पर्वा करण्याची आवश्यकता नाही.

तेच म्हणतोय की, कोरोनासारखं इतकं मोठं संकट असताना जगातले अनेक नेते तणावाखाली दिसताहेत…

– थांबा. तुमच्या आधीच्या प्रश्नातलं एक उत्तर द्यायचं राहिलंय. तेही देतो. तुम्ही म्हणालात ना, की केस कमी झालेले दिसताहेत. त्याचं कारणही सांगतो. एकतर बऱयाच दिवसांनंतर कालच मी केस कापलेत. गेले तीन-चार महिने स्वतःच स्वतःचे केस थोडेफार कमी करत होतो.

हो, अनेकांनी हे राष्ट्रीय कार्य आपल्या घरी केले…

– आत्मनिर्भर!

पंतप्रधान मोदी यांचाही आत्मनिर्भर होण्याचा जो संदेश आहे…

– नाही. ते ठीक आहे, पण मी फक्त आत्मनिर्भर एवढेच म्हणतोय. तुम्ही भलते सलते अर्थ काढू नका.

ठीक आहे. बरेच दिवस आपण जनतेच्या आरोग्याची काळजी घेताय…

– हो. सतत घेतोय. आता आपल्याशी बोलतानाही माझ्या डोक्यात सतत तोच विचार सुरू आहे. जसजशी एक-एक माहिती माझ्याकडे येतेय तसतसं त्यावर काय उपाययोजना करायच्या हा विचार सुरू आहे.

कोरोनाच्या या कठीण काळात मी देशभरातल्या अनेक मुख्यमंत्र्यांच्या मुलाखती पाहिल्या, संवाद ऐकले, भाषणं ऐकली, पंतप्रधान मोदी यांचंही ऐकलं. किंबहुना तुम्ही जेव्हा बोलत असता तेव्हा ते ऐकताना सारखं असं वाटायचं की, जागतिक आरोग्य संघटनेलासुद्धा महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीच मार्गदर्शन करताहेत की काय! इतकं आपलं डॉक्टरी ज्ञान, वैद्यकीय ज्ञान आपल्या बोलण्यातून, आपल्या वागण्यातून दिसत होतं. हे डॉक्टरी ज्ञान आपल्याकडे आलं कुठून?

– याला असं काही नेमकं उत्तर नाही देता येणार. पण एक गोष्ट सांगतो, लहानपणी त्या काळात एक प्रश्न लहान मुलांना नेहमी विचारला जायचा की मोठा झाल्यावर तू कोण होणार? त्यावेळेला मुलं आपापली इच्छा व्यक्त करायची. अर्थात प्रत्येक जण त्या काळी दिलेल्या उत्तराप्रमाणे घडलाच असेल किंवा घडला नसेलही. परंतु माझ्यासाठी म्हणाल तर वैद्यकीय शास्त्र्ा हा अगदी त्या लहान वयापासूनच कुतूहलाचा आणि अभ्यासाचा विषय राहिलेला आहे. अगदी माझ्या मनात एक शक्यता त्या काळात अशीही डोकावत होती की, डॉक्टर व्हावं. अर्थात नाही झालो ते बरंच झालं.

अरे वा…!

– हो, पण डॉक्टर व्हावं म्हणून तसा प्रयत्न मी कधी केला नाही. पण मी मधल्या काळात होमिओपॅथीचा अभ्यास मात्र जरूर करत होतो.

जनतेचा आशीर्वाद आहे, आव्हानांची पर्वा नाही!

”मी असं कधी म्हणणार नाही की, मी लॉकडाऊन उठवतोय. नाही, अजिबात नाही, पण मी हळूहळू एकएक गोष्ट उघडी करत चाललोय आणि माझा प्रयत्न असा आहे की, एकदा उघडलेली गोष्ट परत बंद होता कामा नये. त्यामुळे नुसता आरोग्याचा विचार करून चालणार नाही, नुसता अर्थव्यवस्थेचा विचार करूनही चालणार नाही. जे केवळ आणि केवळ अर्थव्यवस्थेची चिंता करताहेत त्यांनी आरोग्याची चिंता थोडीफार तरी केली पाहिजे आणि जे केवळ आरोग्याची चिंता करताहेत, जे आजच्या घडीला सत्य आणि योग्य असले तरी त्यांनी थोडीफार आर्थिक चिंताही केली पाहिजे. या दोन्हीतलं तारतम्य ठेवावंच लागेल.”

आपल्या घराला परंपरा आहे. आपले आजोबा प्रबोधनकार ठाकरे असतील, आपले काका श्रीकांतजी ठाकरे असतील किंबहुना शिवसेनाप्रमुखांनाही त्यात रुची होती आणि ज्ञानही होतं…

– खरं आहे. या सगळय़ांना तर रुची होतीच, पण मलासुद्धा त्यात रस होता. आमच्याकडे अशा औषधांचा बॉक्सच असायचा. त्यात आता जे खूप वापरलं जातं ते आर्सेनिक आल्बम वगैरे अनेक औषधे असायची. कोणाला बरं नाही असं वाटलं तर घरच्या घरी उपचार केले जायचे. तेव्हा होमिओपॅथीचे डॉक्टर्सही आमच्याकडे यायचे. ऍलोपॅथी हा विषय त्या वेळी खूप दूर होता. तो काळ एकूणच वेगळा होता. आतासारखे सगळे उपद्व्यापी व्हायरस वगैरे नव्हते. त्या काळात असे त्रासदायक व्हायरस नव्हते. एक छान चांगलं आयुष्य होतं. त्या काळात मी होमिओपॅथीचा अभ्यास करत होतो. कळत नकळत ती जी आवड होती ती आजही थोडीफार जिवंत आहे.

ती आवड किंवा छंद आज उपयोगी पडतोय तर…

– तुमच्या लक्षात असेल, काही वर्षांपूर्वी बीडला ‘प्लेग’ आला होता. त्याही वेळेला मी शिवसेनेचं पथक पाठवलं होतं. डॉ. दीपक सावंत यांच्या नेतृत्वाखाली हे पथक तिकडे गेले. त्यांनी पाहणी केली. औषधं किती लागतील, कोणती लागतील, ती कुठून आणायची हे सगळं काम शिवसेनेने त्या वेळी केले. शिवाय मुंबईत मध्यंतरी पूर आला होता. तेव्हाही अशाच पद्धतीने शिवसेनेने काम केलं. हे थोडंसं मी एका तळमळीने करत असतो आणि आतासुद्धा हा एक विचित्र योगायोग आहे. पण ध्यानीमनी नसताना मुख्यमंत्री पदाची जबाबदारी खांद्यावर आली आणि तीसुद्धा अशा वेळी आली की, जागतिक आरोग्यविषयक आणीबाणीची स्थिती निर्माण झाली आहे. त्यातून आपण जातोय. असा हा कठीण काळ आहे. अशा काळात ही जबाबदारी माझ्या खांद्यावर आली. आली म्हटल्यानंतर कोणतेही संकट असो. त्याच्या खोलात जाणं हे फार महत्त्वाचं आहे.
तुम्ही तर खूपच खोलात गेलात आणि एवढा प्रचंड अभ्यास केलात…

– अर्थात, त्याच्याशिवाय तुम्ही निर्णय घेऊ शकत नाही. नेमकं एखाद्या विषयाचं मूळ तुम्हाला कळल्याशिवाय तुम्ही निर्णयाप्रत जाऊ शकत नाही. आज कोरोना या विषयावर तज्ञ असा कोणीच नाहीय. जो तो अनुभवातून शहाणपण येतं त्यानुसार वागतोय. हा अनुभवच आपल्याला शिकवतोय. त्यातून शहाणं व्हायचं की नाही हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. पण आपण तरी शहाणं होण्याचा प्रयत्न करतो आहोत.

जनतेला मार्गदर्शन करता करता कोरोनासोबत जगायला तुम्हीच शिकवलं आहे.

– सगळय़ांनीच शिकायला हवं. फेसबुकच्या माध्यमातून मी हेच सांगतोय. बराच काळ मी फेसबुक लाइव्ह केलेलं नाही. असं काही नाही की मी ते थांबवलंय. येत्या काही दिवसांत मी ते परत करेन. कारण, हे करत राहावंच लागेल. जोपर्यंत कोरोनासोबत जगणं आपण शिकत नाही आणि स्वीकारत नाही तोपर्यंत या काही गोष्टी आपल्याला अपरिहार्यपणे कराव्याच लागतील. उगाचच फिरणं, उगाचच गर्दी करणं या अनावश्यक गोष्टी टाळाव्या लागतील.

ठाकरे सरकार सुरू आहे…

– असं का म्हणायचं?

