श्रावणमास प्रवचनमाला सांगता :
जगद्गुरु संत तुकाराम महाराजांची गाथा म्हणजे भक्तीचा कळस होय -गुरुवर्य डॉ. जयवंत महाराज बोधले
बार्शी: संत तुकाराम महाराज महाराजांचे चरित्र म्हणजे भक्तिरसाने ओतप्रोत भरलेले आहे. समाजातील सर्व घटकांना प्रिय असणारे हे चरित्र होय. तुकाराम गाथा म्हणजे भक्तीचा कळस होय असे विवेचन गुरुवर्य डॉ. जयवंत महाराज बोधले यांनी केले.

येथील भगवंत मंदिरात सुरु असलेल्या श्रावणमास प्रवचनमालेच्या सांगता समारंभात ते चिंतन करीत होते. प्रवचनमालेने यावर्षी १८ वर्षे पूर्ण केली आहेत. यंदा संत तुकाराम महाराज चरित्र व तत्वज्ञान हा विषय होता.यावेळी आमदार राजेंद्र राऊत, माजी मंत्री दिलीप सोपल, देवस्थान चे अध्यक्ष दिलीप बुदुख, सद्गुरु प्रभाकर बोधले,भाग्यलक्ष्मी बोधले,आश्विनीताई बोधले, बंधू ह.भ.प.यशवंत महाराज बोधले उपस्थित होते.

या निमित्ताने संदीप नागणे यांनी भगवंत मंदिराला आकर्षण फुलांनी केलेल्या सजावटीने वेधले होते. मंदिराच्या पुर्वद्वार तसेच पश्चिमद्वारासमोर काढलेली सुशोभित रांगोळी भाविकांसाठी चित्तवेधक होती.


सद्गुरु प्रभाकरदादा आर्शीवचनात म्हणाले की,संत तुकाराम महाराजांचे चरित्र सर्व प्रापंचिक माणसाला आदर्शवत मार्ग दाखवणारे आहे. त्यांच्या चरित्राकडे चमत्कारिक वृत्तीने न पाहता. त्यातून दिलेल्या बोधाचा मागोवा घेतला तर कल्याणाचा मार्ग मिळाल्याशिवाय राहत नाही असे सांगितले.


राजेंद्र राऊत यांनी बार्शीमध्ये ‘भक्तनिवास’ उभारणी लवकरच सर्व भाविकांच्या सेवेत असेल; त्यामुळे बाहेरगावच्या श्रोत्यांना प्रवचनमालेचा आनंद महिनाभर घेता येईल , असे सांगितले.

दिलीप सोपल यांनीही प्रवचनमालेच्या सुवर्ण महोत्सवी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. बोधराज भक्त मंडळातील सोमनाथ ढगे , तुकाराम माने, ऍड नितीन शिंदे ,अमृत राऊत यांनी डॉ. जयवंत महाराजांना संत तुकाराम महाराजांसदृश पोषाख देऊन गुरुपुजन केले.

त्याचबरोबर, या प्रवचनमालेत मोलाचे जबाबदारी स्विकारुन सेवा करणारे भगवंत देवस्थान ट्रस्ट सरपंच दिलीप बुडूख यांनीही सद्गुरु दादा, गुरुवर्य डॉ. जयवंत महाराज यांचे पुजन केले.

रवीअण्णा राऊत यांनी भाविकांना प्रसादवाटपाची सेवा केली .प्रा. रजनी जोशी, मुकुंद कुलकर्णी,मंगेश दहिहंडे यानी मनोगते व्यक्त केली. प्रा. विलास जगदाळे यांनी सूत्रसंचालन केले. संत तुकाराम महाराजांच्या नामावलीनंतर नेहमीप्रमाणे पसायदानाने सांगता झाली.
