कोरोना डॉक्टर : योद्धा की लुटारू?
डॉ सुरेश पाटील
गजबजलेल्या ओपीडी मध्ये डॉ निलेश पी.पी.ई किटच्या आत बटाट्यासारखे शिजत रुग्ण तपासणीचे काम करत होते. फॅमिली डॉक्टर म्हणजे कुटुंबाचा हक्काचा अडल्या नडल्या सर्वच आजारांचा माफक फी मध्ये उपचार व मार्गदर्शन करणारा फॅमिलिअर डॉक्टर. फुकट सल्ले घ्यायला येणाऱ्या रुग्णांची संख्या तर डॉ निलेशकडे प्रचंड. त्याचा शालेय मित्र नितीन त्याच्याकडे भेटायला आला होता.

” डॉक्टर, तुम्ही लोकांनी जाम लुटायला चालू केलंय” त्याचा मित्र बोलला.
“काय रे काय झालं” आश्चर्याने निलेशने विचारले.
“N95 मास्क बघ 200 रुपये. आजच घेतला. ओळख होती म्हणून 150 ला भेटला” मित्राने मास्कच्या दोरीशी खेळत सांगितले.
“अरे पण मास्क डॉक्टर थोडेच बनवतो आणि विकतो. आम्ही पण त्याच दराने विकत घेतले आहेत. हे पी.पी.ई किट बघ; रोजचा आठशे रुपये खर्च आहे. तरी पण कोरोना आहे म्हणून स्वतःचा जीव वाचवायला कोणी डॉक्टर घरी नाही बसलाय आणि मास्क सारखी आम्ही नाही आमची तपासणी फी वाढवली.
ते जाऊ दे, का आला होतास?”
डॉ निलेश शांतपणे बोलला.

“आईला आणि बाबांना तीन दिवस थोडा ताप होता. म्हटले तापाच्या गोळ्या घेऊन जाऊ” तो बोलला.
“अरे अंगावर काढू नको. कोरोनाची साथ आहे. आईच वय झालंय, शुगरपण आहे. टेस्टिंग करून घे”
डॉ निलेशने काळजी पोटी सल्ला दिला.
“अरे कोरोना बिरोना काही नाही. तुम्ही डॉक्टर लोकांनी पैसे कमवायचा धंदा चालू केला आहे. मला पण एक दिवस ताप होता. काही न करता ठणठणीत झालो. स्वाब तपासणी रिपोर्ट मध्ये पण झोल आहे” त्याने टीकास्त्र चालवले.

“मित्रा, कोरोना ही खूप सांसर्गिक वैश्विक साथ आहे. जगभर आजपर्यंत सहा लाख लोक या आजाराने मेले आहेत. दर शंभर रुग्णामध्ये तीन ते चार रुग्णाच्या जीवाला धोका होतो. काही व्यक्ती आपल्या रोगप्रतिकारक शक्तीमुळे लगेच बरे होतात तर बराच जनांना लक्षणे सुध्दा येत नाहीत.
पण कोण कधी अतिगंभीर होईल सांगता येत नाही. टेस्ट करणे म्हणजे सावधगिरी आणि लवकर निदान. जगभर वापरली जाणारी RT PCR चाचणी आपल्या इथे होते. आपला देश तर टेस्टिंग करण्यात जगात 55 नंबरवर आहे मित्रा. आणि टेस्टिंगचे दर सरकार ठरवते आहे डॉक्टर वा लॅब नाही. काही दोष आदळला तर लॅब बंद. बाकी आता तुझी मर्जी.”
डॉ निलेशने पुन्हा समजावुन सांगितले.

