बार्शी : मोटरसायकल अंगावर आल्याने जाब विचारला असता, शिवीगाळ करत चाकूने मामा भाच्यावर हल्ला केल्याची घटना बार्शीच्या तेलगिरणी चौकात घडली.
याबाबत माहिती अशी की, दि. १० एप्रिल २०२२ रोजी एसटी स्टँड चौकातील केशकर्तनालयाचा व्यवसाय करुन चैतन्य रघुनाथ चौधरी (वय २८), रा. खुरपे बोळ, बार्शी व त्याचे मामा विजय सुरेश वाघमारे हे दोघे दुकान बंद करुन रात्री साडेदहाचे सुमारास घराकडे चालत निघाले.
ते दोघे तेलगिरणी चौकातील जाजू टायर्स दुकानाजवळ आले असताना, समोरुन सुनिल अकुंश गुरव, रा. बार्शी हा दारुच्या नशेत वेगात मोटरसायकल चालवत आला. त्याची मोटरसायकल त्याला न आवरल्याने चैतन्य चौधरीचे अंगावर आली. तेव्हा गाडी व्यवस्थित चालवता येत नाही का असा जाब विचारल्यामुळे, गुरवने शिवीगाळी करत पँटच्या मागील खिशात ठेवलेला चाकू काढला आणि चाकूने चैतन्यच्या पोटावर, छातीवर, पाठीवर वार करुन त्याला गंभीर जखमी केले. त्याचे मामा वाघमारे यांनी त्यास सोडविण्याचा प्रयत्न केला असता, त्यांना सुध्दा चाकूने डाव्या बगलेवर मारुन जखमी केले.

सदरचे भांडण बघून चौकात असलेले सागर वाघमारे, विशाल चव्हाण, राहुल जाधव तेथे जमा झाल्याने तो पळून गेला. जखमी मामा भाचे बार्शी शहर पोलिस ठाण्यात आले असता, त्यांना मारणारा इसम हा आधीच तेथे हजर असल्याचे दिसले, व त्याचे नांव सुनिल अकुंश गुरव असल्याचे त्यांना समजले.
याबाबत चैतन्य चौधरीने दिलेल्या तक्रारीवरुन बार्शी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.