ठाकरे सरकार म्हटले पाहिजे, कारण जो नेतृत्व करतो त्याच्या नावानं सरकार ओळखलं जातं…

– ते ठीक आहे, पण मी नेतृत्व करतोय हा एक भाग झाला. परंतु महाविकास आघाडी म्हणून हे तीन पक्षांचं सरकार आहे. सोबत जे अपक्ष आहेत त्यांचं सरकार आहे आणि त्याहीपेक्षा महत्त्वाचं, ज्यांनी हा प्रयत्न स्वीकारला, या प्रयत्नाचं स्वागत केलं त्या मायबाप जनतेचं हे सरकार आहे.

त्या सरकारला सहा महिने झाले…

– सहा महिने होऊन गेले.

खरे म्हणजे एखाद्या सरकारला किंवा एखाद्याच्या मुख्यमंत्री पदाला एक महिना झाला तरी उत्सव साजरा करतात…

– (मंद हसत) सध्या उत्सवाला बंदीच आहे.

हो, बंदी आहे आणि राज्यात व देशात अशी अनेक उदाहरणं आहेत की, ज्यांना दोन-चार महिनेही पंतप्रधान पदी किंवा मुख्यमंत्री पदी राहता आलं नाही…

– म्हणजे आपल्याला काय म्हणायचे आहे नक्की.

आपला सहा महिन्यांचा काळ पूर्ण झाला. या सहा महिन्यांच्या काळाकडे तुम्ही कसं पाहता?

– फार विचित्र पद्धतीने गेला. आपण म्हणालात ती गोष्ट खरी आहे की, एक महिना झाला. सहा महिने झाले की हे सरकारचे वाढदिवस आतापर्यंत धूमधडाक्यात साजरे केले गेले. आता मला असं वाटतं विरोधी पक्षनेते पदाचे दिवसही धूमधडाक्यात साजरे केले जाताहेत.

अच्छा?

– असं दिसतंय एकूण, पण तुमच्या प्रश्नाचं उत्तर देतो. हे जे सहा महिने गेले ते विविध आव्हानं घेऊन आले होते. ही आव्हानं अजून संपलेली नाहीत. राजकीय आव्हानं ठीक आहेत. त्याची मला चिंता नाही. मी तुम्हाला सांगितलंच आहे की, जनतेचं बळ माझ्यासोबत आहे, जनतेचा आशीर्वाद माझ्यासोबत आहे तोपर्यंत मी या आव्हानाची पर्वा करत नाही. पण सुरुवातीच्याच काळात जसं कोरोनाचं हे संकट, ज्याचा आकार उकार अजूनही कुणाला उमगला नाहीय, किंबहुना नेमकेपण कोणी ओळखू शकले नाही असंही संकट आलं. एक गोष्ट लक्षात घ्या. आपत्ती नवीन नाही. आपत्त्या येत असतात, पण काही आपत्त्या कशा असतात की, एखाद्या ठिकाणी भयंकर पूर येतो किंवा भूकंप होतो. फार भयानक असतात या आपत्त्या! कधी त्सुनामी येते. एका क्षणात होत्याचं नव्हतं करून जाते.

कोरोनाचं संकट भयानक आहे…

– तेच सांगतोय. कदाचित असंही होतं की, असे कोरोनासारखं संकट येतं ज्याच्याबाबतीत आपण खबरदारी घेतली नाही तर झपाटय़ाने लोक आजारी पडतात आणि मृत्युमुखी पडतात, पण वादळासारखं संकट जसा ‘निसर्ग’ वादळाचा उल्लेख तुम्ही केलात. भूकंप येतो. हे एका क्षणात ज्याला आपण निमिषार्धात म्हणतो…होत्याचं नव्हतं करून टाकतात आणि त्यानंतर आपल्याला फार जिकिरीने जे लोक अशा संकटात अडकले असतील त्यांना सोडवण्याचं काम करावं लागतं. त्यांच्या पुनर्वसनाचे काम करावे लागते. परंतु त्या वेळेला हे संकट येऊन गेल्यानंतर कुठे काय नुकसान झालंय हे आपल्याला कळतं. जसं आताच ‘निसर्ग’ चक्रीवादळ आलं होतं. त्यावेळी सुदैवाने सुरुवातीपासून आपण काळजी घेतली म्हणून प्राणहानी कमी करू शकलो. अर्थात जेवढी हानी झाली तेवढीसुद्धा खरं तर होता कामा नये. पण हानी आपण कमीतकमी ठेवू शकलो. मर्यादित ठेवू शकलो. तिकडे विजेचे खांब उन्मळून पडले. झाडं, वृक्ष, बागांचे नुकसान झाले. घरांचं नुकसान झालं. शेतीचे नुकसान झाले. त्याची नुकसानभरपाई आपण आता करतो आहोत.

कधी संपणार ही संकटं?

– कोरोनाच्या संकटाबद्दल मला आधी एक सांगायचंय की, हे कोरोनाचं संकट ते अजूनही संपता संपत नाहीय. मी माझ्या एका फेसबुक लाइव्हमध्ये म्हटलंसुद्धा होतं की, ‘सरणार कधी रण…’ हे रण कधी सरणार हेच कळत नाही अजूनही.

तुम्ही याला रण मानताय…

– रणच आहे हे. रणकंदन आहे हे. मोठं जागतिक रण आहे हे. जसं मी मागेच म्हटलं होतं की, वर्ल्डवॉर आहे हे.

तिसरं महायुद्ध…

– वॉर अगेन्स्ट व्हायरस.

म्हणजे दोन महायुद्धं झाली. तसं हे तिसरं महायुद्ध…

– हे फार भयानक आहे. हे खरं विश्वयुद्ध आहे. कारण त्याने पूर्ण जग व्यापून टाकलंय. आजसुद्धा ज्यांनी घाईगर्दीने लॉकडाऊन उठवला किंवा सगळं काही संपलं असं समजून लॉकडाऊन उठवला, ते देश आता परत लॉकडाऊन करताहेत. ऑस्ट्रेलियाचं उदाहरण घ्या. तुम्ही ऐकलं असेल की, त्यांनी काही भागांत सैन्याला पाचारण केलं.

महाराष्ट्रात अशी वेळ आली होती का? तुम्हाला कधी वाटले का की सैन्याला पाचारण करावं?

– महाराष्ट्रात सैन्य बोलावण्याची कधीच वेळ आली नव्हती. मधे अशा पद्धतीच्या काही बातम्या आल्या होत्या त्या वेळेला मी असं म्हटलं होतं की, आपण मुंबईत फिल्ड हॉस्पिटल्स केलेत. कारण हे संकट म्हणजे साथ आहे. साथ म्हटल्यावर एका झटक्यात ती कितीजणांना कवेत घेईल सांगता येणार नाही. हे संकट आले तेव्हा सुरुवातीला तुम्हाला आठवत असेल, बेड्सची कमतरता होती, ऍम्बुलन्सेस नव्हत्या, औषधोपचार नव्हते, व्हेंटिलेटर नव्हते, ऑक्सिजन कॉन्सनट्रेटर नव्हते. या सगळय़ाची कमतरता का होती, कारण आपल्याकडे आतापर्यंत जी हॉस्पिटल्स आहेत तेवढीच हॉस्पिटल्स होती. विधानसभेचं अधिवेशन चालू असताना मार्चमध्ये काही रुग्ण सापडले. ती तीक्रता हळूहळू वाढत असल्याचे लक्षात येताच आपल्याला अधिवेशनसुद्धा एक आठवडा कमी करावं लागलं. त्या वेळी जेव्हा ब्रिफिंग झालं त्या वेळी परिस्थिती किती गंभीर आहे हे मला सांगण्यात आलं. त्याच वेळी मी सांगितलं होतं की, आपल्याला युद्धपातळीवर फिल्ड हॉस्पिटल्स उभी करावी लागतील. त्या वेळेला जर गरज लागली तर मिलिट्रीच्या तंत्रज्ञानाचा उपयोग करून घ्या. ते पटकन अशा पद्धतीने हॉस्पिटल उभं करू शकतात. पण याही बाबतीत आपल्याला लष्कराची मदत लागली नाही. आपण इथल्या इथेही हॉस्पिटल्स उभी केली. मला आपल्या प्रशासनाचा अभिमान आहे की, आपण त्यांना जे काही सांगू त्यानुसार ते तत्परतेने काम करताहेत. म्हणूनच चीनने पंधरा दिवसांत इन्फेक्शन हॉस्पिटल उभं केलं. आपणही पंधरा ते वीस दिवसांत अशी हॉस्पिटल्स उभी केली. आता आपण या हॉस्पिटलमधल्या सुविधा वाढवतोय.

