स्वतःला मोकळे ठेवा….काही महत्वकांशी टिप्स ! वाचा आणि अंमल करा

0
367

स्वतःला मोकळे ठेवा….काही महत्वकांशी टिप्स !

अमोल चंद्रकांत कदम

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

संपादक, नवी अर्थक्रांती

दुष्काळातल्या एका गावात पाण्याचा टँकर आला होता. पाणी भरण्यासाठी लोकांची एकच झुंबड उडाली होती. त्या ठिकाणचा प्रत्येक माणूस पाणी भरण्यात एवढा व्यस्त होता की, त्याने पाणी भरताना घरातल्या वाट्यासुध्दा भरणे बाकी ठेवले नाही. कारण पुन्हा कधी पाणी येणार याची कोणतीही शक्यता नव्हती.

तेवढ्यात त्यातला एक माणूस मरून पडला. त्याला तीन ते चार दिवसापासून पाणी प्यायला मिळालेले नव्हते. तहानेने व्याकुळ होऊन त्याने जीव सोडला. टँकर गावात आल्या आल्या त्याने तीन दिवसाची तहान भागवायची सोडून तो पुढील दिवसासाठी पाणी साठवण्यात गुंतून गेला. त्यात तो एवढा गुंतला की, पाणी भरता भरता पाण्याने व्याकुळ होऊन त्याचा जीव गेला.

दुसरी गोष्ट एका राजाच्या दरबारात काम करणाऱ्या शिपायाची आहे. शिपायाने राजाच्या जीवावरचे संकट स्वतःचा जीव धोक्यात घालून परतावून लावले होते. त्यामुळे राजा त्याच्यावर खूपच खूश झाला. राजाने त्याला बक्षीस म्हणून जेवढी पाहिजे तेवढी जमीन दान देणार असे सांगितले. मात्र सकाळी सूर्य उगवल्यापासून सूर्य मावळेपर्यंत तो शिपाई जेवढे अंतर धावत जाऊन परत येईल, तेवढी जमीन त्याला मिळणार ही अट राजाने शिपायाला घातली.

दुसऱ्या दिवशी सकाळी बरोबर सूर्योदयाला हा शिपाई राजाला सांगून जमिनीसाठी धावू लागला. त्याला जेवढी जास्त जमेल तेवढी जमीन घ्यायची होती. कारण एकच दिवस मेहनत (ती पण केवळ धावण्याची मेहनत) केल्यावर त्याला मोठ्या जमिनीचा लाभ होणार होता. त्यामुळे त्याने ठरवले की, आजच्या दिवसात थोडीसुध्दा उसंत न घेता धावायचे. सूर्य माथ्यावर आला तरी तो धावत होता.

उन्हाने जीव कासावीस झाला तरी तो थांबला नाही. दुपारी एक वाजता त्याने परतीचा प्रवास सुरू केला. सूर्य मावळताना तो मूळ जागेवर परत आला. राजा त्याची वाट पाहत तिथे उभा होता. सूर्य बुडाला त्याचवेळी तो शिपाई मूळ जागेवर पोहोचला. पोहोचता क्षणी तो तोल जाऊन राजाच्या चरणावर कोसळला. जागीच्या जागी मरून गेला.

त्याने सकाळपासून अन्नाचा एक कणसुध्दा घेतला नव्हता. एवढेच काय तो मध्ये पाणी पिण्यासाठी थांबला नव्हता. त्यामुळे शरीरातला रक्तप्रवाह एवढ्या वेगाने व्हायला सुरवात झाली की, रक्तवाहिन्या फोडून बाहेर आले. त्यातच तो मरून गेला. किती जमीन मिळाली? हे पाहण्याची उसंत देखील त्याला मिळाली नाही.

मी असे कितीतरी लोक पाहिले आहेत की, सकाळी उठल्यापासून रात्रीपर्यत राब राब राबतात. तरीसुध्दा त्यांच्यासमोरचा कामाचा डोंगर संपतच नाही. एवढंच काय तर अंथरूणावर पाठ टेकता क्षणी मरून पडल्यासारखी गाढ झोप त्यांना लागते. झोपेत त्यांना स्वप्ने सुध्दा पडत नाहीत. सकाळी उठले की, परत कामाला जुंपले जातात.

एवढ्या प्रचंड कामानंतरही त्यांच्या आयुष्यात विशेष असे काही घडत नसते, एवढीच एक विशेष गोष्ट असते. कशासाठी लोक स्वतःला एवढे गाडून घेतात. ठरवून देखील सहा सहा महिने उलटून गेले तरी दोन तासाचा एक सिनेमा पाहून होत नाही. एवढेच काय हे लोक कामात एवढे व्यस्त असतात, एवढे देहभान हरपून काम करत असतात. त्यांना जेवायला सुध्दा वेळ काढता येत नाही. काही काही दिवस तर एखाद्या वेळचे जेवण सुध्दा करायचे राहून जाते. एवढा अट्टहास कशाला? एवढा कुटाणा कशासाठी?

उद्योगात प्रगती करण्यासाठी संधीच्या क्षणांवर वाघाप्रमाणे झडप घालून तिच्यावर स्वार झाले पाहिजे. तरच या संधीचा फायदा होईल. रात्री स्वप्ने नाही पडली तरी चालतील, स्वप्नांनी झोप उडवली तरी चालेल. जेवायला ही वेळ मिळाला नाही तरी चालेल. मात्र हे सर्व करत असताना स्वतःसाठी थोडा तरी वेळ मोकळा ठेवायला पाहिजे. जीवनात किती प्रगती केली? याचा आढावा तरी घेतला पाहिजे. नवीन संधी घेण्यासाठी प्रगतीचा वेग वाढवण्यासाठी तरी वेळ पाहिजे. मी कॉलेजमध्ये असताना एक मेसेज फिरायचा.

मेहनत करणे म्हणजे सर्वकाही नाही. कारण गाढव २० तास मेहनत करते व चार तास झोपते. सिंह साडेतीन तास नुसता फिरतो. अर्ध्या तासात शिकार करून खातो व २० तास झोपतो. तरीसुध्दा जंगलाचा राजा गाढव नसून सिंह असतो. आपल्याला आपल्या उद्योगातील गाढव बनायचे आहे की, सिंह बनायचे आहे.

हे प्रत्येक उद्योजकाने ठरवले पाहिजे. सिंह बनायचे म्हणजे २० तास झोपायचे असा अर्थ होत नाही. तर सिंहाने त्याच्याकडे असे काही गुण निर्माण केले आहेत की, त्यामुळे तो जंगलावर हुकूमत गाजवू शकतो. त्यामुळे उद्योगात सुध्दा कमी वेळेत काम करून जास्तीत जास्त गुणवत्ता निर्माण केली पाहिजे. एकंदरीत उद्योजकाने स्वतःला मोकळे ठेऊन नवीन संधीचा लाभ घेतला पाहिजे. तरच व्यवसाय वाढेल. तुमच्या हातात आधीपासूनच दहा बॅगा आहेत. तर तुम्ही अजून बॅगा स्वीकारू शकत नाही. त्यासाठी तुमचे हात मोकळे असले पाहिजेत.

संधीच्या साम्राजातील सम्राट व्हायचे असेल तर स्वतःला मोकळे ठेवले पाहिजे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here