बार्शी – मी हरलो, पण थकलो नाही, शेवटपर्यंत थकणार नाही, असे म्हणत माजी मंत्री दिलीप सोपल यांनी वयोमानावरून सातत्याने टीका करणाऱ्यांना ठणकावून सांगितलं. या तालुक्याने, येथील लोकांनी माझ्यावर प्रेम केलं. म्हणून, कुठलाही राजकीय वारसा नसताना मी आमदार झालो, मंत्री झालो, असेही सोपल म्हणाले. #विपक्ष नेते नागेश अक्कलकोटे यांच्या वाढदिवस अभिष्ठचिंतन सोहळ्यानिमित्त आयोजित कार्यक्रमात सोपल बोलत होते.

आगामी बार्शी नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेत्यांच्या अनुपस्थितीत महाविकास आघाडीच्या एकजुटीची घोषणाच यशवंतराव चव्हाण सभागृहात करण्यात आली. अक्कलकोटेंनी एकप्रकारे आगामी निवडणुकांचे रणशिंगच फुंकले. शहरात सुरू असलेल्या भुयारी गटार योजनेची मंजुरी मी दिल्लीत जाऊन तत्कालीन मंत्री कमलनाथ यांच्याकडून मिळवली, त्यावेळी नागेशही सोबत होते. त्यावेळी, ग्रामदैवत श्री भगवंताची मूर्ती मंत्री कमलनाथ यांना भेट दिली, त्यानंतर 8 दिवसांत योजना मंजुरीचे पत्र आल्याची आठवण त्यांनी सांगितली.
तसेच, पाणीपुरवठा मंत्री असताना बार्शीसाठी पाण्याच्या विविध योजना राबवल्या. मात्र, आज पाण्याची होणारी गैरसोय तुम्हाला माहितीये, असे म्हणत सोपल यांनी सत्ताधाऱ्यांना लक्ष्य केलं. आगामी निवडणुकीत अनुभवाच्या आधारे योग्य तो सल्ला देण्याचं काम मी करेन, आपल्या विजयासाठीचं मार्गदर्शन करेल, असेही सोपल यांनी म्हटलं.
दिलीप सोपल यांच्यावरील निष्ठा हीच अक्कलकोटेंची प्रतिष्ठा, असं बिरुद बार्शीत आहे. दिलीप सोपल यांचं पाठबळ घेऊन आगामी नगरपालिका निवडणुकीत महाविकास आघाडीचा प्रयोग यशस्वी करूयात, सर्वांनी मिळून काम करूया, असे शिवसेना जिल्हाप्रमुख गणेश वानकर यांनी म्हटलं.

पदापेक्षा माणसं मोठी असतात, पद येतात, पद जातात, माणसाचं मोठेपण कायम असतं. राज्याच्या राजकारणात दिलीप सोपल यांचं ते मोठेपण आजही अबाधित आहे, सोपल यांच्या एका फोनवर आजही जिल्हाधिकारी तात्काळ कामे मार्गी लावतात, असे राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष उमेश पाटील यांनी म्हटले. तसेच, मी आजच महाविकास आघाडीची घोषणा करतो, आमचे पदाधिकारी येथे आहेतच. फक्त, राष्ट्रवादीचाही सन्मान व्हावा, अशी अपेक्षा पाटील यांनी बोलून दाखवली.
नागेश अक्कलकोटे यांनी प्रास्ताविक भाषणात, दिलीप सोपल यांचा परिसस्पर्श लाभल्याने मला कार्य करता आल्याचे सांगितले. सध्या नगरपालिकेवर कर्जाचा डोंगर उभारलाय, वेळेवर पगारी नाहीत, शिक्षकांचे अनुदान थकलय, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे पैसे अडकलेत, असा कारभार असल्याची टीका अक्कलकोटे यांनी सत्ताधाऱ्यांवर केली.
या कार्यक्रमाला जिल्हा परिषद सदस्य रेखा राऊत, माजी नगराध्यक्ष योगेश सोपल, गणेश जाधव, दगडू मांगडे, मंगलताई शेळवणे, वर्षा रसाळ, विक्रम सावळे, सुप्रिया गुंड, युवराज काटे, दीपक आंधळकर, दत्ता शिंदे, संदीप बारंगुळे, वाहिद शेख, एड. विकास जाधव यांसह मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रामचंद इकारे यांनी केले.