एक आनंद हरवला….विठ्ठलाशी एकरूप झाला.😭😭
जवळ जवळ एक वर्ष होत आले आहे... गेल्या १२ मे चीच गोष्ट..त्यावेळी सगळीकडे कोरोना च्या दुसऱ्या लाटेने हाहाकार माजवला होता.
वेळ सकाळची होती….तसे तर रम्यं असणे स्वाभाविकं पण..उगाचचं मन त्यादिवशी हुरहूरतं होतं…चुकचुकतं होत…नि इतक्यात मोबाईलची रिंग वाजली…फोन मधून असे काही शब्दं कानावर पडले नि जणू पायाखालची जमीनच सरकली….

माझा बालपणीचा सवंगडी… “विठ्ठलानंद शिवलिंग पाटणे” या जगाचा निरोप घेवून गेला..आम्हाला सोडून गेला ही बातमी जणू कानात उकळते तेल पडावे अशी मनाला वेदना देवून गेली…निमित्तं होते हाच कोरोना ज्याने दुसऱ्यांदा आपली ‘दहशत’ या जगावर पसरवली होती…नुसती दहशत पसरवली नाही तर सोसाट्याच्या वारा यावा नि झाडाला लगडलेली अजूनही अपरिपक्वं फळे वेळेपूर्वीच गळून पडावी तसे नुकतेच जीवनाचे सार समजायला सुरुवात झालेली काही ‘आप्त-स्वकीयं’ जीवन यात्रा संपवून परतीच्या वाटेवर गेली होती…
त्यावेळी तर असं भयावह वातावरण झाले होते की रोज कोणी ना कोणी ज्याला आपण ओळखत होतो तो अचानक सोडून गेल्याचं ऐकण्यात येत होतं…आणि १२ मे २०२१ च्या दिवशी अचानक आमचा मित्र आनंद गेला.. इहलोकाचा प्रवास अर्ध्यावरती सोडून गेला..मला अजूनही आठवतंय दीड वर्षापूर्वीचं त्याची पत्नी कॅन्सर या दुर्धर आजाराशी सामना करून त्याला सोडून निघून गेली…तेंव्हा पासूनच तो जणू एकटा झाला…आमच्या आनंदच्या आयुष्यातला आनंदच हिरावला होता जणू…

अगदी शाळेपासूनचे आम्ही मित्र…आमची घरेही त्यावेळी अगदी जवळ…एकमेकांच्या घरी जावून मनसोक्त खेळण्याचा तो काळ…मोबाईल टीव्ही नसल्याने “मैत्रीचं नेटवर्क” मात्र अगदी
“फाईव जी” प्रमाणे स्ट्रॉंग होतं….त्या मैत्रीत मौज होती… माया ममता होती… जिव्हाळा होता.
परत जसं जसे मोठे होतं गेलो…शिक्षण…संसार व्याप सुरू झाला तसे मार्ग बदलत गेले… गावेही बदलली…नोकरी च्या निमित्ताने तो सोलापूर ला शिफ्ट झाला…

वाचनाची आवड असलेला…कुठल्याही विषयात सखोल जाणाऱ्या आनंदने वीर तपस्वी कॉलेज सोलापूर च्या ग्रंथालयाची सूत्रे आपल्या हातात घेतली होती…स्वतः M- Phil झालेला आनंद नागपूर विद्यापीठ अंतर्गत “लायब्ररी सायन्स” या विषयावरील “पी एच डी” साठी जोमाने तयारी करत होता.त्याची अधून मधून भेट होत होती..बोलणे होत होते.मी लिहीत असलेल्या कविता…लेख यांना सोशल मिडिया वर वाचून तो उत्स्फूर्तपणे दाद देत होता…त्याचं पुस्तकांशी असलेलं नातं तो माझ्याशी शेअर करत होता..चांगल्या चांगल्या पुस्तकांची नावे वाचण्यासाठी तो सुचवत होता.पुस्तकांनी त्याच्या आणि माझ्या मैत्रीतला पुल आणखी मजबूत केला होता.त्यांच्या कॉलेजमध्ये ही सर्व शिक्षक याच्यामध्ये…सर्व स्टाफ मध्ये तो सर्वांशी मिळून मिसळून राहत होता…नव्हे असे म्हणता येईल की तो नेहमी त्याच्या नावाप्रमाणे त्यांच्यात जणू आनंद वाटत होता.
आज आठवतंय त्याच्याशी मनमोकळे पणाने गप्पा मारल्या होत्या त्या म्हणजे त्याच्या पत्नीच्या आजारपणात..जेंव्हा मी हॉस्पिटल मध्ये त्याची भेट घेण्यास गेलो होतो. इतक्या कठीण प्रसंगी देखील स्वतःला त्याने सावरले होते…मीच थोडासा

