हातात असलेले यश कसे गमावतो याचे उदाहरण म्हणजे..
आता काही जणांना राष्ट्रवादी उगच सोडली याचे दु:ख वाटत असेल -जयंत पाटील यांनी वैरागमध्ये केली टीका
सोलापूर : 2019 मध्ये आता काय राष्ट्रवादीची सत्ता येत नाही असे वाटून अनेक जण राष्ट्रवादीला सोडून गेले. मात्र त्यानंतर जे झाले ते सर्वांनीच पाहिले. पवार साहेबांनी (Sharad Pawar) निवडणुकीची सुत्रे हातात घेतली, झंजावती दौरे काढले आणि राष्ट्रवादीची सत्ता देखील आली. जेव्हा अनेक जण राष्ट्रवादीला सोडून बाहेर पडत होते, त्या काळात निरंजन भूमकर हे कायम राष्ट्र्वादीसोबत राहिले. हातात असलेले यश कसे गमावतो याचे इथे अनेकजण उत्तम उदाहरण आहेत, असे म्हणत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील माजी मंत्री दिलीप सोपल यांचे नाव न घेता त्यांना टोला लगावला आहे.

…आज त्यांना पश्चताप होतो
पुढे बोलताना पाटील म्हणाले की, पक्षवाढीसाठी आम्ही प्रत्येक जिल्ह्यात जात आहोत. वैराग नगरपंचायतीमध्ये एक हाती सत्ता आणली. मी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना आवाहन करतो की बार्शी विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादीला मजबूत करण्याची जबाबदारी तुमच्यावर आहे. वैराग नगरपंचायतीला जो काही निधी लागेल तो आम्ही देऊ. 2019 मध्ये अनेक जण राष्ट्रवादी सोडून गेले मात्र त्यांना आपण तेव्हा राष्ट्रवादी उगच सोडली याचे दु:ख वाटत असेल असे यावेळी जंयत पाटील यांनी म्हटले आहे.

राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रेच्या पाचव्या पर्वाच्या आज तिसऱ्या दिवशी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी बार्शी विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेत वैराग येथे कार्यकर्त्यांशी संवाद साधला. वैराग नगरपंचायत निवडणुकीत आपल्याला चांगले यश मिळाले, या विजयाचा हुरुप सर्व कार्यकर्त्यांच्या चेहऱ्यावर दिसत आहे असे सांगत सत्ता खेचून आणल्याबाबत त्यांनी सर्वांचे अभिनंदन केले.

ज्यांनी आयुष्य राष्ट्रवादीसोबत काढले, आदरणीय पवार साहेबांसोबत काढले आणि आता शेवटच्या क्षणी सोडून गेले. मंत्री होणे काहींच्या नशीबात नसेल तर त्याला आपण काय करणार? अनेकांना आज प्रचंड दुःख होत आहे. हे लोक पक्ष सोडून जातील तर पक्ष संपेल असं त्यांना वाटत होतं, मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सावरून उभा राहीला, असा टोला त्यांनी पक्ष सोडून गेलेल्यांना लगावला.
वैरागमध्ये एक चांगली परिस्थिती आहे, तुम्ही नगरपंचायतीमध्ये पक्षाला सत्ता दिली आहे. या भागाचा विकास करण्यासाठी कुठेच कमतरता पडू देणार नाही, तसेच कोणताही निधी कमी पडू देणार नाही, अशी ग्वाही जयंत पाटील यांनी दिली. आपण सर्वांनी २०२४ वर लक्ष ठेवून काम करावे. २०२४ साली राष्ट्रवादीचाच झेंडा इथे फडकेल यासाठी जय्यत तयारी करा, असे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले.
या सभेला पालकमंत्री दत्तात्रय भरणे, महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपालीताई चाकणकर, युवक प्रदेशाध्यक्ष महेबूब शेख, युवक कार्याध्यक्ष रविकांत वर्पे, युवती प्रदेशाध्यक्ष सक्षणा सलगर, विद्यार्थी प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे, निरीक्षक सुरेश घुले, जिल्हाध्यक्ष बळीराम साठे, माजी आमदार दीपकआबा साळुंखे, कार्याध्यक्ष उमेश पाटील, नगरसेवक निरंजन मालक भूमकर, तालुकाध्यक्ष विक्रमकुमार पोळ, सातारा जिल्हा सरचिटणीस ॲड. विक्रम सावळे, युवक प्रदेश पदाधिकारी मंगेश चव्हाण, महेश चव्हाण, महिला तालुकाध्यक्ष देवशाला जाधवर, महिला शहराध्यक्ष रेखाताई तुपे, वैराग नगरपंचायतीचे नूतन नगरसेवक, नगराध्यक्ष सौ. सुजाता डोळसे, नगरसेविका तृप्ती भूमकर आदींसह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.