आपण आताच प्रशासनाचा उल्लेख केला की, प्रशासन उत्तम काम करतंय. या काळात सहा महिन्यांत आपण मंत्रालयात कमीत कमी वेळा गेलात असा आपल्यावर आरोप होतोय…

– ठीक आहे ना. पण मंत्रालय आता बंद आहे हे लक्षात घ्या. मंत्रालयात कमीतकमी गेलो असा जो आरोप होतोय त्यात काही दम नाही. मी माझी भूमिका विस्ताराने सांगतो. आता तंत्रज्ञान एवढं प्रगत झालेलं आहे. त्या तंत्रज्ञानाचा तुम्ही उपयोग करू शकणार नसाल तर तुमच्यासारखे दुर्भागी तुम्हीच. आता तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आपण कितीतरी काम करतोय. जसं आता आपली ही मुलाखत संपल्यानंतर मी घरी जाऊनच अर्थात घरी जाऊन हे मी मुद्दामहून सांगतो. तर घरी जाऊन माझ्या मुंबई महापालिकेचे आयुक्त आहेत त्यांच्याशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा करणार आहे. नुसते आयुक्तच नाहीत, तर सहआयुक्तही या बैठकीला असतील. हे रोजच चाललंय. मध्यंतरी मी मराठवाडय़ातील सर्व आमदारांशी चर्चा केली. शिवसेनेच्या जिल्हाप्रमुखांची बैठक झाली, परवा विदर्भातील तिन्ही पक्षांच्या आमदारांची व्हिडीओ कॉन्फरन्सिंग झाली. म्हणजे मी घरात बसून सगळीकडे जाऊ शकतो. हा तंत्रज्ञानाचा फायदा आहे. एकाच वेळी संपूर्ण राज्य कव्हर करतोय आणि मुख्य म्हणजे ताबडतोब निर्णय घेतोय.

तंत्रज्ञानाचा तुम्ही चांगलाच उपयोग करून घेताय…

– फिरणं आवश्यक आहे. मी नाही म्हणत नाहीय. पण जेव्हा तुम्ही फिरता तेव्हा तुम्हाला मर्यादा येतात. तुम्ही एकाच ठिकाणी जाता, पण तुम्ही व्हिडीओ कॉन्फरन्सिंगचा उपयोग करता तेव्हा तुम्ही सगळीकडे जाता.

प्रवासाचा वेळ वाचतो…

– नक्कीच. प्रवासाचा वेळ वाचतो.

शिवाय यंत्रणेवरचा ताणही कमी होतो…

– बरोबर आहे. माझ्यावर आरोप करताहेत त्यांना माझा सवाल आहे, मग तुम्ही विमानाने कशाला जाता? बैलगाडीतून का जात नाही? बैलगाडीतून जा, पायी जा. तंत्रज्ञानाचा उपयोग करणार नसाल तर मग त्या तंत्रज्ञानाचा शोध लावता कशाला?

तुम्ही अधिकाऱयांशी संवाद साधू शकता, पण जनतेशी संवाद कमी होतोय असा विरोधकांचा आक्षेप आहे…

– सध्या तर आपली परिस्थिती लॉकडाऊनचीच आहे. सभा समारंभांना तर बंदीच आहे. जनतेला सभेसाठी बोलवणं म्हणजे आपला नियम आपणच तोडणं आहे.

बरोबर आहे…

– आणि परत आपण आता मुलाखतीसाठी इथे जसे सुरक्षित अंतरावर बसलेले आहोत, तसं शक्य होणार आहे का? मी मुख्यमंत्री आहे. त्यामुळे माझी सुरक्षा यंत्रणा आहे. माझ्या आजूबाजूला म्हणा किंवा जवळ कुणी येणार नाही, पण माझ्यासमोर माझी जनता बसेल तिचं काय? ती दाटीवाटीनं बसली तर काय? मी संवाद साधेन, पण जनता जर आजारी पडली तर त्या संवादाचा उपयोग काय?

म्हणजे तुम्ही नियमांचं पालन करताय?

– नियमांचं पालन जर मी नाही केलं तर जनता का करेल. मी जर नियमांचं पालन केलं नाही तर ते म्हणतील की, लोकां सांगे ब्रह्मज्ञान, आपण कोरडे पाषाण.

हे जे कोरोनाचं विश्वयुद्ध आपण म्हणताय, आपले पंतप्रधान मोदी यांनी सुरुवातीला सांगितलं होतं की, हे महाभारताचं युद्ध आहे. महाभारताचं युद्ध चौदा दिवस चाललं आणि कोरोनाचं युद्ध आपण 21 दिवसांत संपवू, पण हे युद्ध एकवीस दिवसांत संपले नाही. किंबहुना ते वाढत चालले आहे.

– जोपर्यंत आपण कोरोनासोबत जगणं स्वीकारत नाही तोपर्यंत परिस्थिती अवघडच असेल. अर्थात आता लोकांनी हे स्वीकारायला सुरुवात केली आहे. महत्त्वाचा मुद्दा म्हणजे बघा, आता आपण अंतर ठेवून बसलोच नाही तर लोक पुन्हा यावरही टीका करतील की, तुम्ही नियमांचं पालन करताय असं म्हणताय, पण आता तुमच्या तोंडावर मास्क नाहीय. पण एक लक्षात घ्या, आपण जिथे मुलाखत घेतोय तिथे आपल्या आजूबाजूला कोणी नाहीय. आपल्यात सुद्धा अंतर आहे आणि मोठी मोकळी अशी ही जागा आहे. अन्यथा आपण बंद खोलीत पूर्वी मुलाखती घेत असू. म्हणून मी सांगतो, तुम्ही सार्वजनिक ठिकाणी गर्दी करत नाही, तोंडावर मास्क लावून फिरताय. तोंडाला हात लावत नाही. हात सतत धुताय. तोपर्यंत काळजीचं कारण नाही. मी म्हणतो ते हे कोरोनासोबत जगणं आहे. एखाद्यावेळी अनवधानाने माझ्याकडूनही चूक होऊ शकते. एखादा नियम मोडला जाऊ शकतो. पण तेव्हा तुम्ही मला सांगायचं की, जरा प्लीज असं करू नका. हे जे आहे ना, त्यालाच मी कोरोनासोबत जगणं म्हणतोय

सध्याच्या या काळाला आपण युद्ध म्हणताय, तर युद्ध म्हटल्यावर आपण क्षेपणास्त्र्ा आणतो, रणगाडे आणतो, बंदुकांचा दारूगोळा आणतो, सैन्यभरती करतो… ही युद्धाची आयुधे आहेत. आपण जेव्हा कोरोनाविरुद्ध महाराष्ट्रात युद्ध सुरू केलं तेव्हा आपण मोठय़ा प्रमाणात आयसीयू, व्हेंटिलेटर्स, बेड, औषधांचा साठा केला. हे आरोग्यविषयक युद्ध आहे. पण इतक्या मोठय़ा प्रमाणात इफ्रास्ट्रक्चर उभं करूनसुद्धा लोकांच्या सातत्याने तक्रारी वाढत आहेत…

– नाही. आता नाहीयत तक्रारी.

कोविड सेंटरमध्ये बेड नाही ही तर तक्रार मोठय़ा प्रमाणावर केली जातेय किंवा गेल्यावर आम्हाला उपचार मिळत नाहीयत, अशाप्रकारच्या तक्रारीसुद्धा येताहेत. इतकं काम करूनही अशा तक्रारी येतात तेव्हा मुख्यमंत्री म्हणून तुम्हाला काय वाटतं?

– संपूर्ण यंत्रणाच हे युद्ध लढतेय. मला काम करायचंय आणि जनतेला वाचवायचंय. तुम्ही ज्या तक्रारी मांडल्या ती स्थिती मुंबईत सुरुवातीला होती हे प्रामाणिकपणे आपण कबूल केले पाहिजे. या ‘व्हायरस’चा प्रसार आणि आपल्याकडच्या सुविधा याचं प्रमाण विषम होतं. आता मुंबईत आपण वैद्यकीय सुविधा वाढवतोय. परंतु हा व्हायरस ग्रामीण भागात पसरू लागला आहे. इतर शहरांत पसरतोय. त्या शहरांमध्ये आणि ग्रामीण भागात जिथे मुंबईप्रमाणे वैद्यकीय सुविधा आपण उपलब्ध करू शकलो नाही किंवा अशा सुविधा उपलब्ध करून देण्याचं काम सुरू आहे तिथे या तक्रारी थोडय़ाफार प्रमाणात राहणार. त्यासाठी सर्व जिल्हाधिकाऱयांना माझ्या सूचना आहेत की, जिथे जिथे अशा सुविधांची गरज असेल तिथे तत्काळ या सुविधा निर्माण करा. सध्या पावसाचे दिवस आहेत. त्यामुळे कामाच्या वेगावर नाही म्हटले तरी थोडा परिणाम होणारच. मुंबईत आपण जेव्हा या सुविधा उपलब्ध केल्या तेव्हा पावसाळा नव्हता. त्यामुळे कोणत्याही अडचणींविना आपण त्या तयार करू शकलो.

