बाजारपेठेत वाहन बंदी,व्यापाऱ्यांना दुकान उघडण्यापूर्वी कोरोना चाचणी बंधनकारक
बार्शी: बार्शी शहरात जिल्हाधिकारी यांनी जाहीर केलेल्या लॉकडाऊन ची मुदत आज संपत असल्याने व शहरातील कोरोना रुग्णांची वाढ काही केल्या कमी होत नसल्याने शहरातआणखीन पाच दिवसांचा जनता कर्फ्यु करण्यात यावा असा निर्णय आज झालेल्या बैठकीत घेण्यात आला.या निर्णयाला व प्रांताधिकारी यांच्या अहवालाला सकारात्मक घेत जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी ही आदेश काढत लॉकडाऊन ला 31 ऑगस्ट पर्यंत मुदतवाढ दिली आहे. पूर्वी जसा सुरू आहे तसाच हा वाढीव लॉकडाऊन असणार आहे.

प्रांताधिकारी हेमंत निकम यांच्या अध्यक्षतेखाली आज नगरपालिका सभागृहात घेण्यात आलेल्या बैठकीला आमदार राजेंद्र राऊत,माजी मंत्री दिलीप सोपल, पोलिस उपअधीक्षक डॉ सिध्देश्वर भोरे, तहसीलदार डी एस कुंभार, मुख्याधिकारी शिवाजी गवळी, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ संतोष जोगदंड, वैद्यकीय अधीक्षक डॉ शीतल बोपलकर, सपोनि शिवाजी जायंपात्रे,नगरसेवक सुभाष लोढा, किराणा असोसिएशनचे अध्यक्ष अविनाश तोष्णीवाल, कापड दुकानदार संजय खंडवीकर,मर्चंट असोसिएशनचे सचिन मडके, आदी उपस्थित होते.

यावेळी प्रांताधिकारी निकम म्हणाले की आजपर्यंत बार्शीतील सर्वांच्या सहकार्याने च लॉक डाऊन यशस्वी झाला आहे तोच लॉकडाऊन आणखीन पाच दिवस वाढवण्यासाठी व्यापाऱ्यांची मागणी आहे.त्यानुसार जिल्हाधिकारी मान्यता देतील.

लॉकडाऊन कालावधीत बार्शीतील आरोग्य विभाग, नगरपालिकेच्या माध्यमातून कंटेंटमेन्ट झोन मधील तपासणी वाढवण्यात आली असून संपुर्ण जिल्ह्यात सर्वाधिक म्हणजे तब्बल दोन हजार रॅपिड टेस्ट घेण्यात आलेल्या आहेत. याशिवाय १७७२ लोकांची आरटीपीसीआर टेस्ट घेण्यात आली आहे अशी माहिती देण्यात आली आहे.
यावेळी विरोधी पक्षनेते नागेश अक्कलकोटे यांनी शहरातील बाजारपेठेत वाहन बंदी करावी अशी मागणी केली. यावर बोलताना प्रांताधिकारी निकम म्हणाले की ही मागणी रास्त असून शहरातील पोलिसांनी याबाबत अंमलबजावणी करावी असे सांगितले.
लॉकडाऊन वाढला आहे तशी प्रशासनाची ही जबाबदारी वाढली आहे. यापुढे कंटेंटमेन्ट झोन मधील कुटुंबाची नियमित आरोग्य तपासणी करावी आशा सूचना देण्यात आल्या आहेत.