‘पत्रकारिता शोध व बोध’ हा सर्वच पत्रकारांना मार्गदर्शन करणारा ग्रंथ – दिलीप सोपल
बार्शी – बार्शीच्या पत्रकारितेला मोठी परंपरा आहे, आजही तालुक्यात अनेक पत्रकार आहेत, ज्यांचं सामर्थ्य हे देशपातळीवरील पत्रकारिता करण्याचं आहे. त्यामुळे, बार्शीच्या पत्रकारितेला विशेष महत्व आहे. त्यात, सचिन वायकुळे यांनी आपलं पत्रकारितेवरील पुस्तक प्रकाशित करुन बार्शीच्या पत्रकारितेत मोलाची भर टाकली आहे. ‘पत्रकारिता शोध आणि बोध’ हे पुस्तक सर्वच पत्रकारांना मार्गदर्शक ठरेल. हा गुणात्मक ग्रंथ असून लेखक सचिन वायकुळे यांनी अभ्यासपूर्ण व परिश्रमपूर्वक पुस्तक लिहल्याचे प्रतिपादन शिवसेना नेते माजी मंत्री दिलीप सोपल यांनी केले.

आनंदयात्री प्रतिष्ठानच्यावतीने व विरोधीपक्षनेते अॅड. नागेश अक्कलकोटे यांच्या पुढाकारातून शहर व ग्रामीण भागातील पत्रकारांना सचिन वायकुळे लिखित ‘पत्रकारिता शोध आणि बोध’ ग्रंथ माजी मंत्री अॅड. सोपल यांच्या हस्ते देण्यात आला. याप्रसंगी ते बोलत होते. गर्दी टाळत अनेकांनी हा कार्यक्रम ऑनलाईन अनुभवला.

पुढे बोलताना सोपल म्हणाले की, नवतंत्रज्ञानामुळे माध्यमक्रांतीचा अविष्कार पहायला मिळाला अन् सारं जग मोबाईलच्या निमित्ताने हाताच्या तळव्यावर आले. सध्यस्थितीतही पूर्वीप्रमाणेच वास्तववादी बातमीशी एकनिष्ठ असलेली पत्रकारिता हवी. स्पर्धेचा काळ असला तरी मुद्रित, दृकश्राव्य व डिजिटल माध्यमे या प्रत्येक माध्यमांचे महत्त्व अबाधितच आहे, असे त्यांनी सांगितले.
यावेळी लेखक सचिन वायकुळे यांनी पत्रकारांना मार्गदर्शनासाठीच हा ग्रंथ लिहिल्याचे सांगितले. तसेच, लोकमत डिजिटल मीडियाचे मयूर गलांडे यांनीही पत्रकारिता शोध व बोध पुस्तकाच्या प्रस्तावनेबद्दल माहिती देत मनोगत व्यक्त केले. पत्रकारांसाठी आयोजित या कार्यक्रमासाठी माजी नगराध्यक्ष योगेश सोपल, नगरपालिका विरोधीपक्षनेते अॅड. नागेश अक्कलकोटे, ज्येष्ठ पत्रकार भ.के. गव्हाणे तसेच संतोष सूर्यवंशी, मयूर गलांडे उपस्थित होते.
दरम्यान, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कवी रामचंद्र इकारे यांनी केले तर प्रशांत घोडके यांनी आभार मानले. आनंदयात्री प्रतिष्ठानचे इतरही सदस्य यावेळी उपस्थित होते.