हृदयद्रावक बातमी;कोरोनामुळे ७ दिवसांत सख्या तीन भावांचा मृत्यू
पिंपरी,पुणे – कोरोनामुळे सख्ख्या तीन भावांचा मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना पिंपरी-चिंचवड शहरात घडली आहे. एकाच रुग्णालयात उपचार घेणाऱ्या पिंपरीतील कलापुरे बंधूचा सात दिवसात कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे कलापुरे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

पोपटराव कलापुरे (वय ६६), ज्ञानेश्वर उर्फ माउली कलापुरे (वय ६३) दिलीप कलापुरे (वय ६१, खराळवाडी, पिंपरी), अशी कोरोनामुळे मृत्यू झालेल्या या तीन भावांची नावे आहेत.
कलापुरे कुटुंबिय पिंपरीत वास्तव्याला आहे. त्यांच्या कुटुंबातील एका सदस्याला ५ जुलै रोजी कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर त्यांच्या कुटुंबातील १५ सदस्यांनाही बाधा झाली होती.

सर्वांत धाकटे दिलीप धर्माची कलापुरे (वय ६१) यांना अशक्तपणा वाटला म्हणून त्यांना लोकमान्य हॉस्पिटलमध्ये दाखल केले होते. त्यांना न्युमोनिया झाला होता. त्यानंतर कोरोनाचीही लागण झाली.
उपचार सुरु असताना १० जुलै रोजी त्यांचे निधन झाले. तसेच याच कुटुंबातील मोठे भाऊ पोपट यांना थकवा आला होता. त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल केले. त्यांचेही कोरोनाचे रिपोर्ट पॉझिटीव्ह आले.१२ जुलै रोजी त्यांचा मृत्यू झाला.
दोन दिवसात दोघा भावांच्या अचानक जाण्याचा जबरदस्त धक्का कुटुंबीयांना बसला.ज्ञानेश्वर कलापुरे यांनाही ते सहन झाले नाही. ते खचले आणि त्यांनाही रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारादरम्यान १७ जुलै रोजी त्यांचे निधन झाले.
अवघ्या सात दिवसात तीनही भावांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. त्यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.