बीकेसीत आपण मोठं रुग्णालय सुरू केलं…

– गोरेगावच्या नेस्कोचं रुग्णालय तर त्याहून मोठं आहे. त्यानंतर वरळीला डोममध्ये हॉस्पिटल आहे. आता रेसकोर्सलाही असे रुग्णालय करतोय. मुलुंड चेकनाका, दहिसर चेकनाका आहे. या ठिकाणी अशा वैद्यकीय सुविधा आपण का उभ्या करू शकलो, कारण तेव्हा पाऊस नव्हता. त्याचा फायदा आपण घेतला. मुंबईत या साथीची सुरुवात आधी झाली होती. त्यामुळे पावसाळय़ाआधीच आपण हे काम करू शकलो. आता काय होतंय की, गावात किंवा इतर शहरांत पाऊस सुरू झालाय. त्यामुळे अशी मैदाने तुम्हाला मिळणार नाहीत. या मैदानातसुद्धा आपण नुसते तंबू नाही टाकलेत. तिथेसुद्धा टॉयलेटची सोय कायमस्वरूपी केलीय. त्यासाठी सिवरेज लाइन, पाण्याची लाइनही टाकून घेतली. म्हणजे कुठेही नंतर त्रास होता कामा नये याची काळजी घेऊन या सुविधा निर्माण केल्या. आता गावागावांत किंबहुना इतर शहरांत मोठे हॉल किंवा काही ठिकाणी मोठे गोडाऊन जे कव्हर्ड आहेत अशा ठिकाणी आपल्याला या सुविधा निर्माण कराव्या लागतील किंवा काही ठिकाणी आपण शाळा, कॉलेजेस, हॉस्टेल्स हे आपण क्वारंटाईन सेंटरसाठी ताब्यात घेणार आहोत. त्यावेळी ताबडतोब पर्याय  उपलब्ध नव्हते. त्यामुळे हा निर्णय आपण घेतला.

हे इतकं करूनसुद्धा देशात रुग्ण वाढताहेत. दहा लाखांच्या वर देशात रुग्णसंख्या आहे. कदाचित त्यापेक्षा जास्त आकडाही असू शकेल. महाराष्ट्राचा आकडा तीन लाखांवर गेलाय…

– तीन लाख एकूण. म्हणजे पहिला रुग्ण जो बरा होऊन घरी गेला आहे त्यालासुद्धा त्यात पकडलं जातंय.

मुंबईत एक लाख रुग्ण आहेत… म्हणजे जे बरे होऊन घरी गेलेत ती फिगर दिली जात नाहीय…
अर्थात, जे बरे झाले आहेत त्यांचा आकडा यात धरता कामा नये ना. तुम्ही तुमच्या महाराष्ट्राला मुख्यमंत्री आणि देशाला पंतप्रधान किती असे विचारता का? मग नेहरूंपासून पंतप्रधान धरणार का? महाराष्ट्रातसुद्धा यशवंतरावांपासून मुख्यमंत्री धरणार का? असे सगळे मुख्यमंत्री किंवा पंतप्रधान एकत्रित धरत नाहीत. आता किती पंतप्रधान… एक! आता किती मुख्यमंत्री… एक! आतापर्यंत कोणकोण होऊन गेले, तर मग ती आधीची सगळी नावे येतील. पण आता कोण? तर एकच नाव यायला हवं.

म्हणजे आता आकडा कमी होतोय…

– कमीच आहे. अर्थात अगदीच कमी झालाय असेही मी म्हणणार नाही. कारण काही ठिकाणी संसर्ग वाढतोय. आकडा वाढतोय. तो थोडा वाढणार, पण लवकरात लवकर तो रुग्ण ओळखून त्याला बरं करणं हे महत्त्वाचे. किंबहुना एखाद्याला तशीच काही लक्षणं आढळली तर त्याने स्वतःहून पुढे आले पाहिजे. उपचार करून घेतला पाहिजे. मृत्युदर कमी ठेवणं हे उद्दिष्ट आहे. औषध नसतानाही आपण हे प्रयत्न करतोय. जी काही औषधं आता उपलब्ध आहेत त्यानुसार उपचार करून मृत्यूचे प्रमाण कमी ठेवणं हे आता आपल्यापुढचं मोठं आव्हान आहे.

मुंबई नियंत्रणात येतेय…

– मी त्याबद्दल काही इतक्यातच बोलणार नाही. मला घाईघाईने काही स्टेटमेंट द्यायचं नाहीय.

मुंबईत आकडा कमी होतोय, हे खरं आहे ना?

– आहे, पण इतक्यातच आपण जर असा समज करून घेतला तर आपण गाफील राहू. त्याचीच मला काळजी वाटते. त्यामुळे कृपा करून तुम्ही त्या आकडय़ांकडे लक्ष देऊ नका.

पण मुंबईच्या जवळची जी शहरे आहेत… कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ किंवा पुणे, पिंपरी-चिंचवड हे भाग जास्त कोरोनाने संक्रमित झालेले आहेत आणि सगळय़ांना ती चिंतेची बाब वाटतेय. कारण एकतर या दाटीवाटीच्या जागा आहेत. नोकरीधंद्याच्या जागा आहेत. औद्योगिक वसाहती आहेत आणि आता पुणे-पिंपरी, चिंचवडला परत लॉकडाऊन करावा लागला. नवी मुंबईतसुद्धा संकट वाढतंय. चंद्रपूरसारख्या ठिकाणीसुद्धा रुग्ण वाढताहेत. नागपूरचं चित्र वाईट आहे. ही परत परत लॉकडाऊन करण्याची वेळ का आली?

– सांगतो, ही वेळ केवळ आपल्यावरच आलेली नाहीय. हे जागतिक संकट आहे हेच कटू सत्य आहे. या संकटाबद्दल नेमकेपणाने बोलणारे किंवा सल्ला देणारे जगात कोणी नाहीय. एका बाजूला लॉकडाऊन केला पाहिजे का? तर त्याला विरोध करणारे अनेक शहाणे आहेत. लॉकडाऊनने काय साधलं, लॉकडाऊन म्हणजे उपचार आहे का? लॉकडाऊनने आर्थिक संकट येतं, अशी हाकाटी केली जाते. लॉकडाऊनने अर्थव्यवस्थेवर संकट येतं. ठीक आहे बाबा. माझं त्यांना हेच सांगणे आहे, आम्ही तुम्हाला लॉकडाऊन उघडून देतो, पण मग इथे लोक मृत्युमुखी पडले तर तुम्ही जबाबदारी घेणार का? आज जे दार उघडा म्हणून सरकारच्या दारी येऊन बसलेत, टाहो फोडताहेत त्यांच्यासाठी दारे उघडायला हरकत नाहीय. पण दारं उघडल्यानंतर तुम्ही जबाबदारी घेणार आहात का? अर्थव्यवस्थेवरच्या संकटाची जाणीव आम्हालाही आहे.

सध्या ई-लर्निंग हाच पर्याय!

”कोण काय म्हणतंय, काय करतंय इकडे लक्ष देत नाही. मी पुनः पुन्हा सांगतोय, मी माझ्या कामाशी प्रामाणिक आहे. माझ्यावर माझ्या जनतेचा विश्वास आहे तोपर्यंत काही चिंता नाही. यांचं ठीक आहे. हे बोलतील. बोलत राहतील. कदाचित त्यांची पोटदुखी अशी असेलही की, कुठेही न जाता, न फिरता एका संस्थेने देशातल्या सर्वोत्तम मुख्यमंत्र्यांमध्ये महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची निवड केली. हीसुद्धा पोटदुखी असू शकेल. कारण कोरोनाची लक्षणं वेगवेगळी आहेत.”

मग सरकार म्हणून आपण काही पावलं उचलतो आहोत का?

– माझं मत असे आहे की, आपण आता लॉकडाऊन शब्द वापरूया नको. मी असं कधी म्हणणार नाही की, मी लॉकडाऊन उठवतोय. नाही, अजिबात नाही, पण मी हळूहळू एकएक गोष्ट उघडी करत चाललोय आणि माझा प्रयत्न असा आहे की, एकदा उघडलेली गोष्ट परत बंद होता कामा नये. त्यामुळे नुसता आरोग्याचा विचार करून चालणार नाही, नुसता अर्थव्यवस्थेचा विचार करूनही चालणार नाही. जे केवळ आणि केवळ अर्थव्यवस्थेची चिंता करताहेत त्यांनी आरोग्याची चिंता थोडीफार तरी केली पाहिजे आणि जे केवळ आरोग्याची चिंता करताहेत, जे आजच्या घडीला सत्य आणि योग्य असले तरी त्यांनी थोडीफार आर्थिक चिंताही केली पाहिजे. या दोन्हीतलं तारतम्य ठेवावंच लागेल.

म्हणजे ही एक प्रकारे तारेवरची कसरतच आहे?

– ही तारेवरची कसरत आहेच. कोरोनाबरोबर जगायला शिकायचं म्हणजे ही तारेवरची कसरत करायला शिकले पाहिजे आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा, मुंबईच्या आसपासच्या परिसरात थोडा प्रादुर्भाव वाढतोय. या व्हायरसच्या वागणुकीचा तुम्ही आलेख बघितलात तर तुमच्या लक्षात येईल की, हा व्हायरस गुणाकार करत जातोय आणि जिथे सुरुवात होते तिथे आधी तो पीकवर जातो, शिखरावर जातो आणि मग तो फ्लॅट होऊन कमी होतो. जिथे उशिरा लागण होते त्या भागात तो उशिरा पीकवर जातो. त्यामुळे हा परिसर आणि ही शहरेही कालांतराने या संकटातून बाहेर पडतील. घाबरून जाण्याचं काही कारण नाही.

तुम्हाला कोरोनावर डॉक्टरेट मिळाली पाहिजे. एवढा रिसर्च तुम्ही केल्याचे जाणवतेय…

– तेवढा अभ्यास नाही केला तर मग राज्याचा मुख्यमंत्री म्हणून मी काम कसं करणार?

देशातल्या मुख्यमंत्र्यांमध्ये कोरोनावर इतका खोलवर अभ्यास करणारे आपण एकमेव मुख्यमंत्री मला दिसताय!…

– (मिश्किलपणे) मी फिरत नाही, घरी बसतो म्हणून अभ्यास होतो. अभ्यास न करता फिरणं आणि न फिरता अभ्यास करणं यात तुम्हाला काय पाहिजे ते तुम्ही ठरवा.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस फार फिरायला लागलेत…

– मी त्यावर काही बोलणार नाही.

फडणवीस हे अलीकडेच दिल्लीत होते…

– तिथली कोरोनाची परिस्थिती बघत असतील.

आणि त्यांचं असं म्हणणं आहे की…

– पण तिथल्या परिस्थितीबद्दल काही बोलले
नाहीत ते.

दिल्लीत जाऊन विरोधी पक्षनेते महाराष्ट्राच्या भयावह परिस्थितीबद्दल बोलले आहेत…

– याचे कारण काय? तर त्यांनी त्यांचा जो आमदारकीचा फंड आहे, तो महाराष्ट्राचा फंड दिल्लीत दिल्यामुळे सगळय़ा गोष्टी ते दिल्लीत जाऊन करताहेत.

हे तुमचं म्हणणं जरी खरं मानलं तरी राज्यातल्या परिस्थितीचे अपडेटस् त्यांनी पंतप्रधान मोदी यांना भेटून देणे कितपत योग्य आहे? खरं म्हणजे ही चर्चा मुख्यमंत्र्यांशी करायला पाहिजे…

– असं कोण काय म्हणतंय, काय करतंय इकडे लक्ष देत नाही. मी पुनः पुन्हा सांगतोय, मी माझ्या कामाशी प्रामाणिक आहे. माझ्यावर माझ्या जनतेचा विश्वास आहे तोपर्यंत काही चिंता नाही. यांचं ठीक आहे. हे बोलतील. बोलत राहतील. कदाचित त्यांची पोटदुखी अशी असेलही की, कुठेही न जाता, न फिरता एका संस्थेने देशातल्या सर्वोत्तम मुख्यमंत्र्यांमध्ये महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची निवड केली. हीसुद्धा पोटदुखी असू शकेल. कारण कोरोनाची लक्षणं वेगवेगळी आहेत.
अच्छा! म्हणजे पोटदुखी हेही एक लक्षण आहे?

– लक्षणे वेगवेगळी आहेत. नक्कीच!

सर्दी, खोकला, ताप ही लक्षणे आहेत असं ऐकलंय…

– हो, सर्दी, खोकला, ताप, चव जाणे, वास जाणे, अंगावर रॅश येणं, काहीजणांची बोटं काळी-निळी पडतात.

त्याच्यात आता हे नवीन लक्षण…पोटदुखी!

– पोटदुखी हे लक्षणही असू शकेल.

अच्छा! मग हे पोटदुखीतून आलंय तर…

– हे, ठीक आहे, पण आता मी थोडंसं गांभीर्याने सांगतोय. ही मस्करी नाहीय. आपल्यात एखादा अनपेक्षित बदल झालाय असे काही लक्षात आलंय तर तेही कोरोनाचं लक्षण असू शकतं असा एक अभ्यास आहे.

हो का…

– त्यामुळे कोणाला विचित्र आढळलं जसं वास जाणे, चव जाणे तर त्यांनी वैद्यकीय मदत आणि उपचार घ्यायला हवेत. आपण सगळीकडे होर्डिंग्ज लावलीत की, शिंकताना, खोकताना तोंडावर रुमाल ठेवा, इकडे तिकडे थुंकू नका. प्रत्यक्षात सर्दी-खोकल्याची साथ सुदैवाने तशी मोठय़ा प्रमाणात नाही आली. ताप येणं हेही कोरोनाचं लक्षण आहे. काहीजणांची चव जाते. म्हणजे असे वेगळे काही तरी आढळतंय का हे पाहायला हवे.

म्हणजे राज्यात सत्ता परिवर्तन झाल्यापासून अनेकांचं आयुष्य बेचव झालेलं आहे…

– असू शकतं.

त्याचा हा परिणाम आहे असं आपल्याला वाटतं काय?

– असेलही.

विरोधी पक्ष ही संसदीय लोकशाहीत महत्त्वाची संस्था आहे…

– फार जबाबदार संस्था आहे.

विरोधी पक्षनेत्यांनी महाराष्ट्राच्या प्रश्नावर खरं तर मुख्यमंत्र्यांशी चर्चा करावी असे संकेत आहेत. पण हे संकेत विरोधी पक्षनेते फडणवीस पाळत नाहीत असे वाटते का?

– मी एक-दीड महिन्यापूर्वी सर्व पक्षांच्या नेत्यांची एक बैठक घेतली होती. येत्या काही दिवसांत अशी बैठक मी परत घेणार आहे. परंतु त्या वेळेला मी त्यांना मोकळेपणाने सांगितलं होतं की, आपणही मोकळेपणानं आपली जी काही निरीक्षणं असतील, काही सुधारणा असतील तर सांगाव्यात. राजकारण तर आपल्या पाचवीलाच पुजलेले आहे. सदासर्वदा राजकारण एके राजकारण. पण कोरोनाची साथ हा जनतेच्या जिवाशी खेळ होतोय. आपण म्हणता ते मी मान्य करेन की, एखाद्या कोविड सेंटरमध्ये दुरवस्था असेल, असू शकेल. पण असेल तर ती मी सुधरवली पाहिजे. कारण शेवटी ती सुविधा मी जनतेसाठी केलेली आहे. त्याच्यात जर काही उणीव असेल तर ती दूर केली गेलीच पाहिजे. आतासुद्धा आपल्याकडे काही काही औषधं, अगदी अलीकडे शोध लागलेलीही औषधं वापरली जाताहेत. मी मुद्दामहून सांगतो, डब्ल्यूएचओ असेल किंवा दूरचित्रवाणी वा वृत्तपत्रांतून कळलं की, एक औषध मिळालंय. डेकसोना नावाच्या स्टेरॉईडचं नाव आलं. त्याबद्दल टास्क फोर्सला विचारलं तर ते म्हणाले, हे औषध आपण गेले दोन महिने वापरतो आहोत. म्हणजे आपल्याकडे आधीपासूनच या औषधाचा वापर सुरू झाला आहे. हे औषध कोणाला किती द्यायचं हे प्रमाण डॉक्टरांनी ठरवायचंय. म्हणून प्रत्येक रुग्णाला हे औषध मिळालंच पाहिजे हा आग्रह आपण धरता कामा नये. ते डॉक्टरांवर सोपवलं पाहिजे

सध्या महाराष्ट्र, देशात आणि अख्ख्या जगातही डॉक्टर्स, नर्स आणि वॉर्डबॉयचा उल्लेख पांढऱया कपडय़ातील देवदूत असा केला जातोय. हेच कोरोनाविरुद्ध जगात लढत आहेत. त्यांचं बलिदान मोठं आहे…

– नक्कीच त्यांचं योगदान मोठंच आहे. या युद्धाच्या प्रसंगी त्यांच्यावरच विश्वास ठेवून आपण काम करतोय. देवावर आणि देवदूतांवर विश्वास नसेल तर दोघेही काम नाही करू शकणार.

कर्नाटकची परिस्थिती गंभीर झालीय कोरोनाची. तिकडच्या मंत्र्यांनी सांगितलंय की, आता आम्ही सगळं देवावर सोडून मोकळे होतो. हे कितपत योग्य आहे?

– हासुद्धा माझ्या फेसबुक लाइव्हमधला मुद्दा होता. सगळी प्रार्थनास्थळं बंद आहेत. मंदिरं बंद आहेत. मग देव आहे कुठे? देव कुठे गेला? तर तो देव आपल्यात आहे. आपण एकमेकाला सावरणं हेच महत्त्वाचं. डॉक्टरांच्या रूपात तो आपल्याला मदत करतोय. पूर्वी शाळेत असताना आपण पिक्चर बघायचो, त्या पौराणिक सिनेमात देवादिकांच्या हातातून अशी किरणं निघतात आणि मग चमत्कार होतो. कोणीतरी मृत्युमुखी पडलेला पुन्हा जिवंत होतो. आजारी पडलेला बरा होतो. आताच्या संदर्भात याचा विचार केला तर देवाचा आशीर्वाद म्हणजे औषधाच्या रूपात तो मिळणं. रुग्णसेवा मिळणं. या सगळय़ा गोष्टी त्याचाच भाग आहेत.

