ऑपरेशन एकदा ,भूल मात्र दोनदा, वैराग घडला असा अजब प्रकार…… ?

0
188

ऑपरेशन एकदा ,भूल मात्र दोनदा, वैराग घडला असा अजब प्रकार…… ?

वैराग प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये मंगळवारी कुंटूब नियोजन शस्त्रक्रिया कॅम्प राबविण्यात आला होता,त्यासाठी महिलांना भूलही देण्यात आली. मात्र स्वतः सर्जनच वेळेवर न पोहचल्याने शस्त्रक्रिया तब्बल चार तास उशिराने सुरु झाल्या.परीणामी काही महिलांना दोन वेळा भूल घेण्याची वेळ आली. यामुळे नातेवाईकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागले असून पुन्हा एकदा आरोग्य विभागाचा ढिसाळ कारभार पुढे आला आहे.

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

याबाबत माहिती अशी की, कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करण्यासाठी वैराग प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत येणाऱ्या गावातील ९ तडवळे प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत गावातील पाच, गौडगाव प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत येणाऱ्या गावातील सोळा तर पानगाव प्राथमिक आरोग्य केंद्र अंतर्गत येणाऱ्या गावातील दोन महिला रुग्णांना कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया करण्यासाठी वैराग येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात बोलवण्यात आले होते. सकाळी सात वाजल्यापासूनच उपाशी पोटी सदर महिला रुग्ण नातेवाईकांसह वैराग प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल झाल्या.

बत्तीस रूग्णांवर दुपारी एक ते दोन वाजण्याच्या सुमारास शस्त्रक्रिया करण्यात येणार असल्याची माहिती असल्यामुळे त्यांना साडेबारा वाजण्याच्या सुमारास भूल देण्यात आली. मात्र भूल दिल्यानंतर सर्जन वेळेवर आलेच नाहीत. याबाबत वैद्यकीय अधिकाऱ्यांकडे विचारणा केली असता सर्जन अचानक वरिष्ठांच्या आदेशानुसार उस्मानाबादला गेल्याचे कळाले. त्यामुळे आधीच ऑपरेशनमुळे काळजीत असलेल्या नातेवाईकांच्या चिंतेत वाढ झाली. शस्त्रक्रियेसाठी त्यांना ताटकळत बसण्याची वेळ आली. वास्तविक पाहता शस्त्रक्रिया करण्यापूर्वी फक्त पंधरा ते वीस मिनिट अगोदर रुग्णांना भूल देणे आवश्यक असते. त्याच बरोबर या शस्त्रक्रिया या सकाळच्या सत्रातच होणे अपेक्षित असताना तब्बल एक महिन्यापूर्वीच दुपारचा शस्त्रक्रिया चा कार्यक्रम जिल्हापातळीवर ठरला असल्याचे समजते आहे.

२०२१-२२ या सालामध्ये कुटुंब नियोजनाच्या शस्त्रक्रियेमुळे राज्यात पंधरा मृत्यू झाल्याची घटना ताजी आहे. त्यामुळे राज्य कुटुंब कल्याण कार्यालयाने कुटुंबनियोजनाच्या मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. त्यानुसार शस्त्रक्रिया शिबिरामध्ये किमान २५ रुग्ण दाखल होणे गरजेचे आहे मात्र वैराग मध्ये चक्क ३२ रुग्ण दाखल करण्यात आले होते. शिबिरा पूर्वी आदल्या दिवशी रुग्णांना दाखल करणे गरजेचे असते,वैराग मध्ये तर चक्क शस्त्रक्रियेच्या दिवशी दुपारपर्यंत रुग्ण येतच होते .

शस्त्रक्रिया शिबिर सकाळच्या सत्रामध्ये ठेवण्याच्या सूचना आहेत. मात्र वैराग मध्ये शिबीर चक्क दुपारी ठेवण्यात आले आणि प्रत्यक्षात सायंकाळी राबवण्यात आले. रुग्ण रुग्णालयात दाखल करण्यापूर्वी रुग्णाचा वैद्यकीय इतिहास ,नाडी श्वसन दर ,रक्तदाब, रक्ताभिसरण संस्था, श्वसन संस्था ,केंद्रीय चेतासंस्था, पोटावरून तपासणी, रक्त व युरीन तपासण्या करून घेणे गरजेचे आहे. ह्या सर्व तपासण्या वैराग मध्ये पूर्ण झाल्याबद्दल जरा शंकाच आहेत. या शिबिरासाठी बधिरीकरण तज्ञ म्हणून नियुक्त करण्यात आलेले अधिकारी येथे फिरकलाच नसल्याचे दिसून येत असून मग भूल दिली कोणी आणि कोणाच्या सांगण्यावरून हा प्रश्न देखील उपस्थित झाला आहे.

शस्त्रक्रियेपूर्वी चार तास अगोदरच भूल देण्यात आल्यामुळे रुग्णांचे आरोग्य धोक्यात सापडले होते. सोलापूर जिल्ह्यामध्ये डॉ. जोगदंड, डॉ सरवदे ,डॉ माळी, डॉ गायकवाड, आणि डॉ खारे ह्या वैद्यकीय अधिकाऱ्यांना  कुंटूब नियोजन शस्त्रक्रिया शिबिरे पार पाडण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. मागील महिन्यात ह्या महिन्याचे नियोजन जिल्हास्तरावर करण्यात आले होते मग वैरागच्या शिबिरा वेळी संबंधित डॉक्टरांना उस्मानाबादला का पाठवण्यात आले हा प्रश्नच आहे. याबाबत वरिष्ठ पातळीवरून योग्य नियोजन करून रुग्णांची होणारी हेळसांड थांबवावी अशी मागणी रुग्णांच्या नातेवाइकांनी केली आहे.


ऑपरेशन साठी लेकीला सकाळीच आणलं आहे,  मात्र डॉक्टर वेळेवर न आल्याने लेकराची व पोरीची लय आबदा झाली :…अलका मोरे… रुग्णाचे नातेवाईक पानगाव

कुंटूब नियोजन शस्त्रक्रिया सुरक्षित पार पडावी म्हणूनसूनेला सकाळी दहा वाजता इथं घेऊन आले तिला भूल पण दिली. पण नियोजनच व्यवस्थित नसल्याने रुग्णासह नातेवाईकांना मोठा त्रास सहन करावा लागला……. सखूबाई मस्तूद घाणेगांव ][वरिष्ठांच्या आदेशानुसारच रुग्णांना भूल दिलेली आहे, शस्त्रक्रियेला उशीर झाला असला तरी सर्व रुग्णांची आम्ही काळजी घेत आहोत. घाबरण्याचे काही कारण नाही…. डॉ अंजली शेळके वैद्यकीय अधिकारी वैराग प्रा आ केंद्र][उस्मानाबाद जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी बोलावल्यामुळे तिकडील कॅम्पला जावे लागले, त्यामुळे वैराग मधील कॅम्पला उशीर झाला वरिष्ठांच्या आदेशान्वये मी गेलो होतो असे सर्जन डॉ ए के खारे यांनी सांगितले.

या शस्त्रक्रिया शिबिर वेळी तालुका वैद्यकीय अधिकारी म्हणून उपस्थित राहणे गरजेचे होते मात्र बार्शी मध्ये देखील शिबिर असल्यामुळे ते उपस्थित राहता आले नसल्याचे तालुका वैद्यकीय अधिकारी अशोक ढगे यांनी सांगितले.

Best IT Comany In Maharashtra , Solapur

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here