ग्लोबल न्यूज- मागील 24 तासांत आजवरचे ‘उच्चांकी’ 40,425 नवे कोरोनाबाधित आढळले असून 681 जणांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. याचबरोबर देशातील कोरोनाबाधितांची एकूण संख्या आता 11,1804 वर पोहचली आहे.

देशात सध्या 3,90,459 रुग्णांवर उपचार सुरु आहेत तर आतापर्यंत 7,00,087 जणांनी कोरोनावर मात केली आहे. देशातील रुग्णसंख्या झपाटय़ाने वाढत असताना कोरोनामुक्त होणाऱ्यांचे प्रमाणही वाढत आहे.
गेल्या चोवीस तासांमध्ये 23,672 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून या आजारातून बरे झालेल्यांची संख्या 7 लाखांपेक्षा जास्त आहे. रुग्ण बरे होण्याचे हे प्रमाण 62.86 टक्के आहे.

देशात आतापर्यंत 27,497 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. कोरोना रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण कमी होऊ लागले असून ते पहिल्यांदाच हे प्रमाण अडीच टक्क्यांपेक्षा खाली आले आहे.

राष्ट्रीय सरासरी मृत्यू दर 2.49 टक्के असून 29 राज्यांमध्ये हे प्रमाण राष्ट्रीय सरासरीपेक्षाही कमी आहे, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आली आहे.
देशात आजवर 1,40,47,908 नमूने तपासण्यात आले आहेत. त्यापैकी 2,56,039 चाचण्या या 19 जुलै रोजी करण्यात आल्या आहेत. आयसीएमआरने याबाबत माहिती जाहीर केली आहे.
दरम्यान, भारत बायोटेक या फार्मा कंपनीने पहिली स्वदेशी ‘कोवॅक्सीन’ ही कोरोना विषाणूवरील लस तयार होत असल्याचे जाहीर केले होते. या लसीची मानवी चाचणीही आता सुरु झाली आहे.

दिल्लीतील इंडियन काउंन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चसोबत मिळून फार्मा कंपनी या लशीची मानवी चाचणी घेणार आहे. दोन टप्प्यात ही चाचणी होणार आहे.