माळशिरस विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार शामराव भीमराव पाटील (पानीवकर)यांचे गुरुवारी दु. ४ वाजता वृद्धापकाळाने निधन झाले. ते 83 वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात सोलापूर काँग्रेस जिल्हाध्यक्ष प्रकाश पाटील ,प्रख्यात हृदयरोग तज्ञ डॉ. सुनील पाटील, स्नुषा सौ. श्रीलेखाताई प्रकाश पाटील यांच्यासह 3 मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे.

१९७७ मध्ये अतिशय संघर्षपूर्ण राजकीय घडामोडीत शामराव भाऊ माळशिरस तालुक्याचे आमदार झाले. आपल्या कल्पक बुद्धिमत्ता व दूरदृष्टीमुळे १९७२ मध्ये श्रीराम सिनेमाच्या माध्यमातून तालुक्यात मनोरंजनाची मुहूर्तमेढ रोवली जे आजही भारतातील मोजक्या उच्च तंत्रज्ञानाने सुसज्ज असणाऱ्या थिएटरमध्ये गणले जाते.

ग्रामीण भागातील गरीब व होतकरू मुले शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी १९९१ साली श्रीराम शिक्षण संस्थेची स्थापना करून शिक्षणाची गंगा माळशिरस तालुक्यात आणली. आज त्याचा मोठा वटवृक्ष झालेला आहे. त्यांच्या निधनामुळे पानीववर शोककळा पसरली आहे.