आजवर एक कोटी 4 लाख लोकांच्या केल्या चाचण्या
ग्लोबल न्यूज- देशात पहिल्यांदाच 2.5 लाखाहून अधिक चाचण्या करण्यात आल्या असून गेल्या 24 तासांत देशात 2.62 कोरोना चाचण्या पूर्ण झाल्या आहेत. चिंताजनक बाब म्हणजे सलग सहाव्या दिवशी 20 हजारहून अधिक कोरोना बाधितांची वाढ झाली आहे. मागील 24 तासांत देशात 22,752 कोरोनाची नवीन प्रकरणं नोंदवली गेली आहेत.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, देशातील एकूण कोरोना बाधितांची संख्या 7,42,417 झाली आहे. त्यापैकी 4,56,831 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर, 2,64,944 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत.
गेल्या 24 तासांत देशात 482 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून देशातील एकूण मृतांची संख्या 20,642 इतकी झाली आहे.

दिलासादायक बाब म्हणजे, देशात रुग्ण बरे होण्याचा दर हा 61.53 टक्के एवढा झाला आहे तर, रुग्ण सकारात्मकतेचा दर 8.66 टक्के एवढा आहे. गेल्या 24 तासांत देशात 2.62 लाख कोरोना चाचण्या झाल्या असून पहिल्यांदाच हा आकडा 2.5 लाखांहून जास्त आहे.
आयसीएमआरने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, आत्तापर्यंत देशात 1,04,73,771 चाचण्या पूर्ण झाल्या आहेत.

भारतात एक लाख लोकसंख्येमागे कोरोना रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण जगात सर्वात कमी असल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या मंगळवारी प्रसिद्ध केलेल्या निवेदनात नमूद करण्यात आलं आहे.
जागतिक आरोग्य संघटनेच्या आकडेवारीनुसार, भारतात हे प्रमाण 14.27 असून जगभरातील सरासरी प्रमाण 68.29 इतके आहे. भारतात एक लाख लोकसंख्येमागे 505 करोनाबाधित आहेत. तर, जगभरात लाखामागे सरासरी 1,453 व्यक्तींना कोरोनाची बाधा झाली आहे.
