लोणावळा येथील अपघातात बार्शीतील कांदा व्यापारी लखन शिंदे जागीच ठार; तर एकजण जखमी
बार्शी : मुंबई पुणे एक्स्प्रेस वेवर लोणावळा येथे झालेल्या भीषण अपघातात बार्शीतील प्रसिद्ध कांदा व्यापारी लखन सावळा शिंदे वय ३३ रा राऊत चाळ बार्शी यांचा जागीच मृत्यू झाला आहे. तर बप्पा उर्फ जॉनी जानराव वय ४८ वर्ष रा जामगाव रोड बार्शी हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी तळेगाव दाभाडे येथील पवना हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.


याबाबत अधिक माहिती अशी की मयत लखन शिंदे हे मुंबईत भाऊबीज करून स्वतःच्या खाजगी वाहनाने बार्शी कडे परत निघाले होते. लोणावळ्या जवळ हायवेवर गाडीतून खाली उतरले असता अज्ञात वाहनांच्या धडकेने गंभीर जखमी होऊन मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला आणि जागीच ठार झाले. तर जानराव यांच्या पायाला गंभीर इजा झाली आहे.
लखन शिंदे हे बार्शीतील कांद्याचे प्रसिद्ध आडत व्यापारी होते.महाराष्ट्रा बरोबरच इतर राज्यात ही त्यांचा मोठा व्यापार होता. तसेच शिवभीम ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष होते. याशिवाय त्यांचा बार्शीतील विविध सामाजिक कार्यात सहभाग असायचा त्यांच्या अपघाती निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांच्या पश्चात आई ,वडील, पत्नी, एक मुलगा एक मुलगी, भाऊ बहिणी असा परिवार आहे.