ग्लोबल न्यूज- महाराष्ट्राच्या पहिल्या महिला निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण (वय 71) यांचे आज (दि.16) कोरोनामुळे निधन झाले. त्यांच्यावर मुंबईतील सेव्हन हिल्स रुग्णालयात उपचार सुरू होते. उपचारादरम्यान त्यांनी पहाटे चारच्या सुमारास अखेरचा श्वास घेतला.

नीला सत्यनारायण या १९७२ च्या बॅचच्या सनदी अधिकारी होत्या. साहित्यिक म्हणून ही त्यांची वेगळी ओळख होती. निवडणूक आयुक्त म्हणून त्यांची कारकीर्द गाजली होती. प्रशासकीय अधिकारी म्हणून त्यांनी 37 वर्षे काम केले. गृहखाते, वनविभाग, माहिती व जनसंपर्क, समाजकल्याण, ग्रामविकास अशा विविध खात्यांमध्ये त्यांनी काम केले होते.
नीला सत्यनारायण यांनी हिंदी, मराठी, इंग्रजी या तिन्ही भाषांमधून १३ पुस्तके लिहिली आहेत. त्यांचे मराठीतील ‘एक पूर्ण अपूर्ण’ हे आत्मचरित्रपर पुस्तक लोकप्रिय ठरले होते. ‘सत्यकथा’ आणि ‘एक दिवस (जी)वनातला’ हे पुस्तकही त्यांनी लिहिले होते.

त्यांनी अनेक वृत्तपत्रांसाठी स्तंभलेखन केले होते. सत्यनारायण यांनी सुमारे 150 कविता लिहिल्या होत्या.
दरम्यान, राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी टि्वटरवर नीला सत्यनारायण यांना श्रद्धांजली वाहिली आहे. राज्याच्या पहिल्या महिला निवडणूक आयुक्त नीला सत्यनारायण यांचे निधन झाले. त्या कर्तव्यदक्ष अधिकारी होत्या याशिवाय एक संवेदनशील कवयित्री देखील होत्या. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली, असे टि्वट त्यांनी केले आहे.
राज्याच्या पहिल्या महिला निवडणूक आयुक्त, भारतीय प्रशासकीय सेवेतील निवृत्त अधिकारी नीला सत्यनारायण यांच्या निधनाबद्धल मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी शोक व्यक्त केला आहे. मुंबईत मराठी कुटुंबात जन्मलेल्या नीला सत्यनारायण या महाराष्ट्रातील अनेक युवकांसमोर प्रशासकीय सेवेविषयीच्या प्रेरणास्थान होत्या.

प्रशासकीय कारकिर्दीबरोबरच साहित्य-कला क्षेत्रातही कामगिरीची मोहोर उमटविणारे अनुभवी आणि संवेदनशील व्यक्तिमत्त्व म्हणून नीला सत्यनारायण यांना महाराष्ट्र सदैव स्मरणात ठेवेल. निवडणूक आयोगाला अधिकाधिक लोकाभिमुख करण्यासारखी त्यांची इतरही अनेक कामे वैशिष्ट्यपूर्ण होती असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे शोकसंदेशात म्हणतात.