परांड्याच्या गजानन राशीनकर यांना जागतिक नामांकित शास्त्रज्ञांच्या यादीत स्थान
परंडा / प्रतिनिधी : –
अमेरिकेच्या मिशिगन विद्यापीठात नुकतीच ए. डी. सायंटिफिक इंडेक्स म्हणजे जगभरातील नामांकित शास्त्रज्ञांची यादी जाहीर करण्यात आली आहे.या यादीमध्ये परंडा शहरातील रहिवाशी सध्या शिवाजी विद्यापीठाच्या रसायनशास्त्र विभागातील प्रा.डॉ.गजानन शंकरराव राशीनकर यांना स्थान प्राप्त झाले आहे.सदर यादी तयार करताना जगभरातील १८१ देशातील १० हजार ६५५ विद्यापीठातील ५,६५,५५३ संशोधकांतुन निवड करून “वर्ल्ड सायंटिस्ट अँड युनिव्हर्सिटी रँकिंग-२०२१” जाहीर करण्यात आले आहे.डाॕ.राशिनकर हे रसायनशास्त्र विषयातून तब्बल दहा वेळा नेट व सेट परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत.त्यांनी आजवर रसायनशास्त्रातील मूलभूत संशोधनात ही भरीव योगदान दिले आहे.


त्यांनी विविध प्रकारच्या मानवी कर्करोगांवर अत्यंत महत्वपूर्ण संशोधन केले आहे. यामध्ये प्रामुख्याने महिलांमधील स्तनांचा कर्करोग, त्वचेचा कर्करोग, फुफ्फुसांचा कर्करोग, ब्रेन ट्यूमर अशा अनेक प्रकारच्या कर्करोगांवर उपयुक्त संशोधन केले आहे. सदर संशोधनाची दखल घेऊन नुकतेच भारत सरकारच्या पेटंट विभागाने त्यांना स्तनांच्या कर्करोगावर उपयुक्त असणाऱ्या संभाव्य प्रभावशाली औषधाचे पेटंट प्रदान केले आहे.
त्यांचे रसायनशास्त्रातील व कर्करोगावरील संशोधन आंतरराष्ट्रीय नामांकित जर्नल्स मधून प्रकाशित झाले आहे. त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना अनेक नामांकित संस्थांकडून व आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय परिषदांमधून पुरस्कार प्राप्त झाले आहेत.डॉ. राशीनकर यांनी शिवाजी विद्यापीठाच्या सेंट्रल प्लेसमेंट सेलचे प्लेसमेंट अधिकारी, शिवाजी युनिव्हर्सिटी माजी विद्यार्थी संघटनेचे समन्वयक अशा पदांवरून उत्कृष्ट कामगिरी बजावली आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली देशभरातील हजारो विद्यार्थी नेट व सेट या परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत.या यशाबद्दल परंडा शहरातील शैक्षणिक,सामाजीक,राजकीय क्षेञातील मान्यवरांकडुन अभिनंदन होत आहे.