शरद पवारही याच विषयावर बोलले आहेत…

– काय बोलले आहेत?

अयोध्येत जे राममंदिर उभं राहतंय त्यापेक्षा कोरोनाची चिंता जास्त आहे. मंदिराच्या माध्यमातून कोरोना बरा होणार नाही असं शरद पवार बोलले आहेत. त्यांचंही मत आपल्यासारखंच आहे की, कोरोनाशी लढण्यासाठी डॉक्टर्स हवेत…

– बरोबर आहे. डॉक्टर्स हवेतच. आपण ज्या सुविधा निर्माण करतो आहोत या सुविधा रुग्ण बरा करणार नाहीयत. या सुविधांच्या बरोबर डॉक्टर्स पाहिजेत. मी आधीच जे म्हटलं होतं की, जंबो फॅसिलिटी हवी. म्हणजे आम्ही काय बेडचं दुकान नाही काढलेलं. फर्निचरचं दुकान नाही काढलं. प्रदर्शन नाही भरवलं. या बेडवर जेव्हा रुग्ण येईल तेव्हा त्या रुग्णाच्या बेडच्या बाजूला डॉक्टर आणि सिस्टर पाहिजे आणि हातात औषधं पाहिजेत.

कोरोनाच्या मुंबईतल्या स्थितीबाबत सगळय़ात जास्त टीका देशभरातल्या राजकीय नेत्यांनी केली. मग तो परप्रांतीय मजुरांचा मुद्दा असो किंवा रुग्णसंख्यावाढीवरून असेल. त्याच मुंबई पॅटर्नचा आज सगळय़ात जास्त बोलबाला होतो आहे. प्रत्येक ठिकाणी ‘मुंबई पॅटर्न’ लागू करा असं देशभरात सगळय़ांना वाटतंय.

– बोलबाला कोण करतंय…

सगळेच करताहेत. देशभरात कौतुक होतंय. हा मुंबई पॅटर्न तुम्ही जेव्हा सुरू केला…

– (मिश्किलपणे) तुम्ही मॅनेज केलं असेल. त्यामुळेच कदाचित कौतुक होत असावं.

पण मुंबई पॅटर्न, त्यातही धारावीचे यश लक्षणीय आहे. धारावी म्हटले की लोकांच्या भुवया वर जातात. पण…

– खरे आहे ते. मोठं आव्हान आहे.

जागतिक आरोग्य संघटनेने आवर्जून धारावीचा उल्लेख केला. धारावी पॅटर्नचं कौतुक केलं. मला वाटतं हे तुमच्या सरकारचे सगळय़ात मोठं यश आहे. राज्य सरकार आणि महापालिकेच्या प्रयत्नांचं यश आहे. शिवाय तुम्ही सतत धारावी आणि मुंबईवर लक्ष दिलंत.

– आपल्या जनतेवर आणि यंत्रणेवर विश्वास. हा विश्वास नसता तर अशक्य होतं. मी धारावीत नुसता चकरा मारताना दिसलो असतो तर काय साधलं असतं? मी मुख्यमंत्री म्हणून तिथे जाणं म्हणजे सगळा लवाजमा माझ्याभोवती गोळा होणार. म्हणजे कामाची ठिकाणे आणि काम सोडून यंत्रणा माझ्याभोवती गोळा होणार. हे मला नको होते. पण एक गोष्ट नक्कीच समाधानाची आहे की, डब्ल्यूएचओने धारावीचा उल्लेख केला. त्यानंतर कालपरवाकडे ‘वॉशिंग्टन पोस्ट’मध्ये एक आर्टिकल आलंय. त्यात त्यांनी म्हटलंय की, मुंबई हे एक असं शहर आहे ज्या शहराने कोणतीही माहिती लपवलेली नाही.

लपवाछपवी नाही…

लपवाछपवी नाही. बिल्कूल नाही. जे आहे ते स्पष्ट आहे.

पण तुम्ही लपवताय…काहीतरी लपवताय असं विरोधी पक्षनेत्यांचे म्हणणे आहे. मृत्यूचे आकडे लपवताय. रुग्णांचे आकडे लपवताय…

– त्यांच्याकडे ‘वॉशिंग्टन पोस्ट’ वगैरे येत नसेल. आता ‘वॉशिंग्टन पोस्ट’ही आम्ही मॅनेज केलंय तर…

त्यांच्याकडे स्वतःची यंत्रणा आहे का, ज्या माध्यमातून त्यांना आकडे मिळताहेत किंवा राज्यातल्या कारभाराविषयी माहिती मिळतेय?

– असू शकेल. पण ‘डब्ल्यूएचओ’ आणि ‘वॉशिंग्टन पोस्ट’ यांसारख्यांनी आपल्या कामाची नोंद घेणं ही फार मोठी गोष्ट आहे.

अर्थातच ही गौरवाची गोष्ट आहे…

– यामुळेच मी बाकीच्या गोष्टींकडे लक्ष देत नाही.

धारावीत आपल्याला यश मिळतंय…

– मी अजूनही तसं बोलत नाहीय. अजूनही संकट कायम आहे. हे संकट पूर्ण टळलं पाहिजे आणि जर मी आता कोणाचं मोठं कौतुक केलं तर गाफीलपणा येण्याचा धोका आहे. तो गाफीलपणा मला नकोय. गलथानपणा नकोय.

मुंबईसुद्धा हळूहळू स्थिरस्थावर होतेय, पण मुंबईच्या रस्त्यावर वडापाव कधी मिळणार?

– त्यासाठी तयारी सुरू आहे. हळुवार वाटचाल त्या दिशेने चालू आहे. एक दिवस नक्की मिळेल.

मुंबईच्या रस्त्यावर जोपर्यंत वडापाव मिळत नाही तोपर्यंत मुंबई सुरळीत झाली असे या देशात कुणी मानणार नाही…

– वडापाव मिळायला हवा. शिवाय आणखीही बऱयाच गोष्टी आहेत त्याही मिळायला हव्यात. आपण हळूहळू त्या दिशेने जात आहोत.

या चार महिन्यांच्या काळात आपण मंदिरेही लॉकडाऊन केली आहेत. देवही बंदिवान आहेत…

– मी मगाशी सांगितल्याप्रमाणे देव आपल्यात आहेत.

मंदिरांची टाळी कधी उघडणार?

– देव म्हणताहेत मी तुमच्यात आहे आणि त्यामुळे तुम्ही मंदिरात येऊ नका. आधी हे कोरोनाचं संकट सांभाळा. गाडगेबाबांची एक कथा मला माझ्या आजोबांनी सांगितली होती ती आठवते. ती चरित्रात पण लिहिलेली आहे. गाडगेबाबा पंढरपूरला जायचे. यात्रा असायची. म्हणजे वारी. या वेळेला ती वारीही होऊ शकली नाही. असो. पण त्या काळी गाडगेबाबा पंढरपूरला जायचे ते मंदिरात जाऊन विठ्ठलाचं दर्शन घ्यायच्या आधी किंवा दर्शनाऐवजी चंद्रभागेचा काठ सकाळी खराटं घेऊन साफ करायला लागायचे. आणि त्यांना कुणी विचारलं की काय बाबा, दर्शन घेतलं का? त्यावर ते म्हणायचे, हे बघा, हे गोरगरीब माताभगिनी, मायबाप सगळे आले आहेत, हाच माझा विठोबा आहे. यांच्यातच मला विठोबा दिसतो. इकडे सगळी अस्वच्छता माजली तर रोगराई येईल. मग त्याचे काय होणार? त्यामुळे ते स्वतः खराटा घेऊन तो सगळा परिसर स्वच्छ करायचे. आता आम्ही त्यांच्या नावाने अभियान करतो, पण स्वतः काय करतो? स्वच्छ केलेल्या कोपऱयात झाडू मारून फोटो काढतो.

गाडगे महाराजांची परंपरा महाराष्ट्राला जशी लाभलीय तशी ठाकरे कुटुंबालाही लाभलीय…

– हो, आहे ना. प्रबोधनकार ठाकरे हे मोठे उदाहरण आहे. काही गोष्टी माझ्या आजोबांकडून आठवणींच्या स्वरूपात ऐकलेल्या आहेत.

आता महाराष्ट्रात ‘अनलॉक टू’ सुरू आहे…

– अनलॉक शब्द सोडा. अनलॉक…लॉक… वगैरे.

