कृष्णराज बारबोलेंनी रचला इतिहास, सर्वात तरुण पीठासीन अधिकाऱ्याचा बहुमान
बार्शी – बार्शी नगरपालिकेच्या इतिहासात सर्वात कमी वयाचे उपनगराध्यक्ष होण्याचा बहुमान बारबोले कुटुंबीयांना कृष्णराज बारबोले यांच्या रुपाने मिळाला. कृष्णराज यांनी वयाच्या 21 व्या वर्षी उपनगराध्यक्षपदाची जबाबदारी स्विकारली. त्यानंतर, आता 5 वर्षांनी बार्शी नगरपालिकेच्या इतिहासातील सर्वात लहान वयाचे पीठासीन अधिकारी होण्याचा मानही त्यांनाच मिळाला आहे. नगरपालिकेच्या कै. भाऊसाहेब झाडबुके सभागृहात आज सर्वसाधारण सभा पार पडली. या सभेचे पीठासीन अधिकारी म्हणून त्यांनी जबाबदारी निभावली.


नगराध्यक्ष अॅड. असिफभाई तांबोळी यांच्या मातोश्रींचे दोन दिवसांपूर्वी निधन झाले. त्यामुळे, आजच्या सर्वसाधारण सभेला त्यांची अनुपस्थिती होती. तर, आपली नगराध्यक्षपदाची जबाबदारी त्यांनी मोठ्या मनाने उपनगराध्यक्ष कृष्णराज बारबोले यांच्याकडे सोपवली. त्यामुळे, कृष्णराज यांना 150 वर्षांच्या नगरपालिका इतिहासात सर्वात तरुण (26 वर्षे) पीठासीन अधिकारी बनून कामकाज करण्याची संधी मिळाली. आजच्या सर्वसाधारण सभेत एकूण 15 विषयांना मंजूरी देण्यात आली. त्यामध्ये, विषय नंबर 4 मधील जवाहर हॉस्पिटल परिसरात मुख्याधिकारी यांच्या बंगल्यासाठी प्रस्तावित 1 कोटी 95 लाख 23,644 रुपयांच्या खर्चाला विरोधी पक्षनेते नागेश अक्कलकोटे यांनी आक्षेप घेतला होता. मात्र, हा विषय बहुमताच्या जोरावर सत्ताधाऱ्यांनी मंजूर करुन घेतला.

दरम्यान, सर्वच नगरसेवक, विरोधी पक्ष नेते, विरोधी पक्षाचे सदस्य, अधिकारी या सर्वांचे कृष्णराज बारबोले यांनी आभार मानले. तसेच, आमदार राजेंद्र राऊत आणि नगराध्यक्ष असिफ तांबोळी यांनी पीठासीन अधिकारी होण्याची संधी दिली, त्याबद्दल त्यांचेही आभार मानले. नगराध्यक्ष यांनी मनाचा मोठेपणा दाखवला, उपनगराध्यक्षांना नगराध्यक्षपदाचा बहुमान देत शेवटच्या सर्वसाधारण सभेत पीठासीन अधिकारी होण्याची संधी दिली, त्याबद्दल कृष्णराज यांनी कृतज्ञताही व्यक्त केली.