मित्राने टेस्ट करून घेतली. अपेक्षेप्रमाणे आईचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. महानगरपालिका मधून डॉक्टरचा कॉल आला आणि सर्व माहिती घेण्यात आली.
“अंबुलन्स पाठवत आहे. आईला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करावं लागेल आणि बाकी कुटुंबाला विलीगिकरण कक्षात. संसर्ग पसरू नये म्हणून हे करावेच लागेल.”
” आम्हाला कुठेही ऍडमिट व्हायचे नाही आहे. माझ्या एरिया मधील मित्राने मला सांगितले की पेशंट ऍडमिट केला की तुम्हाला प्रति पेशंट लाख रुपये मिळतात. म्हणून तुम्ही जबरदस्तीने लोकांना उचलताय.आम्ही घरगुती काढा आणला आहे तो पिऊन बरे होणार “
” भाऊ, तुमच्या आईला भरपूर रिस्क फॅक्टर आहेत. वय जास्त आहे. हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करावे लागेल. वॉर्डमध्ये ‘कोरोनावॉर रूम’चे डॉक्टर तिला डायरेक्ट ऑक्सिजनबेड सुद्धा मिळवून देतील. तुम्हाला बाकी कुटुंबातील लोकांना येण्यास गाडी येईल. आणि ऐका; आम्हा डॉक्टरांना व आरोग्य कर्मचाऱ्यांना इथे पगार वेळेवर मिळत नाही, तुम्ही प्रति रुग्ण लाख रुपये बोलता. ही निव्वळ अफ़वा आहे. शासकीय सेवेत डॉक्टर हा फक्त रुग्णसेवा देतो. हॉस्पिटल, कोरोना विलीगिकरण सेंटर उभारणे, त्याची देखभाल, खर्च सर्व प्रशासन बघत. सरकारी डॉक्टर म्हणजे नॉन मेडिको प्रशासनाने आरोग्याविषयी दिलेले आदेश पाळून चौवीस तास रुग्णसेवा देणारा कर्तव्यदक्ष उच्चशिक्षित मजूर “
वैद्यकीय अधिकारी डॉ अनिताने प्रेमाने समजावून सांगितले. तरीही तो काही ऍडमिशन साठी तयार झाला नाही. ‘उलट तुम्ही इकडे फिरका तुम्हाला बघुन घेतो’ अशी घमकीवजा चेतावणी दिली.
चौथ्या दिवशी पहाटे पहाटे मित्राचा डॉ निलेशला फोन आला.
“आईला श्वास घेणास त्रास होत आहे. ताप खूप वाढला आहे. काय करू.”
डॉ निलेशने पुन्हा आपलं चलखत चढवलं आणि त्याच्या घरी गेला.
मित्राच्या आईची तपासणी केल्यावर त्याला समजले की तिची परिस्थिती अतिगंभीर आहे.
“रक्तातील ऑक्सिजन खूप कमी झाला आहे. शुगर चारशे वरती आहे.अर्जंट ऍडमिट करावे लागेल.”
डॉ निलेश बोलला.

