बार्शी : लग्नाचे अमिष दाखवून २०१९ पासून लॉजवर नेऊन एका मुलीशी जबरदस्तीने शरीरसंबध ठेवल्याचा प्रकार समोर आला आहे. शिवाय लग्नाच्या नावाखाली १ लाख रुपयांची फसवणुकही केली आहे. याप्रकरणी येथील एकाविरुध्द शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


याप्रकरणी पीडीत मुलीने फिर्याद दिली असून यात म्हटले आहे की, येथील धवल बदाले याचे २०२० मध्ये लग्न झाले होते. तरीही २०१९ पासून तो फिर्यादीशी ओळख झालेपासून प्रेमसंबध व त्यानंतर लग्नाचे अमिष दाखवून जबरदस्तीने शरीरसंबध ठेवत होता. यामुळे फिर्यादी असलेली पिडीत मुलीला दिवस गेले असता जबरदस्तीने गोळ्या खायला देऊन गर्भपातही केला.
ऑगस्ट २०२१ मध्ये आपण लग्न करू असे म्हणून फिर्यादीने बहिणीच्या गुगल पे अॅपवरून दोन टप्प्यात १ लाख रुपये बदाले याच्या खात्यावर जमा केले, तसेच फिर्यादीकडून सोन्याची अंगठी व कानातलेही दागिने घेतले. यानंतरही लग्न न करता बदाले याने फिर्यादीची फसवणुक केली. फिर्यादीने माहिती काढल्यानंतर त्याचे पूर्वीच लग्न झाले असल्याचेही समोर आले.पूर्वीचे लग्न झाले असतानाही फिर्यादी पिडीत मुलीशी प्रेमसंबध व त्यानंतर जबरदस्तीने शरीरसंबध ठेवणे, गर्भपात करणे, रक्कम घेऊन फसवणुक केली असल्याची फिर्याद पिडीत मुलीने दिल्यानंतर बदाले विरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.