भोगावती नदीला महापूर; पिंपरी(सा) हिंगणी गावचा संपर्क तुटला

0
2022

बार्शी : परतीच्या पावसाने हिंगणी धरणक्षेत्र परिसरात जोरदार बॅटिंग केल्याने ओढे, नाले, नदी भरभरून वाहत आहेत. सततच्या पडणाऱ्या पावसामुळे हिंगणी धरण ओव्हरफ्लो झाले असून भोगावती नदीला महापूर आला आहे. त्यामुळे पिंपरी (सा) हिंगणी गावचा संपर्क तुटला आहे. भोगावती नदीतील पुलावरून पाणी वाहत असल्याने वाहतूक ठप्प होऊन जनजीवन विस्कळीत झाले आहे.

हिंगणी -मळेगाव, पिंपरी-वैराग, पिंपरी-बार्शी रस्ता पूर्णत: बंद झाला आहे. हिंगणी, पिंपरी येथील दोन्ही पूल अरुंद असल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. एकीकडे साकतच्या निलकंठा नदीला महापूर व दुसरीकडे भोगावती नदीला आलेला महापूर यामुळे पिंपरी गावास बेटाचे स्वरूप प्राप्त झाले आहे. त्यामुळे शेतातील कामे करताना, दवाखाना व जीवनावश्यक साहित्य उपलब्ध करताना नागरिकांना मोठी कसरत करावी लागत आहे.

आमच्या फेसबुक पेज ला लाईक करा

पिंपरी- वैराग आठ किलोमीटर अंतराचा प्रवास भोगावती नदीला पूर आल्याने 30 किमी अंतराचा झाला आहे. नागरिकांना पिंपरी-हिंगणी-मळेगाव-जामगाव-उपळे-हळदुगे-लाडोळे-वैराग असा प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे पुलाची उंची वाढवण्याची मागणी नागरिकांमधून पुढे येत आहे.

परतीच्या पावसाचा फटका शेती बरोबरच विद्यार्थ्यांना देखील बसला आहे. जोरदार वारे, विजेचा कडकडाट व मुसळधार पावसामुळे वीजपुरवठा सतत खंडित होत असून विद्यार्थ्यांना ऑनलाईन परीक्षा देताना नेटवर्कचा प्रॉब्लेम येत आहे. चिखलातून वाट शोधत वैराग किंवा बार्शी याठिकाणी जाऊन विद्यार्थी ऑनलाइन परीक्षा देत आहेत.

मंगळवारी रात्री सुरू झालेली पावसाची संततधार हिंगणी धरणक्षेत्र परिसरात सुरूच आहे. तसेच हवामान विभागाने 48 तासात अतिवृष्टीचा इशारा दिल्याने पिंपरी तसेच भोगावती नदीकाठच्या गावांना वैराग पोलिस स्टेशन व पाटबंधारे विभाग यांच्यामार्फत सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. पिंपरीचे उपसरपंच यशवंत काटमोरे यांनी भोगावती नदी पात्रातून नागरिकांनी जीवघेणा प्रवास करू नये, असे आवाहन केले आहे.

पिंपरी (सा) येथील ग्रामस्थ अशोक वायकर म्हणाले, भोगावती नदीपात्रातील पिंपरी (सा) व हिंगणी येथील दोन्हीही पूल अरुंद असल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. जीवनावश्यक साहित्य, शेतीची कामे, दवाखाना, शिक्षण घेताना मोठी कसरत करावी लागते. त्यामुळे भविष्यातील संभाव्य धोका टाळण्यासाठी पुलाची उंची वाढवून नागरिकांचा होणारा त्रास कमी करावा.

Best IT Comany In Maharashtra , Solapur

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here