अवघडलो होतो अश्या परिस्थितीत त्याचे सांत्वन कसे करावे म्हणून..तो मात्र त्यावेळी वरून तरी स्थिर वाटत होता….मात्र त्यावेळी त्याची अर्धांगिनी वर्षा कॅन्सर शी सामना करता करता अर्ध्या वाटेवर सोडून गेली.
मला तर राहून राहून वाटतयं त्याने एकटेपणामुळे आपली जगण्याची उमेद हरवली होती की काय?तो स्वतः एनसीसी विद्यार्थी होता…अध्यात्माची त्यास अतिशय आवड होती.सोलापूर येथील ‘होटगी महाराजांचा…जे की आता काशी येथे जगद्गुरु पदी विराजमान आहेत… त्याच्यावर खूप प्रभाव होता.शिवाय बार्शीच्या भगवंताचा तो एक ‘निस्सीम भक्त’ होता.आपला इहलोकातला अर्धवट राहिलेला संसार… परलोकात जावून त्याच भगवंताच्या साक्षीने आपल्या पत्नीचा हात पुन्हा नव्याने हातात घ्यायच्या ओढीने त्याने या जगाचा निरोप अकाली घेतला की काय?
“हे ईश्वरा….तुझे विधिलिखितं तूच जाणो”.
पण आम्ही साधी माणस… जी तुझीचं लेकरे आहोत…ज्यांना तू परस्परांवर प्रेम करण्यास शिकवले….रक्ताची,मैत्रीची नाती तू ज्यांच्यात जोडली…आणि अशी नाती जोडून तू पुन्हा त्यांना या नात्यातून वेगळे करून दूर घेवून जातोस…ही तुझी करणी मनाला चटका लावुन जाते..😭
मी तुझ्या कडे तक्रार नाही करत पण शेवटी मी ही एक तुझचं लेकरू…मग मी आपले मन तुझ्या कडे नाहीतर कोणाकडे मोकळे करणार?
आज त्यास जावून तिथीनुसार जवळ जवळ एक वर्ष होत आले आहे..त्याच्या ‘वर्ष-श्राद्ध’ निमित्त त्याच्या आईवडिलांनी बार्शी येथील भगवंत मंदिरात गरुड खांब ते मुख्य प्रवेशद्वार येथे पितळी सजावटीचे काम करून दिले.या कामी भगवंत देवस्थान पंच कमिटीने पाटणे परिवारास मोलाचे सहकार्य केले.
पंचतत्वात विलीन झालेल्या आपल्या मुलासाठी आपण काय काय केलं म्हणजे त्याच्या आत्म्यास शांती लाभेल हाच विचार त्याच्या आईवडिलांच्या मनात सतत तेवत असतो.त्याच्या आईवडिलांच्या डोळ्यातील अश्रू त्याच्या आठवणीने आजही निरंतर वाहत आहेत.त्याच्या आईशी बोलताना त्याच्या कित्येक आठवणी त्यांच्या ओठांशी आल्या होत्या…
पण बोलताना शब्दं मात्र साथ देत नव्हते.त्यांचे ते शब्दं हरवलेलं मौन मन हेलावून टाकणारे असे होते.
राहिले ओठातल्या ओठात
शब्दंही त्यांचे तेथेच थोपलेले
मौन म्हणावे की आणखी काही त्याला
भावनांना ही जणू त्यानं गोठलेले
कल्लोळ असतो मनात कधी
तर कधी असतो वेगळा आवेग
भिजतात शब्दंही तेंव्हा काहींसे
जेंव्हा अश्रूंना ही आवरत नाही वेग
निसरडे झालेलं मन त्यांचे मग गहिवरले
जुन्या आठवणींना त्याच्या पुन्हा जे स्मरले
फुटली नाही त्यांच्या शब्दांनाही वाचा तेंव्हा
मनानेही मग त्यांच्या मौनाचे रूप धारण केले
मित्रा.... "विठ्ठलाआनंद"...तू तुझा आनंद शोधण्यास आम्हाला सोडून गेलास पण तुझे आई वडील आजही तुझ्या आठवणीने अश्रू गाळत असतात...मी आज जेंव्हा त्यांची भेट घेतली तेंव्हा नकळत माझेही डोळे पाणावले...
आज त्याच्या वडिलांकडे पाहिले की शोले मधील एक मन हेलावणारा किस्सा आठवला…ज्यामध्ये तरुण अहमद यास जेंव्हा गब्बर सिंग मारून टाकतो आणि त्याच्या शवास स्पर्श करून त्याचे आंधळे वडील जेंव्हा म्हणतात की “जाणते हो दुनिया का सबसे बडा बोझ क्या है…बुढे बाप के कंधे पर जवान बेटे का जनाजा… इससे बडा बोझ दुनिया में कोई नहीं है!”…😥😥
लावले होते रोप इवलेसे
“आनंदा”चे त्यांनी त्यांच्या कुशीत
रोपाचे त्या झाला वृक्ष यथावकाश
छाया त्याची घेण्यापूर्वीच नियती
का ग तू केलीस थट्टा अशी क्रूर
उतार वयात त्यांना केलेस निराधार
आता आहेत दोघेच एकमेकांचा आधार
थांबता थांबेना त्यांच्या अश्रूंची धार…
त्यांच्या अश्रूंची ही धार…
त्याच्या आईवडिलांसाठी आनंद म्हणजे एक तळपता तेजस्वी सूर्य होता जो त्याच्या वेळेपूर्वीच अस्तास गेला नि त्यांच्या दुनियेत एक कायमस्वरूपी अंधाराचे साम्राज्य पसरवून गेला....
मावळतीच्या सूर्याकडून
आपणही काही शिकावे…
भले रोज मावळत असला तरी
नव्या सामर्थ्याने पुन्हा उगवावे….

