पंढरपूर – सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी असणार्या उजनी धरणात यंदा भीमा खोर्यातून येणारा पाण्याचा प्रवाह हा अत्यंत कमी असल्याने हा महाकाय प्रकल्प ऑगस्टच्या दुसर्या आठवड्यात पंचवीस टक्के उपयुक्त पातळीत भरू शकला आहे. रविवारी सायंकाळी सहा वाजता धरण 25.18 टक्के भरले होते. मागील वर्षी 2019 ला याच तारखेला उजनी धरण 104.66 टक्के भरले होते.

उजनी धरणात दौंडजवळून मिसणारी पाण्याची आवक केवळ 6 हजार 352 क्युसेक इतकीच आहे. तर बंडगार्डन पुणे येथील विसर्ग ही मंदावून आता 7821 क्युसेक इतका झाला आहे. चार दिवसांपूर्वी भीमा व नीरा खोर्यात पावसाचा दोन दिवस जोर राहिला मात्र नंतर तेथे ही पर्जन्यराजाने विश्रांती घेतली आहे.

या दरम्यान उजनी थोडेफार पाणी येवू शकले आहे. या प्रकल्पावर पावसाळा हंगामात झालेला 443 मिलीमीटर पाऊस उपयोगी ठरला आहे. उजनी यंदाचा पावसाळा सुरू होता वजा 24 टक्के होते ते आता 70 दिवसानंतर उपयुक्त पातळीत 25 टक्के भरू शकले आहे. जवळपास 50 टक्के पाणी येथे वाढले आहे.

गतवर्षीच्या तुलनेत उजनीतील पाण्याचा विचार केला तर यंदा खूपच पाणीसाठा कमी आहे. मागील वर्षी 2019 ला 9 ऑगस्टला सायंकाळी सहा वाजता उजनी धरण 104.66 टक्के भरले होते तर या प्रकल्पातून भीमा नदीत 90 हजार क्युसेकचा विसर्ग सुरू होता. दौंडजवळून उजनीत येणारी आवक गतवर्षी याच दिवशी 72 हजार 692 क्युसेकची होती.