राज्यात रुग्ण संख्येने ओलांडला नवा उच्चांक, २४ तासांत ६३३० नवे रुग्ण
मुंबई २ जुलै: राज्यात आज कोरोना रुग्णांच्या संख्येने नवा उच्चांक निर्माण केला आहे. आत्तापर्यंतचे सर्व विक्रम मोडत गेल्या 24 तासांत तब्बल 6330 रुग्ण आढळून आलेत. त्यामुळे एकूण रुग्णांची संख्या 186626 झाली आहे. तर फक्त मुंबईत 80,699 रुग्ण झाले आहेत. तर आत्तापर्यंत 4689 जणांचा मृत्यू झाला आहे. आज मुंबईत 1554 नवे रुग्ण आढळून आलेत. तर आज 8 हजारांपेक्षा जास्त रुग्णांना सुट्टी देण्यात आली आहे.


आज सोडण्यात आलेल्या ८ हजार १८ रुग्णांमध्ये मुंबई मंडळात ७ हजार ३३ (आतापर्यंत एकूण ७२ हजार २८५) तर त्यापाठोपाठ पुणे मंडळात ४७७ (आतापर्यंत एकूण १४ हजार ३१५), नाशिक मंडळात ३३२ (आतापर्यंत एकूण ५६०२), औरंगाबाद मंडळ ९३ (आतापर्यंत एकूण ३२१४), कोल्हापूर मंडळ १२ (आतापर्यंत एकूण १५५६), लातूर मंडळ ७ (आतापर्यंत एकूण ७०२), अकोला मंडळ ३१ (आतापर्यंत एकूण १९६४), नागपूर मंडळ ३३ (आतापर्यंत एकूण १५३४) रुग्ण घरी सोडण्यात आले आहेत.

प्रादुर्भाव वेगाने वाढण्याचं कारण समूह संसर्ग (Community transmission) हे आहे का, यावर उलट सुटल चर्चा सुरू आहे. रायगडच्या पालकमंत्री आणि उद्योग राज्यमंत्री आदिती तटकरे यांनी काही भागात थोड्या प्रमाणावर कम्युनिटी ट्रान्समिशनला सुरुवात झाल्याचं म्हटलं. पनवेल, नवी मुंबई आणि ठाणे जिल्ह्याच्या अनेक मोठ्या शहरी भागांमध्ये संपूर्ण लॉकडाऊन जारी करण्यात आला आहे. पण या कडक टाळेबंदीचा कम्युनिटी ट्रान्समिशनशी संबंध जोडू नका, असं आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले.