पिंपरी-चिंचवड : महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते व राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान नगरसेवक दत्ताकाका साने ( वय ४७ ) यांचे आज ( दि. ४ जुलै ) सकाळी चिंचवड येथील खासगी रुग्णालयात निधन झाले. दत्ताकाका या नावाने ते सर्वदूर परिचित होते. दत्ताकाका यांना २५ जून रोजी कोरोनाची लागण झाली होती.

त्यांच्यावर बिर्ला हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु असताना आज सकाळी त्यांचे निधन झाले. त्यांना कोरोनासह निमोनियाची देखील लागण झाली होती. त्यांच्या निधनामुळे पुणे जिल्ह्यात हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांच्यामागे आई, पत्नी हर्षदा, मुलगा यश ( वय १९ ), मुलगी ( वय १६ ) व दोन भाऊ असा परिवार आहे.

दत्ताकाका हे महापालिकेवर चिखली येथील प्रभाग क्रमांक १ मधून सलग तीनवेळा निवडून गेले होते. पिंपरी-चिंचवड मधील सर्वांचे लाडके आक्रमक व अभ्यासू नेते म्हणून त्यांची ओळख होती. तसेच मनमिळाऊ व नागरिकांना सतत सहकार्य करण्याची त्यांची भावना होती.

ते दरवर्षी शेकडो कार्यकर्त्यांना, नागरिकांना बालाजी दर्शनासाठी तिरुपतीला घेऊन जात असे. त्यामुळे त्यांचा चाहतावर्ग मोठा होता. मागील वर्षी ते भोसरी विधानसभा निवडणूक लढविण्यास इच्छुक होते, अखेर त्यांचे हे स्वप्न अपुरेच राहिले. लॉकडाऊन काळात त्यांनी नागरिकांना अन्नधान्याचे वाटप करून मोठ्या प्रमाणावर मदत केली होती, त्यामुळे त्यांचा परिसरातील नागरिकांशी संपर्क आला होता.