तारुण्यात अंधत्व वाट्याला आल्यानंतर खचून न जाता नैराश्यावर मात करुन जयंत मंकलेच यूपीएससीत घवघवीत यश

0
450

????”युपीएससीच्या परीक्षेत त्यानं देशात 143 वा क्रमांक पटकावलाय. त्यामुळं यावेळी तरी जयंतला सनदी अधिकारी बनण्याची संधी मिळेल अशी आशा वाटतेय. वयाच्या बावीस – तेविसाव्या वर्षापर्यंत जयंत इतर कोणासारखाच सर्व काही पाहू शकत होता , बघू शकत होता.”

नांदेड(दि.7ऑगस्ट):-युपीएससीची परीक्षा पास होणं किती खडतर असतं हे आपण सगळं जाणतो . पण ही खडतरता देखील गौण वाटावी अशी कहाणी आहे. जयंत मंकले नावाच्या जिद्दी तरुणाची. तारुण्यात अंधत्व वाट्याला आल्यानंतर खचून न जाता जयंत चक्क युपीएससीची परीक्षा उत्तीर्ण झाला. ते ही एकदा नव्हे तर दोनदा.

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

2017 साली युपीएससी परीक्षेत यश मिळवूनही तांत्रिक कारणांमुळे जयंतला पोस्ट मिळाली नव्हती . मात्र त्यामुळं हार न मानता जयंत नेटाने प्रयत्न करत राहिला आणि मंगळवारी जाहीर झालेल्या युपीएससीच्या परीक्षेत त्यानं देशात 143 वा क्रमांक पटकावलाय. त्यामुळं यावेळी तरी जयंतला सनदी अधिकारी बनण्याची संधी मिळेल अशी आशा वाटतेय. वयाच्या बावीस – तेविसाव्या वर्षापर्यंत जयंत इतर कोणासारखाच सर्व काही पाहू शकत होता , बघू शकत होता.

मूळच्या बीड जिल्ह्यातील असलेल्या जयंतीचा अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेरमधील अमृतवाहिनी कॉलेजमध्ये इंजिनियरिंगसाठी नंबर लागला. चार वर्षांचा इंजिनियरिंगचा कोर्स पूर्ण होत आलेला असतानाच अचानक जयंताला कमी दिसायला लागलं . हळूहळू दृष्टी अधू व्हायला लागली.

इंजिनियरिंग पूर्ण झाल्यावर त्यानं पुण्याजवळील भोसरीतील एका कंपनीत नोकरी धरली . पण डोळ्यांची ताकद दिवसेंदिवस कमी होत चालली होती . पुढं कंपनीत काम कारण अवघड जाऊ लागल्यावर जयंतला नोकरी सोडावी लागली . डॉक्टरांकडे जाऊन तपासणी केली असता त्याला अतिशय दुर्धर असा डोळ्यांचा आजार जडला होता . या आजारामध्ये व्यक्तीची दृष्टी हळूहळू कमी होत जाऊन तो पूर्ण अंध होतो.

तारुण्यात जयंतच्या वाट्याला हा आजार आला होता . ज्या वयात रंगीबेरंगी स्वप्नं पाहायची त्या वयात डोळ्यासमोर कायमचा अंधार दाटून आल्यावर कोणीही खचून जाणं साहजिक . पण इथूनच जयंतच्या आगळ्या वेगळ्या कहाणीला सुरुवात झाली.

जयंत आणि त्याच्या कुटुंबीयांनी पुण्यातील धायरी भागात एक फ्लॅट भाड्यानं घेतला आणि त्यानं चक्क युपीएससी परीक्षेचा अभ्यास सुरु केला. सुरुवातीला जयंतला थोडं थोडं वाचता यायचं . मात्र त्यासाठी खोलीत अंधार करावा लागायचा . त्याच्या डोळ्यांना सूर्यप्रकाश अजिबात सहन व्हायचा नाही. खोलीत अंधार करून पुस्तकावर ल्यांपचा प्रकाश टाकून तो वाचन करायचा.

