विजेचा शॉक लागून शेतक-याचा मृृृत्यू
सांगोला : शेतात पाण्याची मोटार चालू करण्यासाठी गेलेल्या तरुण शेतक-यास उघड्या वायरचा शॉक लागून जागीच मृत्यू झाला. कोळवले कुटुंबाचा तो आधारवड मानला जायचा. तो गेल्याने आता कुटूंब अडचणीत आल्याचा शोक नातेवाईकांनी केला.


मंगळवार, ६ सप्टेंबर रोजी सकाळी ९ च्या सुमारास अजनाळे कोळवले मळा (ता. सांगोला) येथे ही घटना घडली. उमेश रामचंद्र कोळवले (वय ३२) असे मरण पावलेल्या शेतक-याचे नाव आहे. दरम्यान रामचंद्र कोळवले यांच्या एकुलत्या एक मुलाच्या अपघाती मृत्यूमुळे कोळवले कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. त्याच्या पश्चात आई-वडील, पत्नी, एक मुलगा असा परिवार आहे.
उमेश कोळवले हा शेतकरी मंगळवारी सकाळी ८.३० च्या सुमारास घरातून कोळवले मळा येथे शेतातील मोटार चालू करण्यासाठी गेला होता त्यास त्याच मोटारीच्या उघड्या वायरचा शॉक लागून जागीच पडला. बराच वेळ झाला तरी तो घरी परतला नाही म्हणून आई शेतात गेली असता उमेश तेथे बेशुद्ध पडल्याचे निदर्शनास आले. आईने आरडाओरड करता अमोल कोळवले याच्यासह शेजारी लोकांनी घटनास्थळी धाव घेतली जखमी अवस्थेत त्यास सांगोला ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी मृत घोषीत केले. याबाब ग्रामीण रुग्णालयाचे प्रभारी वैद्यकीय अधीक्षक डॉ. उत्तम फुले यांनी खबर दिली. पोलिसांनी आकस्मात मयत अशी नोंद केली. तपास पोलीस नाईक प्रकाश कोष्टी करीत आहेत.