औरंगाबादमध्ये दोन दिवसात दोघा शिवसेना नगरसेवकांचा कोरोनाने मृत्यू
औरंगाबाद, ८ जुलै : कोरोना संसर्गाच्या वाढत्या रुग्णांमध्ये सामान्य नागरिकांप्रमाणेच अनेक मोठ्या नेत्यांचाही समावेश आहे. औरंगाबादमध्ये कोरोना संसर्गाने शिवसेनेच्या नगरसेवकांवर मोठा आघात केला आहे. मागील दोन दिवसांमध्ये औरंगाबादमध्ये शिवसेनेच्या दोन नगरसेवकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. नितीन साळवे आणि रावसाहेब आमले असं या नगरसेवकांचं नाव आहे. या घटनेने औरंगाबादमधील शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये दुःखाचं वातावरण आहे.

शिवसेनेचे नगरसेवक रावसाहेब आमले यांना कोरोनाचा संसर्ग झाला होता. उपचारादरम्यानच आज त्यांचा मृत्यू झाला. बुधवारी शिवसेनेचे अन्य एक नगसेवक नितीन साळवे यांचाही कोरोनामुळे मृत्यू झाला होता. सलग दोन दिवसात दोन नगरसेवकांचा मृत्यू झाल्याने आरोग्य यंत्रणेत खळबळ उडाली आहे. आरोग्य विभागाकडून रुग्णांचा मृत्यू रोखण्यासाठी उपाययोजनांवर भर दिला जात आहे.
रावसाहेब आमले या नगरसेवकांवर औरंगाबादमधील खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. त्यांना आज प्लाझ्मा थेरपी दिली जाणार होती. मात्र, त्यापूर्वीच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. शिवसेनेच्या या दोन नगरसेवकांच्या मृत्यूने त्यांच्या कुटुंबासह शिवसेना पक्षाचं मोठं नुकसान झाल्याची भावना अनेक शिवसैनिक व्यक्त करत आहेत.


नितीन साळवे यांच्यावर मागील 7 दिवसांपासून उपचार सुरु होते. ते औरंगाबादच्या बालाजी नगर वार्डतून निवडून आले होते. त्यांच्यावर 7 दिवस उपचारानंतरही त्यांची प्रकृती बिघडत चालली होती. अखेर मंगळवारी (7 जुलै) उपचारादरम्यानच त्यांचा मृत्यू झाला.
दुसरीकडे महाराष्ट्रात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. लोकप्रतिनिधींना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांचे स्वीय सहाय्यक राहिलेले औसाचे आमदार अभिमन्यु पवार यांनाही कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे.