बार्शीतील डॉक्टरची व्यथा आणि दुखः मी व पत्नीने डॉक्टर म्हणून काम केलं ही आमची चुक होती?
कोरोना ,शासन व्यवस्था, समाज आणि हॉस्पिटल.
मित्रांनो मी डॉ. प्रदीप भगवान जाधव बार्शी.
दि.25/07/2020 रोजी माझी आई सौ मनिषा भगवान जाधव वय 55 वर्ष यांचे कोरोना संर्सगाने निधन झाले ह्या प्रवासादरम्यान आलेला अनुभव,वास्तव व समाजाची मानसिकता यावर थोडसं आपल्याला शेअर करावं वाटलं म्हणून हा शब्द प्रपंच.

मित्रांनो मी सध्या कोविड केअर सेंटर परंडा जि. उस्मानाबाद येथे वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत आहे तर माझी पत्नी डॉ. स्नेहल जाधव ही बार्शीतील नामांकित अशा डॉ. अंधारे यांच्या सुश्रुत हॉस्पिटल येथे MO म्हणून कार्यरत आहेत.
आम्ही दोघेही कोविड हॉस्पिटल मध्ये सबंध विश्वावर आलेल्या कोरोना रूपी संकटातून समाजाला बाहेर काढण्यासाठी आपली नैतिक जबाबदारी आहे लोकांचे जीव वाचले पाहिजेत ते आपले कर्तव्य आहे ह्या भावनेनी गेल्या 4 महिन्यात एकही सुट्टी न घेता सेवा देत होतो, दरम्यान च्या काळात आपल्या ही घरी लहान मुले आहेत वयस्कर आई बाबा आहेत त्यांना आमच्या मुळे संसर्ग होवू शकतो ह्याची काळजी ही वाटतच होती.

दि.01/07/2020 रोजी माझ्या आई ला अशक्तपणा व अंगदुखी चा त्रास सुरु झाला डॉ. अंधारे यांच्या हॉस्पिटल मध्ये दाखल करण्यात आले स्वॅब घेण्यात आला आणि तो कोरोना पॉझिटिव्ह आला आणि इथून पुढं समाजाने मदत करण्या ऐवजी त्रास देण्यास सुरुवात केली.
मित्रांनो ज्या समाजातील लोकांचे जीव वाचले पाहिजेत कोरोनो रूपी संकटात आपण डॉक्टर म्हणून आपली नैतिक जबाबदारी पार पाडली पाहिजे म्हणून स्वतःचे कुटूंबातील व्यक्तिंना धोक्यात घालून काम केले त्या लोकांची मानसिकता किती विचित्र आहे त्यांच्या कडून सहकार्याची अपेक्षा नव्हतीच पण निदान त्रास तरी द्यायला नको होता ते लोक आमच्या कडे तिरस्काराने पाहू लागले
अस्पृश्यता जाणवू लागली.

आमच्या दवाखान्याला नगरसेवकाच्या मदतीने बाहेरून लॉक लावण्यात आले असा कायद्याचा अधिकार ह्यांना कुणी दिला? आज माझी आई मला माझ्या कुटूंबाला सोडून गेली त्यात तिची काय चुक होती? का आम्ही डॉक्टर होवून कोविड हॉस्पिटल ला काम केलं ही चुक होती?

इतक्या संवेदना बोथट झाल्या समाजाच्या?
का मिडीयाने चुकीचे निर्माण केलेले गैरसमज कारणीभूत आहेत? माझी तमाम डॉक्टर्स मंडळी ना हात जोडून कळकळीची विनंती आहे प्रथम आपल्या कुटूंबाला प्राधान्य द्या.
शासन एकीकडे पेशंटला पोषण आहार द्या म्हणून सांगतय आणि दुसरी कडे पेशंटला भेटायचं नाही म्हणतय. प्रचंड विरोधाभास आहे वास्तव आणि निर्णयामध्ये.
ह्या सर्व २१ दिवसाच्या प्रवासात सकारात्मक बाब म्हणजे डॉ. अंधारे यांचे सुश्रुत हॉस्पिटलचे स्वतः डॉ.संजय अंधारे सर सर्व स्टाफ डॉ. महादेव कोरसळे , डॉ.ज्ञानेश्वर राऊत , डॉ. संतोष धोंगडे , डॉ. सोनालीसुके आणि विशेषतः डॉ. शरद इतापे या सर्व टीमचे काम प्रशंसनीय आणि शब्दात व्यक्त करू शकत नाही.
आय.सी.यु स्टॉफ मधील घोडके सिस्टर, किशोर ब्रदर हे घरच्या व्यक्ति प्रमाणे काळजी घेत होते.डॉ. अंधारे सर गरीब व गरजू रुग्ण व नातेवाईकांना पोषण आहार स्व खर्चाने देत आहेत.अजित अंधारे हे गेल्या दोन महिन्यांपासून स्वॅब घेण्याचे काम अव्याहतपणे करत आहेत.
दर २ तासाला २४ तास डॉ. अंधारे सर आय.सी.यु. पेशंटचे माहिती घेवून उपचार करत आहेत.माझे वरिष्ठ डॉ. पठाण सरांनी पण मॉरल सपोर्ट देवून सहकार्य केले. डॉ. संतोष जोगदंड सरांचे पण सहकार्य मिळाले.
हे सर्व सांगण्या मागचा एकच उद्देश आहे
मित्रांनो ज्या समाजातील लोकांचे प्राण वाचविण्यासाठी डॉक्टर स्टाफ कर्मचारी स्वतःचा त्यांच्या कुटूंबियाचा जीव धोक्यात घालून २४ तास काम करत आहेत म्हणून तुम्ही सुरक्षीत आहात, त्यांच्यावर सोसायटी मध्ये असा अघोषित बहिष्कार घालून त्यांना नाउमेद करू नका.
संवेदनशील मनाने विचार करा. वेळ कोणा वरही येवू शकते.आज माझी आई मला कुटूबियां ना सोडून गेली ह्यात तिची काय चुक होती? का मी व पत्नीने डॉक्टर म्हणून काम केलं ही आमची चुक होती? ईश्वर तिच्या आत्म्यास शांती देवो हीच भगवंत चरणी प्रार्थना.