ग्लोबल न्यूज – देशात कोरोना महामारीचं थैमान अजूनही थांबलेलं नाही. कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत दिवसागणिक वाढ होत आहे. रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे नागरिकांच्या चिंतेत भर पडली आहे. देशातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 17 लाखांच्या पुढे पोहोचली आहे. यामधील 65 टक्के कोरोना रुग्ण जुलै महिन्यात वाढले आहेत.

केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, मागील 24 तासांत देशभरात 54,736 नवे रुग्ण आढळले आहेत तर 853 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. देशात सध्या 5,67,730 रुग्ण सक्रिय रुग्ण आहेत तर आजवर 11,45,630 जण कोरोनामुक्त झाले आहेत. देशात 37,364 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
रुग्ण वाढीचा दर वाढला असला तरी देशातील रुग्ण बरे होण्याचा तर देखील वाढला आहे मागील 24 तासात देशभरातून जवळपास 51,255 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

देशातील रिकव्हरी रेट 65.44 टक्के एवढा झाला आहे. तर देशात सध्या 32.43 टक्के सक्रिय रुग्ण आहेत. दिलासादायक बाब म्हणजे, देशातील रुग्ण मृत्यूचा दर 2.13 टक्के एवढा आहे.
आयसीएमआरने दिलेल्या माहितीनुसार, आत्तापर्यंत 1 कोटी 98 लाख 21 हजार 831 नमुने तपासण्यात आले आहेत त्यापैकी 4 लाख 63 हजार 172 चाचण्या या शनिवार 1 ऑगस्ट रोजी करण्यात आल्या आहेत.
भारतात ऑक्सफर्डच्या लसीच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील मानवी चाचणीचा मार्ग मोकळा झाला आहे. ‘सेंट्रल ड्रग्स स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशन’च्या (सीडीएससीओ) तज्ज्ञांच्या समितीने सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाला लसीच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील मानवी चाचणीसाठी परवानगी देण्याची शिफारस केली आहे.