बार्शी : दारुच्या व्यसनापाई आई समजेना बहिण समजेना असा प्रकार बार्शी तालुक्यात घडला. दारु पिण्यासाठी पैसे न दिल्याने भावाने व मुलाने मारहाण केल्यामुळे महिला जखमी झाली.
याबाबतची माहिती अशी की, रेखा जगन्नाथ सपकाळ (वय ४३), रा. अलीपूर, ता. बार्शी या त्यांच्या मुलगा सोन्या जगन्नाथ सपकाळ याच्यासह अलिपूर येथे रहात होत्या. मुलाला दारु पिण्याचे व्यसन असल्याने व तो नेहमी त्रास देत असल्याने एक महिन्यापूर्वी त्या नरसिंग नाळे, बुडुख वस्ती, सौंदरे यांच्या शेतात काम करुन तेथेच रहायला गेल्या.
दि. १० एप्रिल २०२२ रोजी संध्याकाळी साडेसहाचे सुमारास त्यांचा मुलगा सोन्या व भाऊ बजरंग मोहन तावरे (दोघे रा. अलिपुर ता.बार्शी) हे दोघे तेथे आले, आणि दारु पिण्यासाठी पैसे मागू लागले. त्यांनी पैसे नसल्याचे सांगितल्याचा राग येऊन भाऊ बजरंग तावरे याने तेथेच पडलेली काठी घेऊन त्यांच्या कमरेवर, हातावर व पायावर मारहाण केली. त्यामुळे त्यांचा डावा पाय नडगीवर फ्रॅक्चर झाला. तसेच मुलगा सोन्या सपकाळ याने लाथाबुक्क्यांनी मारहाण केली आणि त्यानंतर ते दोघे शिवीगाळी करत तेथून निघून गेले.
काही वेळाने नरसिंग नाळे व दत्ता ताटे त्या ठिकाणी आले, व दत्ता ताटे यांनी त्यांना ऊपचारासाठी ग्रामिण रुग्णालय, बार्शी येथे आणले. तेथे प्राथमिक उपचार केल्यानंतर, तेथील डॉक्टरांनी पुढील ऊपचाराकरीता सिव्हिल हॉस्पिटल, उस्मानाबाद येथे पाठविले. तेव्हा तेथील डॉक्टरांनी मारहाणीमुळे डावा पाय नडगीजवळ फ्रॅक्चर झाल्याचे सांगितले.
त्यांनी दिलेल्या तक्रारीवरुन मुलगा सोन्या जगन्नाथ सपकाळ व भाऊ बजरंग मोहन तावरे यांचेविरुध्द बार्शी तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