“सरकारी हॉस्पिटलमध्ये नको. माझं मेडिक्लेम आहे. पंचतारांकित हॉस्पिटलमध्ये करेन” तो बोलला.
आईला ऍडमिट केल्यावर दुसऱ्या दिवशी परत त्याचा डॉ निलेशला फोन आला
” जाम लुटलं आहे तुम्ही डॉक्टर लोकांनी. अंबुलन्सचे आठ हजार घेतले. हॉस्पिटलमध्ये दोन महाग औषधे नव्हती. खूप कॉन्टॅक्ट लावले तेव्हा भेटली पाच पट दरात.आता आई थोडी बरी आहे”
” बर झालं आईच्या प्रकृतीत सुधारणा आहे. अरे अंबुलन्स डॉक्टरची नसते. तो स्वतंत्र व्यवसाय आहे. डॉक्टर हे अंबुलन्सवर कामाला असतात. शिवाय कोरोनाच्या साथीत त्यांनाही रिस्क आहेच की. सणासुदीला गावी आणि परगावी घेऊन जाणाऱ्या खाजगी वाहतुकीचे दर बघ. तिप्पट चौपट आहेत. आणि मित्रा कोरोनाची औषधे डॉक्टर विकत नाही. जे डॉक्टर कोरोनाने आजारी आहेत त्यानाही ती औषधे मिळाली नाहीत. त्याच ब्लॅक मार्केटिंग करणारे समाज भामटे आहेत.”
डॉ निलेशने शांतपणे सांगितले.
पुढील आठवडाभर मित्राची आई
आय.सी.यु हॉस्पिटलमध्येच सिरीयस होती. डॉक्टर वेळच्या वेळी अपडेट्स देत होते. पुढील काही दिवसात तिला डिस्चार्ज मिळाला. काही दिवसांनी मित्र डॉ निलेश भेटायला आला.
” निलेश, जाम लुटल रे डॉक्टरांनी. मेडिक्लेम तर पूर्ण संपला; वरती चाळीस हजार लागले. किती प्रचंड बिल ते.अरे मी कॉलनीच्या ‘भाऊ’ला घेऊन बिलात तोडपाणी केलं.हॉस्पिटलमध्ये राडाच करणार होतो. डॉक्टरांना सरळ केलं. आई वाचली हे नशीब.” तो बोलला.
आता डॉ निलेशचा पारा चढला.
“अरे मूर्खां, एक तर तुला फाईव्ह स्टार हॉस्पिटलमध्ये मेडिक्लेमच्या जीवावर सेवा पाहिजे होती. आई सिरीयस होती तर एकदम रडकुंडीला आला होतास. डॉक्टरांच्या पाया पडत होतास. आज आई बरी झाली की रंग बदलले. दुसरी गोष्टी ही मोठी
पंचतारांकित हॉस्पिटलस डॉक्टर लोकांची नाही आहेत. डॉक्टर तिथे पगारावर कामाला आहेत. जर बिलाचा प्रॉब्लेम असेल तर सदर हॉस्पिटलची रीतसर तक्रार सरकारकडे करा. हॉस्पिटलचे कोरोना उपचारासाठीचे दर ही सरकार नियंत्रित आहेत. बारा वर्षाच्या शिक्षणानंतर एक डॉक्टर तयार होतो. त्याला जीव वाचवल्याबदल मान नाही दिला तरी चालेल पण अपमान करू नका. उद्या डॉक्टर लोकांनी संप केला तर काय कराल.
स्वतः कुटुंबाचा जीव धोक्यात घालून आम्ही काम करतो आहोत. शंभरहुन अधिक तरुण डॉक्टर कोरोना मध्ये सेवा देताना शहीद झाले आहेत. सर्वसामान्य जनतेचा कोरोना मृत्यूदर तीन टक्के आणि कोरोना आजारात डॉक्टरांचा मृत्यू दर दहा टक्के आहे. तुला जर वाटते डॉक्टर ने लुटले आहे.तर माझ्याकडे परत येऊ नको. मी सुध्दा डॉक्टर आहे.”
“सॉरी निलेश, अरे तू तर देवमाणूस आहेस.तुझ्या मुळेच माझी आई वाचली. रात्री अपरात्री होम visit असो व कुठलीही मदत तू ती विनामूल्य देतोस.
अरे आमचे बरेच गैरसमज झाले आहेत कोरोना बाबत आणि डॉक्टरा बाबत. कारण आम्हाला ज्ञान देणारी व्हाट्सएप व फेसबुक विद्यापीठे या सर्व अफ़वा पसरवतात. आणि मीडिया त्यात आग लावते आणि भीती वाढवते. खर मी भोगलं आहे. आणि वाईट भोगल्या शिवाय सत्य समजत नाही. कोरोनाच शुल्लकीकरण करत मी बसलो आणि पश्चाताप झाला.पण आता आम्ही सामान्य जनतेने काय करायला हवे?”
त्याचे डोळे ओलावलेले होते.
” नितीन, आपण सर्वच भोगतोय. जाब विचारचा असेल तर ‘सिस्टीम’ ला विचारायला हवा. ‘डॉक्टर’ ला लुटारू म्हणून प्रॉब्लेम सुटणार नाही. फक्त रागाचं विकेंद्रीकरण होईल. आज भारतात सत्तर टक्के रुग्ण सेवा खाजगी क्षेत्र देत आहे. सरकारी यंत्रणा पुरेशी नाही आहे. वैद्यकीय शिक्षण हा बाजार झाला आहे. बदल हवा असेल तर सर्वांना प्रयत्न करायला हवेत.
सरकारी रुग्णालये,प्राथमिक आरोग्य सुविधा आणि सरकारी वैद्यकीय शिक्षण या गोष्टीसाठी आपण आपल्या प्रभागातील लोकप्रतिनिधीच्या मागे लागलं पाहिजे. जात,धर्म, भाषा,पैसा, पावर न पाहता फक्त सरकारी आरोग्य आणि शिक्षण या पायाभूत सुविधांकडे लक्ष देणार सरकार निवडून दिल पाहिजे. यासाठी आवर्जून मतदान केलं पाहिजे. मत हीच आपली ताकद आहे.” डॉ निलेशने बोलता पी पी ई किट चढवलं आणि निघाला.
“कुठे चाललास?” मित्राने विचारलं
“माझी सेवा शासन अधिग्रहित झाली आहे. पंधर दिवस कोरोना हॉस्पिटलमध्ये सलग ड्युटी आहे. मग पुढील पंधरा दिवस हॉटेल मध्ये qurantine. एक महिना क्लिनिक बंद.” डॉ निलेश बॅग भरता भरता बोलला.
“आणि या ड्युटी चा पगार, तुझं एवढया मोठ्या प्रॅक्टिसच नुकसान? घरी आई आणि पोराचं काय?” गहिवरून नितीन बोलला.
“शासन देईल तो पगार. डॉक्टर झालो त्याचवेळी रुग्णसेवेच कफन बांधलं होतं. आता मागे कसे हटणार” डॉ निलेश बोलला.
“अरे मी काय मदत करू का?”
नितीन डोळे पाणावून बोलला.
” अरे मित्रा,फक्त एकच कर. अफवा ह्या अफू पेक्षा जास्त नशा देणाऱ्या आणि समाजाची दशा करणाऱ्या आहेत; त्यापासून दूर रहा.
आणि आम्हा डॉक्टरांना ‘योद्धा’ नाही म्हटले तरी चालेल पण ‘लुटारू’ म्हणू नको. खूप जिव्हारी लागत रे.”
नितीनच्या डोक्यात आज लख्ख प्रकाश पडला होता. त्याच्या मनात समाजाने उभा केलेला डॉक्टर आता पुसला गेला होता. कोरोना विषयी योग्य समाज प्रबोधन करण्याचा चंग आता त्याने बांधला होता.
“सरहद पे जो वर्दी खाकी थी उसका रंग सफेद हुया” असे पुटपुटत नितीन ने आपल्या मित्राला सलाम केला.
डॉ सुरेश पाटील
मानसोपचार व मनोविकास तज्ञ
वसई विरार नालासोपारा
9987230222