त्यामुळे मावळतीच्या सूर्याला साक्षी ठेवून मी आनंद च्या आईवडिलांना इतकीच ग्वाही देवू शकतो की आनंद हा देखील जन्मोजन्मी तुमच्याच पोटी तुमचा मुलगा म्हणून पुन्हा नव्या सामर्थ्याने
जन्माला येईल आणि तुमची अपुरी राहिलेली स्वप्ने पूर्ण करील.
आनंद एक तुला सांगणे आहे...
तुझी आठवणं कायम मनात रुणझुणं करत राहील….विठ्ठला पुढे वाजणाऱ्या “टाळ-मृदुंगा” प्रमाणे.पंढरीचा विठ्ठल विटेवरी उभा..प्रकट आहे तसा तू आम्हा मित्रांचा विठ्ठल…तुझ्या आईबाबांच्या नि आमच्या मनात कायम प्रकट राहशील…ईश्र्वर तुझ्या आत्म्यास चिरशांती देवो…🙏🙏😭😭
जिंदगी हमे देखो किस मोड पर है लायी…
साथ छुटा हैं मगर फिर भी यादो ने मिटाई तनहायी..😭😭
आनंद तुझ्या ‘वर्ष-श्राद्ध’ निमित्ताने तुला..
शत शत नमन!
कधी कधी होतं काय
वेदना या ओंजळीत मावत नाय
कधी ती डोळ्यातून ओझरते
तर कधी लेखणीतून कागदावर उतरते
कधी त्या वेदनेचा होतो वेद
तर कधी तिचा होतो भयानक उद्रेक
कधी तिला मिळतो मायेचा हात
तर कधी तिची होते हेटाळणी क्षणातं
कधी ती करते आतून खंबीर
तर कधी तिच्या मुळे सुटतो मनाचा धीर
कधी ती असते दृश्य शरीराची
तर कधी असते ती या अदृश्य मनाची
जेंव्हा त्या वेदनेला भेटते संवेदना
कळतो आयुष्याचा खरा अर्थ तेंव्हा या मना
आज तुझ्या जाण्याच्या वेदनेचा ही वेद झाला आहे....एक असा वेद जो कायम आम्हाला हे जीवन जगताना मार्गदर्शन करत राहील...
शेवटी जाता जाता .....उगाचचं या ओळी आज पुन्हा एकदा कानात कल्लोळ करू लागल्या आहेत....
‘बाबू मोशाय, हम सब तो रंगमंच की कठपुतलियां हैं, जिसकी डोर ऊपर वाले के हाथ में है, कौन कब कहां उठेगा, ये तो कोई नहीं जानता'.
भावपूर्ण श्रद्धांजली…आनंद.🙏🙏😭
“आनंद मरा नहीं, आनंद मरते नहीं”.
“शब्दांकन”
डॉ अमित लाड.
शिल्पा हॉस्पिटल.
नवजात शिशू व बालरोग तज्ञ.
बार्शी.