ज्याला तुम्ही ‘पुनश्च हरिओम’ म्हणता…

– ‘पुनश्च हरिओम’ म्हणतो किंवा ‘मिशन बिगिन अगेन.’ ते करताना नीट विषय समजून घ्यायला हवा की लॉकडाऊन केलेला आहेच. लॉकडाऊन आहेच, पण आपण एक एक गोष्ट सोडवत चाललेलो आहोत. हळूहळू एक एक गोष्ट बाहेर काढतोय. नाहीतर काय होईल लॉकडाऊन वन, लॉकडाऊन टू आणि अनलॉक टू या गोष्टीत अडकून पडू. तुम्ही घाईघाईने लॉकडाऊन केला तर ते चूक आहे. घाईघाईने लॉकडाऊन उठवला तर तेही चूक आहे.

लोक कंटाळलेत आता…

– हो, खरं आहे. पण कंटाळा घालवण्यासाठी लॉकडाऊन केलेलं नाही किंवा उघडायचं असं नाहीय.

लोकांच्या पोटापाण्याचा प्रश्न आहे…

– त्यासाठी एकदम जर घिसाडघाईने उघडले आणि साथ प्रचंड वाढली आणि जीवच गेला तर पोटापाण्याचं काय करणार? कारखान्यांमध्ये ही साथ घुसली तर काय होणार? म्हणून एक गोष्ट स्वीकारली पाहिजे की, कोरोनाचं काय व्हायचं ते होईल, किती माणसे मृत्युमुखी पडतील ती पडतील, पण आम्हाला लॉकडाऊन नको. आहे का तयारी?

अमेरिकेनं जसं केलंय…

– तयारी आहे का पण, माझी तयारी नाही. मी स्पष्टच सांगतो.

न्यूयॉर्कचं उदाहरण आहे…

– असेल, पण माझी नाही तयारी. मी म्हणजे ट्रम्प नाहीय. मी माझ्या डोळय़ांसमोर माझी माणसं अशी तडफडताना बघू शकत नाही. अजिबात नाही. त्यामुळे एक गोष्ट ठरवा, लॉकडाऊन गेला खड्डय़ात, जीव गेला तरी बेहत्तर, पण आम्हाला लॉकडाऊन नको. ठरवता का बोला!

रेल्वे सुरू होत नाहीय अद्यापि. लोकांनी प्रवास कसा करायचा?

– म्हणूनच मी म्हणतो ना, एकदा काय ते ठरवा. इस पार या उस पार. आणि जर दोन्ही सांभाळायचं असेल तर रेल्वे रुळावरून चालली पाहिजे. तसेच ही तारेवरची कसरत आहे.

तुम्ही रेल्वे सुरू करणार की नाही असा प्रश्न आहे. रेल्वे ही मुंबईची लाइफलाइन आहे…

– रेल्वे सुरू करूया. वडापाव सुरू करूया, पण एकदा काय ते एक टोक स्वीकारा. घाईगडबडीने, घिसाडघाईने तुम्हाला निर्णय घ्यायचाय? पण लक्षात घ्या, कुटुंबंच्या कुटुंबं आजारी पडताहेत आणि मृत्युमुखी पडताहेत. मग कुटुंबं मृत्युमुखी पडल्यावर घराला जे टाळं लागेल ते लॉकडाऊन कोण उघडणार? घराचं जे लॉकडाऊन होईल त्याचं काय? कुटुंबच्या कुटुंब जर गेलं तर त्या घराचं टाळं कोण उघडणार? म्हणून ते टाळं नको असेल तर या गोष्टी टाळा.

शिक्षणाचा पूर्ण बट्टय़ाबोळ झालाय…

– जगभर झालाय.

होय. जगभरात झालाय. पण महाराष्ट्रात सध्या जो विषय चर्चिला जातोय तो म्हणजे अंतिम वर्षाच्या परीक्षांचं काय करायचं?

– निर्णय घेतलाय आपण!

यात राज्यपालांचं वेगळं मत आहे…

– आता तुम्हीचं बघा. तुम्ही मला प्रश्न विचारताना दोन्ही बाजूने विचारताय. म्हणजे एका बाजूला म्हणताय, हे उघडणार कधी आणि दुसऱया बाजूस म्हणताय इतर राज्यांत पुन्हा लॉकडाऊन होतंय. हाच माझा महत्त्वाचा मुद्दा आहे. काही ठिकाणी शाळा सुरू केल्या, पण त्यातली मुले बाधित झाली. असं कुणी समजू नका की, मुलांना हा कोरोना होत नाही. सहा महिन्यांच्या बाळालासुद्धा कोरोना झाला. सुदैवाने तो बरा झाला.

दक्षिण कोरियात शाळा सुरू केल्या होत्या. त्यानंतर त्या बंद कराव्या लागल्या. अनेक देशांत बंद कराव्या लागल्या…

– मग मला सांगा, हा शिक्षणाचा खेळखंडोबा किंवा बट्टय़ाबोळ आहे की नाही?

महाराष्ट्राला शिक्षणाची फार मोठी परंपरा आहे…

– अवघ्या जगाला आहे.

मुंबई, महाराष्ट्राला…

– आहेच ना. शिक्षण हे जीवनावश्यक गोष्टींपैकी एक आहे.

कोरोनाच्या या कठीण काळात तरुणांनी, मुलांनी शिक्षणाचं काय करावं…

महत्त्वाचा मुद्दा आहे हा. त्यासाठी आपणही खूप विचार करून त्यावर काम करतोय. आता बघा, जुलै जवळपास संपत आला. जूनमध्ये खरं तर शाळा सुरू होतात. आता शाळा कधी सुरू होणार? या मुद्दय़ावर मी माझी संकल्पना मांडली ती हीच की, आता शाळा हा अस्तित्वात असलेला कन्सेप्ट तूर्त बाजूला ठेवा. शिक्षण कधी सुरू होणार यावर माझा भर आहे. आपण त्यासाठी हाही विचार केला की, ग्रामीण भागात जिथे जिथे शाळा असेल तिथे शाळा सुरू कराव्यात का? आणि जिथे जिथे शक्य आहे, सुविधा आहेत तिथे ऑनलाइन शिक्षण सुरू करावं का? ऑनलाइन शिक्षणाचे फायदे आपल्याकडे खूप झाले आहेत. त्यासाठी आपण केंद्र सरकारशीही बोलतोय. आता खरं तर शिक्षण एकतर्फीच होणार, जसं माझं फेसबुक लाइव्ह होतं. तसंच ते होणार आहे. टीव्ही चॅनलवरून शिकवता येईल का यावरही आपण काम करतोय. त्याशिवाय मुंबई महापालिकेच्या शाळेत आपण एसडी कार्ड लोड करून टॅब दिले होते. तसाही प्रयत्न होतोय. त्यात ई लर्निंग आहे. त्यात पाठय़पुस्तकं आहेत. असे प्रयत्न सुरू आहेत.

म्हणजे आता आपला भर ई-लर्निंगकडे आहे…

– त्याशिवाय सध्या पर्याय नाहीय. यासाठी सगळय़ा बाजूंनी आपण मतमतांतरेही घेत आहोत. पण आता तुम्ही विचारताय त्याप्रमाणे काही म्हणतात लॉकडाऊन करावा, काहीजण म्हणतात करू नये. लॉकडाऊनबाबत जशी ही मतमतांतरे आहेत तोच प्रकार शिक्षणाच्या बाबतीतही होतोय. प्रत्येक बाबतीत दोन मतं – चार मतं येत आहेत. मतमतांतराचा हा जो काही घोळ होतोय त्यामुळे आपला प्रॉब्लेम होतोय. पण आता निर्णय घ्यावा लागेल. सरकार म्हणून आपण तो घेऊन त्यावर कामही करणार. एखादी गोष्ट मला पटली की टीकेची पर्वा कधीच करत नाही. मुख्यमंत्री नव्हतो तेव्हाही केली नाही आणि आताही करणार नाही. जी गोष्ट मला पटलीय आणि मला असं वाटते यात जनतेचं हित आहे तिकडे मी टीकेची पर्वा करत नाही.

राज्यपालांची वेगळी भूमिका आहे. त्याशिवाय यूजीसीची भूमिका ही परीक्षा घ्यावी अशी आहे…

– आपल्याकडेसुद्धा कुलगुरूंची एक भूमिका आहे.

त्यातून मार्ग कसा काढणार?

– मार्ग काढलाय आपण. परीक्षा होऊ नये असं कुणाचं मत नाही. माझंही तसं मत नाहीय. माझंही मत आहे परीक्षा व्हावी, पण हे मी काय म्हणतोय नीट लक्षात घ्या. आपण अंतिम वर्षाच्या मुलांना जी काही आता सेमिस्टर झालीत त्याचे ऍग्रीगेट करून मार्क देऊन त्यांच्या आयुष्यातला अडथळा दूर करावा, त्यांना पास करावे, सरासरीने मार्क देऊन त्यांना रिझल्ट द्यावा, ज्यांना कुणाला वाटतं की मी याच्याहून चांगली कामगिरी बजावू शकतो त्यांना आपल्याला जेव्हा शक्य होईल तेव्हा परीक्षा जाहीर करून परीक्षा घेऊ. ज्यांना असे वाटतंय की, परीक्षेला बसायचंच तेव्हा त्यांनी बसावं आणि तेव्हा मात्र त्यांना एकच काय तो निर्णय घ्यावा लागेल. एकतर ऍग्रीगेट केलेल्या मार्कांचा रिझल्ट घ्या किंवा परीक्षेचा.

