कोविडचा सामना करण्यासाठी सर्व समाजघटकांच्या समन्वयाची गरज:दिलीप सोपल
बार्शीत भगवंत कोविड रूग्ण नातेवाईकांच्या सेवा केंद्राचा शुभारंभ
बार्शी: कोरोनाला अतिशय शांत आणि स्थिर मनाने घाबरून व गोंधळून न जाता सामोरे जाण्याची तयारी रूग्ण व त्याच्या नातेवाईकांनी ठेवावी. कोरोनाचा सामना करण्यासाठी सर्व समाजघटाकांच्या समन्वयाची गरज आहे असे मत माजी मंत्री दिलीप सोपल यांनी व्यक्त केले.

शहरातील अलिपूर रोडवरील रेणुका मंगल कार्यालयात कोविड रूग्णांच्या नातेवाईकांची निवास व भोजन व्यवस्था करणाऱ्या भगवंत मोफत सेवाकेंद्राच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते.
माजी मंत्री दिलीप सोपल व महाहौसिगचे माजी सहअध्यक्ष राजेंद्र मिरगणे यांनी स्वखर्चातून या संयुक्त उपक्रम सुरू केला आहे.यावेळी महाहौसिगचे माजी सहअध्यक्ष राजेंद्र मिरगणे, स्थानिक शिवसेना नेते भाऊसाहेब आंधळकर, उपविभागीय पोलीस अधिकारी अभिजीत धाराशिवकर, पोलीस निरीक्षक संतोष गिरीगोसावी, तहसिलदार सुनिल शेरखाने, प्रभारी तालुका आरोग्य अधिकारी अशोक ढगे, डॉ.संजय अंधारे, आय.एम.ए.चे बार्शी शखाध्यक्ष डॉ.प्रशांत मोहिरे,डॉ.स्नेहल माढेकर,अरुण कापसे आदी व्यासपिठावर उपस्थित होते.

राजेंद्र मिरगणे म्हणाले, हे सेवाकेंद्र २४ तास सुरू राहील. या सेवाकेंद्रात महिलांची स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. या सेवाकेंद्रात दररोज रूग्णांच्या नातेवाईकांना चहा, नाष्टा, व दोन वेळेस जेवण मोफत दिले जाणार आहे. तसेच रूग्णांनाही नातेवाईकांच्या मागणीनूसार सकस व पोषणमुल्ययुक्त आहार पुरविला जाणार आहे. या सेवाकेंद्रातील निवासी नातेवाईकांच्या ताप व ऑक्सीजनचीही तपासणी केली जाणार आहे. या सेवा केंद्रात प्राथमिक उपचारांसाठी परिचर व परिचारीकाही उपलब्ध असेल. जोपर्यंत कोविड रूग्णांची संख्या अत्यल्प होत नाही तोपर्यंत हे सेवाकेंद्र सुरू राहील. तसेच लवकरच कोविड रूग्ण व त्यांच्या नातेवाईकांना सर्व तोपरी मार्गदर्शन करणारी कंट्रोल रूम सुरू करणार आहोत. त्याचबरोबर कोविड रूग्णांच्या मदतीसाठी ऑक्सीजन अॅम्बुलन्स सुरू करणार आहोत असे मिरगणे यांनी सांगितले.
भाऊसाहेब आंधळकर म्हणाले, बार्शी तालुक्यात भासणारा ऑक्सीजनचा व रेमिडीसीवरचा तुटवडा चिंताजनक आहे.
रेमिडीसीवर इंजेक्शन आवश्यकतेनूसार रूग्णांना देण्यासाठी थेट डॉक्टरांनाच उपलब्ध करून द्यावेत. याबाबतचे अधिकार अन्य प्रशासनाला असू नयेत.
संजय डॉ.अंधारे म्हणाले, सध्याच्या कोरोनाचे स्वरूप भयानक असून त्याची प्रसार होण्याची क्षमता पुर्वीच्या
कोरोनापेक्षा तिप्पटीने वाढलेली आहे. त्यामुळे कोरोना बाधितांची संख्या वाढते आहे. अशा परिस्थितीमध्ये रूग्णांबरोबरचा संपर्क कालावधी नातेवाईकांनी अधिकाधिक कमी करावा. तसेच थेट डॉक्टर्स व अन्य वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्याही कमीतकमी संपर्कात नातेवाईकांनी यावे असे आवाहन त्यांनी केले.
अशोक डॉ.ढगे म्हणाले, कोरोनामुळे मृत्यु होण्याचे प्रमाण खुप कमी आहे. पण कोरोनाची भिती मात्र खुप वाढलेली
आहे. भितीमुळे मानसिकतेवर परिणाम होऊन मृत्यु होण्याची संख्या जास्त आहे. माध्यमांमधून चुकीची माहिती प्रसारित होत आहे. त्यामुळे नागरिकांनी कोरोनाची सखोल माहिती घ्यावी. अर्धवट ज्ञानामुळे त्रास होण्याची शक्यता आहे. कोरोना मनातून काढून टाकला तरच शरिरातून जाईल. त्यामुळे कोरोना प्रतिबंधात्मक सर्व उपाय पाळावेत मात्र नागरिकांनी घाबरू नये असे आवाहन त्यांनी केले.
सूत्रसंचालन राजा काकडे यांनी केले तर आभार नागेश अक्कलकोटे यांनी मानले.