बार्शी : गणपती बाप्पा मोरया..! च्या जयघोषात ‘श्रींगणेश चे जल्लोषात स्वागत करण्यात आले.यंदा बार्शी शहरात ६९ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी तर ग्रामीण भागात ९२ इतक्या मंडळांनी ‘श्रींगणेश ची प्रतिष्ठापना केली आहे.

गणेशोत्सवाच्या काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते व उपविभागीय पोलीस अधीक्षक जालिंदर नालकुल यांच्या मार्गदर्शनाखाली पो नि अण्णासाहेब मांजरे यांनी सर्वत्र पोलिस बंदोबस्तही ठेवण्यात आला आहे. यंदाच्या वर्षी मात्र अतिशय उत्साहात घरोघरी तसेच सार्वजनिक ठिकाणी हा उत्सव साजरा करण्यात येत आहे. शहर पोलिस हद्दीत ६९ तर तालुका पोलिस ठाणे हद्दीत ९२ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी ‘श्रींगणेश ची प्रतिष्ठापना केली आहे.

बुधवारी सकाळी सकाळी दहा वाजल्यापासूनच बाजारपेठेंत गणेश मूर्ती व निर्माल्य व पूजेचे साहित्य खरेदीसाठी महिला व नागरिकांनी मोठी गर्दी केली होती. भगवंत मैदानाच्या बाजूला नगरपालिकेने गणेश मूर्ती विक्रीसाठी ७५ मोफत स्टॉल उपलब्ध करून दिले होते. याचबरोबर पटेल तसेच लातूर रोड परिसरात गणेश मूर्ती विक्रीसाठी ठेवण्यात आल्या होत्या. यामुळे लातूर रोडवरही भाविकांची मोठी गर्दी केली होती.

सायंकाळी कासार गल्ली मित्रमंडळ, श्री गणेश मंडळ या मंडळांनी वाजत गाजत मिरवणुकीच्या माध्यमातून गणरायाचे स्वागत केले.