एकदिलाने एकत्र आलो तर मार्ग निघेल!

”सगळी प्रार्थनास्थळं बंद आहेत. मंदिरं बंद आहेत. मग देव आहे कुठे? देव कुठे गेला? तर तो देव आपल्यात आहे. आपण एकमेकाला सावरणं हेच महत्त्वाचं. डॉक्टरांच्या रूपात तो आपल्याला मदत करतोय. पूर्वी शाळेत असताना आपण पिक्चर बघायचो, त्या पौराणिक सिनेमात देवादिकांच्या हातातून अशी किरणं निघतात आणि मग चमत्कार होतो. कोणीतरी मृत्युमुखी पडलेला पुन्हा जिवंत होतो. आजारी पडलेला बरा होतो. आताच्या संदर्भात याचा विचार केला तर देवाचा आशीर्वाद म्हणजे औषधाच्या रूपात तो मिळणं. रुग्णसेवा मिळणं. या सगळय़ा गोष्टी त्याचाच भाग आहेत.”

नोटाबंदी हे एक मोठं संकट होतं. त्यात हजारो, लाखो लोक बेरोजगार झाले. त्याचे परिणाम देश आजही भोगतो आहे. विशेषतः याचा सगळय़ात जास्त फटका औद्योगिक राज्य असल्यामुळे महाराष्ट्राला बसला. मुंबईला बसला…

– हो. पण यावर जास्त कुणी बोलत नाहीय.

आता पुन्हा कोरोनाचा फटका औद्योगिकदृष्ट्या आपल्याच राज्याला बसतोय…

– हे पहा, शेवटी संकटातसुद्धा प्रकार आहेत. मानवी आणि अमानवी. मानवी असो की अमानवी असो, ते कुणालाच मानवत नाही. त्यामुळे संकट हे संकट असते. तुम्ही म्हणताय ते कोरोनाचं संकट अमानवी आहे. हे आपल्या हातात नाहीय. हा व्हायरस जो आला तोच मुळात बाहेरून आला.

ते ठीक आहे, पण यातून मार्ग कसा काढणार? हजारो, लाखो लोकांचा रोजगार गेलाय…

– मला असं वाटतं, यातून मार्ग काढण्यासाठी पूर्ण जग धडपडत आहे. आतासुद्धा प्रसार माध्यमातून ज्या बातम्या समोर येताहेत त्या आशादायक आहेत. या बातम्यांतून एक गोष्ट समोर येतेय की, व्हॅक्सिनच्या जवळ आपण गेलो आहोत. पोहोचलो आहोत. कालसुद्धा माझी काहीजणांशी चर्चा झाली. त्यात माहिती मिळालीय की, काही महिन्यांतच हे व्हॅक्सिन येतंय. सध्या त्याची ट्रायल सुरू झालीय. प्राण्यांवर झाली. आता माणसांवर होतेय. ठरावीक गुपवर होतेय. त्यानंतर ती मोठय़ा प्रमाणावर होईल. असे करून नंतर हे व्हॅक्सिन येईल. अशीही बातमी आहे की, ते ऑगस्टमध्ये येईल. ऑगस्टमध्ये आले तर आनंद आहे. पण साधारणतः या वर्षाअखेरीपर्यंत आपल्या देशात व्हॅक्सिन तयार होऊ शकते असे चित्र आहे.

शेतकऱ्यांचे प्रश्न नव्याने उफाळून येताहेत…

– प्रश्न सगळ्यांचे आहेत.

दूध उत्पादक शेतकऱयांचे आंदोलन सुरू झालंय. त्यांच्या दुधाला भाव वाढवून हवाय…

– अहो, कोणाला भाव मिळतोय नीट? कुणालाच भाव मिळत नाहीय. कोरोनाचं हे संकट सर्वव्यापी आहे. त्यामुळे कोणत्याही एका वर्गाला किंवा एका क्षेत्राला संकट आहे असे मानणं चूक आहे. आणि शेवटी सगळेच लोक अन्याय होतो म्हणून बाहेर पडले तर काय होईल? माझं तेच म्हणणं आहे की, एकतर तुम्ही एक काहीतरी स्वीकारा की, जे काय होईल ते होईल. लॉकडाऊन उठवा किंवा आम्ही सुरक्षित राहून व्यवस्थित शांतपणे विचार करून या संकटाला परतवू हा एक मार्ग आहे. नाहीतर जे काही होईल ते होईल, मारतो उडी आम्ही, असे तरी म्हणा.

खासगी कंपन्या, खासगी उद्योग यांनी तर मोठ्या प्रमाणावर नोकरकपात केली आहे. पण शासनातसुद्धा, एसटीमधून चार हजार लोक कमी केले. रेल्वेची माणसं कमी केली जाताहेत, विमान कंपन्यांची स्थिती वेगळी नाही. या सगळ्या क्षेत्रांतून नोकरकपात सुरू राहिली तर खूप मोठा सामाजिक प्रश्न निर्माण होऊ शकतो…

– खरं आहे. खूप मोठा सामाजिक प्रश्न निर्माण होऊ शकतो. आणि त्यासाठी केवळ अट्टहासाने वेगवेगळी मतं मांडण्यापेक्षा सगळेजण जर एकदिलाने एकत्र आले तर यातूनच काही मार्ग मिळू शकतो. तसा मार्ग काढण्याचा माझा प्रयत्न आहे. परंतु तुम्ही हे करताय म्हणून माझा त्याला विरोध आहे ही भूमिका घेऊन कोणी येणार असेल तर त्यातनं मार्ग नाही निघू शकत. ही परिस्थिती सगळय़ांना सारखी आहे. फटका कमी जास्त प्रमाणात सगळय़ांना पडला आहे. पडणार आहे. आणि तुम्हाला आणखी सांगतो, येणाऱया काळात याहीपेक्षा एक मोठं संकट येऊ शकतं, आर्थिक. पण सगळ्यांनी मिळून एकदिलाने त्या संकटाचा सामना करायचा आहे. म्हणून एकत्र आले आणि मार्ग काढायचा म्हटला तर मार्ग निघू शकतो.

यात केंद्र राज्याला काय मदत करू शकते?

– केंद्र आणि राज्य यांना एकत्रित काम करावेच लागेल. पंतप्रधान मोदी हे अधेमधे व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून बैठक घेत असतात आणि कोरोनाच्या बाबतीत ज्या काही गोष्टी आपण त्यांच्याकडे मांडतो त्याबाबत त्यांची मदत होते.

आपल्याला जी 38 हजार कोटींची मदत केंद्राने द्यायचं कबूल केलं होतं ते पैसे राज्याला मिळाले का?

– येताहेत… येताहेत…

हळूहळू येताहेत. लॉकडाऊन जसा हळूहळू उठतोय तसे ते पैसे हळूहळू येताहेत…

– सगळ्यांचेच उत्पन्न घटलेलं आहे. दूध उत्पादकांचे घटले आहे. शेतकऱयांचे घटलेच आहे. म्हणजे सरकारचे पण घटलेच आहे.

मग महसूल वाढवण्यासाठी महाराष्ट्र सरकार काय प्रयत्न करतेय? कारण त्याशिवाय हे राज्य चालवता येणार कसे?

– कोणाकडून वसूल करणार?

कर्मचाऱ्यांचे पगार द्यायला आपल्याकडे पैसे नाहीत, असे आपले मंत्री म्हणतात…

– मान्य आहे मला, पण शेवटी महसूल वाढवण्यासाठी कोणाचे खिसे कापायचे?

माझा प्रश्न तोच आहे. त्यासाठी आपण काय उपाययोजना करताय?

– उपाययोजना सुरू आहेत. शेवटी पटकन ‘पी हळद आणि हो गोरी’ असा उपाय कोणाकडेच नाहीय. तसा उपाय असता तर या परिस्थितीला संकट तरी कसं म्हणता येईल. संकट किंवा आपत्ती असे आपण म्हणतो तेव्हा ती परिस्थिती गंभीर आहे हे आपण मान्य करायला हवं. आपल्या देशात आणि आपल्या राज्यात एपीडिपिक ऍक्ट शंभर वर्षांपूर्वीचा होता. इंग्रजांच्या काळातला. तो आता शंभर वर्षांनंतर पुनरुज्जीवित केला. तो का केला? कारण पुन्हा तशी परिस्थिती निर्माण झालीय. केंद्राने त्याच्याही पुढे आणखी एक पाऊल टाकत थोडासा आणखी कडक डिझॅस्टर ऍक्ट केला आहे. तो का करावा लागला? याचं कारण, संकट तसेच गंभीर आहे.

(क्रमशः)
साभार सामना ऑनलाइन

Best IT Comany In Maharashtra , Solapur

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here