आता ‘इन्सिडेंट कमांडर’च्या देखरेखीखाली पंढरपूर ला संतांच्या पालख्या ; वाचा सविस्तर
ग्लोबल न्यूज- आषाढी वारी सोहळ्यात संत तुकाराम महाराज आणि संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पादुका एसटीद्वारे पंढरपूर येथे नेण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. त्याचे योग्य नियोजन करण्यासाठी ‘इन्सिडेंट कमांडर’च्या नेमणूका करण्यात आल्या आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी दिली.
पुणे जिल्हयातून संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज, संत सोपानदेव महाराज आणि संत चांगवटेश्वर देवस्थान या चार संतांच्या पादुका पंढरपूरकडे रवाना होणार आहेत. त्यांचे परत प्रस्थानाच्या ठिकाणी सुरक्षित येईपर्यंत योग्य ते नियोजन करण्याकरीता इन्सिडेंट कमांडर म्हणून नेमणूका केल्या आहेत.
या अधिका-यांची झाली नेमणूक
संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान, आळंदी देवाची करीता खेडचे उपविभागीय अधिकारी संजय तेली (मो.नं. 9405583799), संत तुकाराम महाराज संस्थान, श्रीक्षेत्र देहूकरीता हवेलीचे नायब तहसिलदार संजय भोसले (मो.नं. 9960171046), संत सोपानदेव महाराज संस्थान, श्रीक्षेत्र सासवडकरीता निवासी दौंडचे नायब तहसिलदार सचिन आखाडे (मो.नं. 7875078107), श्री संत चांगवटेश्वर देवस्थान, श्रीक्षेत्र सासवडकरीता पुरंदरचे नायब तहसिलदार उत्तम बढे (मो.नं. 9402226218) यांची इन्सिडेंट कमांडर म्हणून नेमणूक करण्यात आली आहे.

पादुकांची बस कुठेही थांबणार नाही
नेमणुका करण्यात आलेल्या इन्सिडेंट कमांडर यांनी पादुका प्रस्थान केल्यापासून ते परत प्रस्थानाचे ठिकाणी येईपर्यंत नेमून दिलेल्या पालखी संस्थांच्या सोबत राहणे आवश्यक आहे. संबंधित उपविभागीय अधिकारी व संस्थानच्या प्रमुखांशी विचार विनिमय करुन पादूकांचा मार्ग निश्चित करावा. पादुका घेवून जाणा-या बसेस पंढरपूर येथे रात्री 11.00 वाजेपर्यंत पोहचतील याबाबत योग्य ते नियोजन करण्यात यावे. प्रवासादरम्यान दर्शनाला कोणत्याही ठिकाणी बस थांबविण्यात येऊ नये. तसेच, संतांच्या पादुकांसोबत जाणा-या सर्व व्यक्तींनी मास्क वापरणे, दोन व्यक्तींमध्ये अंतर राखणे, वेळोवेळी सॅनिटायझरचा वापर करणे आवश्यक आहे.
योग्य समन्वय ठेवणे गरजेचे
तसेच, या पादुकांचे प्रस्थान झाल्यापासून पंढरपूर येथे पोहचेपर्यंत व परत पंढरपूरहून प्रस्थानाचे ठिकाणी येईपर्यंत सुरक्षित पोहचतील याबाबत जिल्हा पोलीस प्रशासन व जिल्हाधिकारी सोलापूर यांनी नियुक्त केलेल्या विनोद पाटील, श्री रुक्मणीच्या मंदिर समिती, पंढरपूर (संपर्क क्र. 8408026069) यांच्याशी समन्वय करुन योग्य ते नियोजन करण्यात आल्याचेही जिल्हाधिकारी राम यांनी सांगितले.