घनसावंगी ः राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या मातोश्री शारदाताई टोपे यांचे आज प्रदिर्घ आजाराने निधन झाले. मुंबईच्या बॉम्बे हॉस्पिटल मध्ये त्यांच्यावर गेल्या काही महिन्यपासून उपचार सुरू होते. आज रात्री साडेआठ वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पार्थिवावर आज रविवारी दुपारी ४ वाजता कर्मवीर अंकुशराव टोपे सहकारी साखर कारखाना, अंकुशनगर ता. अंबड येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

मार्च महिन्यापासून शारदाताई यांच्यावर मुंबईतील बॉम्बे हॉस्पीटलमध्ये अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. शारदाताई यांचे माहेर दिगी ता. कर्जत जि. अहमदनगर येथील असून माजी पाटबंधारे मंत्री आबासाहेब निंबाळकर यांच्या त्या पुतणी होत. बालपणापासूनच घरातील राजकीय वातावरणात त्या वाढल्या होत्या.
माजी खासदार अंकुशराव टोपे यांच्याशी विवाहबद्ध झाल्यानंतर त्यांनी जिल्ह्यात अंकुशराव टोपे यांच्या सोबत सहकार व शिक्षण चळवळ उभारली. अंकुशराव टोपे यांना राजकीय आणि सहकारी क्षेत्रात शारदाताई यांनी नेहमीच खंबीर साथ दिली. मागील एक वर्षापासून त्या आजारी असल्याने त्यांच्यावर मुंबईत उपचार सुरू होते. मार्चपासून त्या अतिदक्षता विभागात होत्या. उपचारा दरम्यान आज त्यांचे निधन झाले.

दरम्यान, रुग्णालयात उपचार घेत असलेल्या आईकडे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचे लक्ष होते. अनेकदा रुग्णालयात जाऊन त्यांनी त्यांची विचारपूस करुन त्यांना धीरही दिला. राज्यातल्या करोनाग्रस्तांसाठी रात्रंदिवस झटत असतांना यातूनही वेळ काढून ते आईच्या भेटीला रुग्णालयात जायचे. राज्यावर ओढावलेल्या कोरोनाच्या संकटामुळे टोपे वैद्यकीय क्षेत्रातल्या लोकांशी चर्चा, मुलाखती, मीडियाशी बोलणं. केंद्रातल्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधने यात गुंतलेले असायचे.
राज्यात करोनाग्रस्तांची संख्या वाढू नये यासाठी ते खबरदारी घेत आहेत. त्यामुळे आजारी आईची भेट घेण्यासाठी त्यांना फार कमी वेळ मिळायचा. अशाही परिस्थितीत त्यांनी कौंटुबिक जबाबदारी पार पाडतांनाच जनतेच्या सुरक्षेलाही तितकेच महत्व दिले. याबद्दल त्यांचे राज्यातील जनतेने कौतुकही केली.


विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी त्यांचे कौतुक करतांना ‘घरातील अडचण विसरुन तुम्ही राज्यासाठी झटत आहात’, असे गौरवोद्गार काढत राजेश टोपे यांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली होती. वेळ मिळेल तेव्हा राजेश टोपे आईच्या भेटीला जायचे. त्यांची भेट घेऊन धीर द्यायचे, पण गेल्या अनेक दिवसांपासून आजाराशी सुरू असलेली शारदाताई टोपे यांची झुंज आज संपली. शारदाताई यांच्या पश्चात मुलगा राजेश टोपे यांच्यासह मुलगी, सुन, नातवंडे, पुतणे असा परिवार आहे.
शारदाताईंनी समर्थ साथ दिली- अजित पवार
राज्याचे आरोग्यमंत्री तथा राज्य मंत्रिमंडळातील माझे सहकारी सन्माननीय राजेश टोपे यांच्या मातोश्री श्रीमती शारदाताई अंकुशराव टोपे यांचे निधन हा आमच्या सर्वांसाठी मोठा धक्का आहे. मी आदरणीय शारदाताईंना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो.
शारदाताईंनी ज्येष्ठ नेते तथा माजी खासदार स्वर्गीय अंकुशराव टोपे साहेबांना जीवनाच्या प्रत्येक पावलावर समर्थ साथ दिली. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्यासारखा कर्तव्यदक्ष सुपुत्र महाराष्ट्राला दिला. मी स्वर्गीय शारदाताईंच्या स्मृतींना वंदन करतो.
कोरोनाच्या संकटकाळात संपूर्ण राज्याच्या आरोग्याची काळजी घेत असताना राजेश टोपे यांनी त्यांच्या मातोश्रींच्या आरोग्याकडे दुर्लक्ष होऊ दिले नाही. त्यांनी मातोश्रींचीही तितक्याच तन्मयतेने काळजी घेतली. आज मी, राज्य मंत्रिमंडळातील सर्व सहकारी आणि राज्यातील समस्त जनता राजेश टोपे कुटुंबियांच्या दुःखात त्यांच्यासोबत आहोत. स्वर्गीय शारदाताई यांच्या आत्म्यास शांती लाभो हीच प्रार्थना, अशा शब्दांत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी श्रद्धांजली अर्पण केली.