सोन्याचे नकली बिस्किट देऊन,दोन तोळे खरे सोने घेवून वृध्द महिलेची फसवणूक: बार्शी तालुक्यातील सासुरे येथील प्रकार
वैराग: सोन्याचे नकली बिस्कीट देऊन दोन तोळे खरे सोने घेऊन #वृद्धेची फसवणूक केल्याची घटना वैराग येथे घडली. याबाबत दोघा अज्ञातांविरोधात वैराग पोलिस ठाण्यामध्ये गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

याबाबत वैराग पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, सासुरे येथील यात्रेसाठी पुण्यातून अलका तुकाराम लोंढे (वय ५५) आल्या

होत्या. यात्रेनंतर पुण्याकडे परतत असताना वैराग येथील छत्रपती शिवाजी चौकात दोन अज्ञातांनी तुमचे सोने मला द्या, त्याबदल्यात तुम्हाला मी जास्त वजनाचे सोन्याचे बिस्कीट देतो, असे सांगून अलका यांना भुरळ घातली. यातून अलका यांनी त्यांच्या गळ्यातील तीस हजार रुपये किमतीचे एक तोळे सोन्याचे गंठण आणि एक तोळ्याचे डोरले त्यांना दिले.
त्या भामट्याने त्यांनी एक सोन्यासारखे दिसणारे बिस्किट दिले. त्यानंतर अलका या पुण्याला गेल्या. पुण्यात पोहोचल्यानंतर त्यांनी एका सोनाराला ते सोन्याचे बिस्किट दाखवले. सोनाराने हे बिस्किट बनावट असल्याचे सांगितले. त्यानंतर अलका यांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. मात्र राज्यातील एस.टी. बंद असल्यामुळे त्यांना वैराग पोलिस स्टेशनमध्ये येऊन गुन्हा दाखल करण्यास उशीर झाला. याबाबतचा पुढील तपास पोलिस हेडकॉन्स्टेबल सदाशिव गवळी हे करीत आहेत.