सरकारी स्वस्त धान्य दुकानातील विकला जाणारा गहू, तांदूळ काळ्या बाजारात विकण्याच्या उद्देशाने जमवणाऱ्या वैरागच्या मार्केट यार्ड मधील आडत दुकानावर धाड टाकून २ लाख 63 हजार दोनशे पन्नास रुपयाचा सरकारी रेशनचा गहू आणि तांदूळ जप्त करण्यात आला. ही कार्यवाही बार्शी उपविभागीय पोलिस कार्यालय व वैराग पोलीस ठाणे यांच्या संयुक्त पथकाने केली. याबाबत वैराग पोलीसात संशयित आडत व्यापारी सतीश खेंदाड यांच्याविरोधात बार्शी उपविभागीय पोलिस कार्यालय येथील पोलिस संदेश पवार यांनी फिर्याद दाखल केली आहे.

याबाबत वैराग पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, बार्शी तालुक्यातील सरकारी स्वस्त धान्य दुकानातील गहू आणि तांदूळ काळ्याबाजारात विकले जात असल्याचे दिसून आले होते. नुकतेच पनवेल या ठिकाणी तालुक्यातील गहू, तांदूळ पकडण्यात आला होता. याच्या चौकशीसाठी तालुक्यात गोपनीय तपासणी करत असताना वैराग मध्येही रेशनचा गहू आणि तांदूळ काळ्याबाजारात विकला जात असल्याची खबर गुप्तहेरा मार्फत पोलिसांना समजल्याने शनिवारी सायंकाळी बार्शी उपविभागीय पोलिस कार्यालयीन पोलिस अधिकारी खाजगी वाहनाने गस्त घालत असता मार्केट कमिटीमधील गाळा नंबर 93 येथील सतीश अंबऋषी खेंदाड यांच्या आडत दुकानांमध्ये धाड टाकून चौकशी केली.
यावेळी व्यापाऱ्याने गहू, तांदूळ असल्याचे सांगीतले. हा मालकोठून खरेदी केला विचारले असता, माहिती दडवली. याबाबत अधिकृत नोंदी, पावत्या आहेत का? विचारले असता. सदर बाबत काहीही नोंदी नसल्याचे व्यापाऱ्याने सांगीतले. यानंतर पंचा समक्ष दुकानातील पोत्यात असलेला गहू, तांदूळ पाहणी केली असता सदरचा माल रेशनचा दिसून आल्याने कार्यवाही करण्यात आली.

यामध्ये सुमारे पन्नास किलो वजनाचे 257 तांदळाच्या पिशव्याचे एकूण वजन 12,850 किलो वजनाच्या 1 लाख 92 हजार 750 रुपये किमतीचा तांदूळ व 94 पिशव्या गहू, वजन 4 हजार700 किलो चा सुमारे 70 हजार 500 रुपयांचा गहू असे एकूण दोन लाख 63 हजार 250 रुपयाचा एकूण गहू आणि तांदळाचा मुद्देमाल काळ्या बाजारात विकण्याचा उद्देशाने जमा करून ठेवल्याचे दिसून आले. याबाबत पुरवठा अधिकारी यांच्याशी संपर्क साधून दुकानास सिलबंद करत सदर दुकानदारास अटक करून वैराग पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कार्यवाही बार्शी उपविभागीय कार्यालय येथील पो.ना. संदेश पवार व वैराग पोलीस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक राजेंद्र राठोड यांच्या पथकाने केली. सदर संशयित आरोपी विरुद्ध भा.दं.वि.क 420 व अत्यावश्यक सेवा वस्तू अधिनियम 1955 चे कलम 3 व 7 प्रमाणे गुन्हा दाखल झाला आहे. यामुळे वैरागच्या बाजारपेठेत खळबळ उडाली आहे.