कुर्डुवाडी (सोलापूर) : शहराच्या मध्यवर्ती भागात असलेल्या एका सोनार कारागिराच्या बंद दुकानाचे कुलुप तोडून चोरट्याने सुमारे 34 हजार 300 रुपयांचा ऐवज लंपास केला. तर जवळच असलेल्या एका घराचे कुलुप तोडून 11 हजार 800 रुपयांच्या ऐवजाची चोरी केली. या दोन्ही घटना शुक्रवारी( ता 14) रात्रीच्या सुमारास घडली आहे.

भर वस्तीतील दुकानात चोरी झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून चोरट्याचा तपास करण्याचे कुर्डुवाडी पोलिसांसमोर आव्हान निर्माण झाले आहे. भारत शंकर पोतदार ( वय 36, रा कुर्डुवाडी) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार फिर्यादी शुक्रवारी रात्री पटेल चौक येथील दुकान बंद करुन घरी गेले. रात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्याने दुकानाचे कुलुप तोडून आत प्रवेश केला.

कपाटातील 11 हजार 500 रुपये किंमतीची चांदीची लगड, पैंजणाचे तुकडे, नमुन्याची जोडवी, 10 हजार 800 रुपये किंमतीचा 2 ग्रॅम वजनाचा सोन्याचे दागिने घडविताना राहिलेला चुरा असलेली पुडी व 12 हजार रुपये किंमतीचा 17 भार चांदीची पट्टी असा एकूण 34 हजार 300 रूपयांचा माल लंपास केला . तिथून काही अंतरावर राहणारे आनंद गणगे यांच्या घराचे कुलूप तोडून 2 ग्रॅम वजनाच्या 10 हजार 800 रुपये किंमतीच्या सोन्याच्या रिंगा व रोख 1 हजार रुपये असा 11 हजार 800 रुपयांचा ऐवज चोरुन नेला.