मान्सून राज्य व्यापण्याच्या तयारीत ; रविवारपासून जोरदार पावसाचा अंदाज
पुणे : राज्याच्या बहुतांश भागात आता नैऋत्य मोसमी वारे दाखल झाले असून, रविवार (ता.१९) नंतर ते सक्रिय होत जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. वेळेआधीच केरळात दाखल होणाऱ्या मॉन्सूनने महाराष्ट्रात पोचायला मात्र तीन दिवस उशीर केला. शनिवारी (ता.११) मॉन्सूनचे वारे राज्यात दाखल झाले मात्र पावसाने उघडीप घेतल्याचे चित्र पाहायला मिळाले आहे. अखेरीस रविवारनंतर राज्यात मॉन्सूनचा पाऊस सक्रिय होण्याचे संकेत आहे. त्यामुळे दक्षिण कोकणात मुसळधार पावसाची तर कोकण आणि मध्यमहाराष्ट्रात जोरदार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे.


अरबी समुद्रात तयार होणारी आद्रता आणि राज्याच्या पश्चिम किनारपट्टीवरील कमी दाबाच्या पटट्यामुळे मॉन्सून सक्रिय होईल, अशी माहिती हवामान विभागाने दिली आहे. कोकण, गोवा आणि मध्यमहाराष्ट्रात या काळात पावसाचा जोर वाढले, तसेच मंगळवार (ता.२०) नंतर उर्वरित राज्यातही मॉन्सून सक्रिय होईल. पुढील दोन दिवस विदर्भ मराठवाड्यात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाटात पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.
शहर आणि परिसरात दुपारनंतर सामान्यतः ढगाळ हवामान तर तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. गुरुवारी दिवसभर आकाश अंशतः ढगाळ होते. तर तुरळक ठिकाणी अतिशय हलक्या स्वरूपाच्या पावसाने हजेरी लावली होती. त्यामुळे वातावरणात काही वेळ गारवा निर्माण झाला होता. ढगाळ हवामान आणि दाखल झालेल्या मॉन्सूनच्या वाऱ्यामुळे शहरातील कमाल तापमानात घट झाली आहे. गुरुवारी सरासरी कमाल तापमान ३४.४ अंश सेल्सिअस नोंदविले गेले.