पर्थ: कोरोनाच्या संकटामुळे (corona pandemic) जगभरातील लोक मोठ्या संख्येने बेरोजगार (jobless) झाले आहेत. त्यांच्यासमोर रोजगाराचे संकट उभे राहिले आहे. पण याच कठीण काळात एका व्यक्तीच्या आनंदाला मात्र पारावार राहिलेला नाही, जेव्हा त्याला जवळपास 31 कोटी रुपयांची लॉटरी लागली. कोरोनाच्या संकटादरम्यान या व्यक्तीचीही नोकरी गेली होती आणि आपले घर चालवण्यासाठी त्याला अडचणी येत होत्या.

लॉटरीने असे बदलले नशीब
ही घटना ऑस्ट्रेलियामधील पर्थ येथील आहे. जेथे या व्यक्तीने काही दिवसांपूर्वी आपली नोकरी गमावली होती. त्यांची एक तीन वर्षांची मुलगी आहे आणि नोकरी गेल्यानंतर ते आपल्या घराचा खर्च आपल्या याआधीच्या बचतीतून चालवत होते आणि नवी नोकरीही शोधत होते. यादरम्यान ही लॉटरी त्यांच्या जीवनात मोठा आनंद घेऊन आली. त्यादिवशी ते आपल्या मुलीसाठी काही सामान खरेदी करण्यासाठी गेले होते, तेव्हां त्यांनी लॉटरीवेस्टची खूण पाहिली आणि आपले नशीब आजमावायचे ठरवले.
जिंकेन असे अजिबातच वाटले नव्हते

या व्यक्तीला अजिबातच अपेक्षा नव्हती की ते ही लॉटरी जिंकतील. त्यामुळे जेव्हा लॉटरीची घोषणा झाली तेव्हा ते आश्चर्यचकित झाले. अजूनही विजेता पुढे आला नसल्याचे एजंटने सांगितल्यावर त्यांनी आपले तिकीट लक्षपूर्वक पाहिले. आपणच विजेता असल्याचे कळल्यावर त्यांच्या आनंदाला पारावार उरला नाही. या लॉटरीत त्यांनी 58 लाख ऑस्ट्रेलियन डॉलर जिंकले आहेत, ज्याची भारतीय किंमत जवळपास 31 कोटी रुपये आहे.
लॉटरीवेस्टच्या अधिकाऱ्यांना या व्यक्तीने सांगितले, ‘मी घरी जाऊन माझ्या मुलीला मिठी मारू इच्छितो. मी नेहमी म्हणायचो की आयुष्य हे एखाद्या स्वप्नासारखे असू शकते आणि इथे काहीही घडू शकते. मी नेहमी विजेत्यांबद्दल वाचायचो, पण एक दिवस माझेही नाव त्यांच्यात असेल असे मला कधीच वाटले नव्हते.’
आता ते आपले पैसे कसे खर्च करायचे याची योजना आखत आहेत. ते आपल्या भावाची घर घेण्यात मदत करू इच्छितात. सोबतच आपल्या आईसाठी एक कार आणि आपल्या मुलांना चांगले आयुष्य देऊ इच्छितात. त्यांना आपली कॉमर्सची पदवीही पूर्ण करायची आहे आणि लॉटरीत मिळालेली ही मोठी रक्कम चांगल्या पद्धतीने कशी खर्च करायची हेही त्यांना शिकायचे आहे