निमित्त बार्शीतील कथित शेअर घोटाळ्याचे : रोडपती…. करोडपती…. वाचा सविस्तर-

0
185

निमित्त बार्शीतील कथित शेअर घोटाळ्याचे : रोडपती…. करोडपती…. वाचा सविस्तर-

बार्शी : मराठवाड्याचे प्रवेशद्वार म्हणून ओळख असलेली मोठी बाजारपेठ व्यापार उद्योगाचे शहर असलेल्या बार्शीत अनेक करोडपती लोक राहतात. बदलत्या काळात प्रत्येक प्लॉट, गल्ली, मोहोल्ला मध्ये अनेक करोडपती पहायला मिळतात. बंगला, भारी गाडी, उच्च प्रतीचे राहणीमान ऐशो आराम अशीच कशीही ओळख करोडपती लोकांची झालेली आहे.

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

असेच करोडपती होऊन ऐशो आरामात जगण्याचे, भविष्यकाळ सुखकारक करण्याचे स्वप्न आजचा तरुण पहात आहे. पण अलीकडील काही घटना पाहता कष्ट न करता शॉर्ट कट चा वापर करून जुगार, मटका, पैजा आणि आता नव्याने शेअर मार्केट कडे आकर्षीत होणाऱ्यांची संख्या वाढती आहे. शॉर्ट कट स्वीकारून अल्पवाढीत बक्कळ पैसा कमावण्याच्या नादात हातात आहे ते गमावून बसण्याची वेळ अनेकांवर ओढवली जाते.

मागील काही दिवसापूर्वी बार्शी येथे शेअर मार्केट गुंतवणूक आणि त्याबद्दल दाखल झालेला गुन्हा या कारणाने बार्शीची चर्चा अख्या महाराष्ट्रात झाली आहे. सदर प्रकार काय खरे काय खोटे हे सर्व पोलीस तपासात समोर येईलच. या निमित्ताने आजच्या तरुणांच्या डोक्यात काय विचार चालू आहेत आणि त्याला योग्य पर्याय काय देता येतील याच्यावर चर्चा होणे आवश्यक आहे.

संपूर्ण जगावर मागील दोन वर्षापासून कोरोनाचे संकट ओढवले आहे. त्यामुळे सर्व शाळा, महाविद्यालय, विविध सांस्कृतिक, सामाजिक कार्यक्रमांवर बंदी आहे. आशा कारणांनी तरुणांच्या मनात एक निराशेचे वातावरण निर्माण झाले आहे. कमीअधिक प्रमाणात बहुतांश लोक आर्थीक संकटात आहेत. त्यामुळेच आजचा तरुण शॉर्टकट चा मार्ग अवलंबत अल्पावधीतच करोडपती होण्याचे स्वप्न पहात आहे पण त्यातील धोक्यांकडे दुर्लक्ष करत आहे.

शॉर्टकट ने पैसा मिळवता येत नसतो त्यासाठी कष्ट, अभ्यास, चिकाटी याशिवाय पर्याय नाही ही गोष्ट समजावून सांगणे गरजेचे झाले आहे. आध्यत्मिक, वैचारिक, सांस्कृतिक, सामाजिक चळवळ असलेल्या बार्शीत अनेक उत्तम उदाहरणे आहेत ज्यांनी कष्टातून मोठे विश्व निर्माण केले आहे. असेही अनेकजण आहेत जे काबाड कष्ट करून आपल्या परिवाराची रोजीरोटी व उदरनिर्वाह करतात. रिक्षा चालवणारे, बिगारी, बांधकाम करणारे, चहा विक्रेते, फळे-भाजीपाला विक्रेते वडापाव भेळ, हातगाडीवाले अशी अनेक उदाहरणे देता येतील जे कष्ट करून परिवाराचे पालनपोषण करतात. आपल्या गरजा मर्यादीत ठेवल्या तर अल्प उत्पन्नातही सन्मानाचे आयुष्य जगत आहेत.

आज वाढलेली लोकसंख्या व त्यांच्या विविध गरजा यांचा बारीक अभ्यास केला तर आपल्याला आसपास अनेक छोट्या-मोठ्या उद्योगाच्या संधी निर्माण होऊ शकते. आपल्या आसपास असे अनेक व्यवसाय असतात की जे छोटे आहेत पण त्यामधून मिळणारे उत्पन्न आपल्या कल्पने पेक्षा कैक पटीने अधिक असते.

आजच्या या भागातून आम्ही एकच सांगू इच्छितो की तरुणांनो कष्टाला पर्याय नाही. शॉर्टकट चा वापर करू नका. उद्योग, व्यवसाय, सेवा आशा विविध क्षेत्रात कामाची संधी मोठी आहे ती शोधा. याचे कारण मनामनांत क्रांतीची ठिणगी पेटविणारे थोर साहित्यसम्राट, महान शाहीर अण्णाभाऊ साठे यांनी आधीच सांगून ठेवलेले आहे. ‘पृथ्वी ही शेषनागाच्या मस्तकावर तरली नसून, कष्टकऱ्यांच्या व श्रमिकांच्या तळहातावर तरली आहे,’ बार्शीत कामगार नेते तानाजी ठोंबरे सर यांनी या गोष्टीचा जागर अनेक भाषणातून केला आहे.

कष्टकरी, श्रमिक, रस्त्यावर काम करून चांगले उत्पन्न मिळवणारे, परिस्थिती नाजूक आहे म्हणून रडत बसत नशीबाला दोष न देता परिस्थितीशी दोन हात करणारे जग त्यांना रोडपती म्हणजे रस्त्यावर काम करणारे समजते पण तेच आमच्यासाठी मनाने, श्रमाने खऱ्या अर्थाने करोडपती आहेत त्यांच्या छोट्या छोट्या यशोगाथा आपल्यासाठी घेऊन येत आहोत.

(पुढील भागा पासून क्रमशः)

(शेअर मार्केट गुंतवणूक अभ्यासपूर्वक केल्यास फायदेशीरही आहे, वरील लेखात शेअर मार्केट चा संदर्भ बार्शी येथे दाखल झालेल्या गुन्ह्या च्या अनुषंगाने वापरला आहे)

सुदर्शन हांडे बार्शी

Best IT Comany In Maharashtra , Solapur

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here