त्याचबरोबर ज्या मोबाईलची स्क्रीन काळ्या रंगाची आणूनि अक्षरे पांढरी आहेत असा नोकिया कंपनीच्या विशिष्ट मोबाईलवर त्याला वाचता यायचं. सोबतीला तो यु ट्यूबवरून ऑडिओ बुक्स ऐकायचा. या सगळ्याच्या आधारे त्यानं 2017 ला युपीएससीची परीक्षा दिली आणि त्यानं देशात 923 वा क्रमांक पटकावला. त्याच्या या यशानं त्याला मदत करणाऱ्या सगळ्यांनाच आनंद झाला.

पण त्याच्यासमोर एक तांत्रिक समस्या उभी राहिली आणि हातातोंडाशी आलेली सनदी अधिकाऱ्याची पोस्ट त्याला गमवावी लागली. त्यावर्षी अंध विद्यार्थ्यांसाठी आपल्या देशात एकूण राखीव जागा होत्या पाच आणि जयंतचा अंधांमध्ये देशातील क्रमांक होता सातवा. पूर्णपणे अंध आणि काही प्रमाणत अंध असणं यासाठी वेगवेगळा कोटा असला तरी त्यात स्पष्टता नसल्याचा फटका जयंतला बसला.

दिल्लीला जाऊन त्यानं युपीएससी आणि सरकार दरबारी प्रयत्न करून पहिला. राजकारण्यांच्या बंगल्याचे उंबरठेही झिजवले . पण दाद मिळत नाही हे पाहून न्यायालयात याचिकाही दाखल केली . जयंतच 2018 हे वर्ष या सगळ्या धावपळीतच गेलं. दुसरीकडे जयंतच्या दृष्टीने त्याची संपूर्णपणे साथ सोडली होती आणूनि तो पूर्णपणे अंध झाला होता .

इथून पुढचा प्रवास तर आणखी खडतर होण्याची चिन्ह होती.पण जयंतने पुन्हा कंबर कसली. पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयात चालवल्या जाणाऱ्या अंधांच्या प्रशिक्षण कार्यक्रमात तो सहभागी झाला आणि यु पी एस सी चा त्यानं नव्यानं अभ्यास सुरु केला . 2019 ला त्यानं पुन्हा परीक्षा दिली. पण परीक्षेनंतर नशीब कोणत्या वळणावर घेऊन जाईल याची खात्री नसल्यानं त्यानं बँकेचीही एक परीक्षा दिली आणि ती उत्तीर्ण झाल्यानं त्याला पुण्यातील बॅंक ऑफ महाराष्ट्रच्या एका शाखेत नोकरी मिळाली.

जयंत जिथे राहतो तिथले एक रिक्षावाले काका त्याला दररोज बँकेत घेऊन जायचे आणि काम संपले की रिक्षातून घरी परत घेऊन यायचे . हे असं सुरु असतानाच मंगळवारी युपीएससीचा निकाल लागला . यावेळी जयंतने मोठी झेप घेतली आणि देशात 143 वा क्रमांक पटकावला. या त्याच्या रॅंककडे पाहता तो देशात जेवढी अंध मुलं यावेळी युपीएससी उत्तीर्ण झालीयत त्यांच्यामध्ये पहिल्या तीनमध्ये येईल अशी त्याला आशा आहे.

पुढच्या पुढच्या आठ दिवसांमध्ये युपीएससी उत्तीर्ण झालेल्या अंध विदयार्थ्यांची यादी जाहीर होईल . त्या यादीत यावेळी तरी आपला क्रमांक लागेल अशी जयंतला अशा आहे. हे सगळं कसं केलं असं विचारल्यावर जयंत एकच उत्तर देतो तो म्हणाला, डोळ्यांना अंधत्व आलं तरी मी दृष्टिकोन गमावला नाही . हा सकारात्मक दृष्टिकोन त्याला दुसऱ्यांदा सनदी अधिकारी बनण्यापर्यंत घेऊन आलाय. आयुष्याकडे पाहण्याचा जयंतचा हा डोळस दृष्टिकोन फक्त स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्यांसाठीच नव्हे तर सर्वांसाठीच नवी वाट दाखवणारा ठरावा.

Best IT Comany In Maharashtra , Solapur

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here