तो रुटीन निधी’, सोपलांनी खोटे बोलून लोकांना फसवू नये- आमदार राजेंद्र राऊत
बार्शी:तालुक्याचे माजी लोकप्रतिनिधी आणि आणि आमचे पारंपरिक विरोधक दिलीप सोपल यांनी आज बार्शीतील रस्त्यांसाठी पालकमंत्री यांच्याकडून 11 कोटींचा निधी मंजूर करून आणला असल्याचे सांगितले. वास्तविक या निधी मंजुरीचा आणि त्यांचा काही संबंध नाही. या निधीसाठी चे प्रस्ताव आमची सत्ता असलेल्या पालिकेकडून सर्व प्रक्रिया पार पाडून सादर केलेले आहेत. त्यानुसार लोकसंख्येच्या प्रमाणात हा निधी देणे शासनाला बंधनकारक आहे. त्यामुळे सोपल यांनी खोटे बोलून लोकांना फसवू नये अशी खरमरीत टीका आमदार राजेंद्र राऊत यांनी पत्रकार परिषदेत केली.

सोपल यांच्या प्रसिद्धी पत्रकाच्या अनुषंगाने आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
आम. राऊत पुढे म्हणाले की,त्यांना कायम खोटे बोलायची सवय आहे. त्यांना पालिकेतील त्यांचे नगरसेवक सांभाळता येत नाहीत. विकासकामांकडे त्यांचे दुर्लक्ष आहे.

आमच्या गटाचे नगराध्यक्ष आसिफ तांबोळी व सर्व नगरसेवक यांनी सर्व्हे करून, सभागृहात ठराव करून, त्याच्या तंत्तिक मंजुऱ्या घेऊन तसे प्रस्ताव शासनाकडे सादर केले आहेत. आणि जिल्हा नियोजन समिती च्या बैठकीत पालकमंत्री त्याना मंजुरी देत असतात. मी तिथे सदस्य आहे. अशा प्रकारे चार वर्षात शेकडो कोटींचा निधी मंजूर झाला आहे. आम्ही त्याची माहिती कधी पत्रकाराना देण्याचा प्रयत्न केला नाही.तसेच ते म्हणतात त्या निधीची कोणतीही ऑर्डर पडलेली नाही.

सोपल यांनी लोकांची दिशाभूल करू नये. जनतेने पालिकेत मोठ्या फरकाने तुम्हाला नाकारले आहे. उगीच मंत्र्या सोबत फोटो काढून नौटंकी करू नये. हा रुटीन निधी आहे. त्यामुळे तो मी आणला म्हणायचा नैतिक अधिकार त्यांना नाही असे आमदार राऊत यांनी स्पष्ट केले. तसेच तालुक्यात काय चालले आहे हेच त्याना माहीत नसते. त्यांच्या कोणत्या पत्रावरून हा निधी आला हे त्यांनी सांगावे असे आव्हान राऊत यांनी दिले.यावेळी राऊत यांनी चार वर्षात किती निधी कोणत्या योजेतून आला. तसेच आणखी निधी मिळवण्यासाठी किती रुपयांचे किती प्रस्ताव सादर केले आहेत याची कागदपत्रे दाखवली.
यावेळी नगराध्यक्ष आसिफ तांबोळी, रावसाहेब मनगिरे,नगरसेवक दीपक राऊत, विजय राऊत, विजय चव्हाण उपस्थित होते.