काँग्रेस धावली शिवसेनेच्या मदतीला; सोनिया गांधींचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना फोन
शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यानंतर राज्याच्या राजकारणात मोठी उलथापालथ सुरू आहे.
मुबंई: शिवसेनेतील ४० आमदारांच्या बंडखोरीमुळे महाविकास आघाडी सरकार अडचणीत आले आहे. या बंडखोरीचा सर्वात जास्त फटका हा शिवसेनेला बसला आहे, त्यामुळे राज्यातील राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि काँग्रेस मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पाठिमागे ठामपणे उभा आहे. आज काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी यांनी उद्धव ठाकरे यांना फोन केला असल्याचे सांगण्यात आले आहे.

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधींनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना फोन केला असल्याचे सागंण्यात येत आहे. शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर राजकीय परिस्थितीबाबत चर्चा करुन काँग्रेस शिवसेनेच्या पाठीशी असल्याची भूमिका सोनिया गांधी यांनी व्यक्त केली असल्याचे सागण्यात येत आहे.
‘आम्ही शिवसेना सोडलेली नाही’

शिवसेनेच्या ४० पेक्षा जास्त आमदारांनी बंड केल्यामुळे महाविकास आघाडी सरकार अडचणीत आले आहे. दरम्यान गेल्या पाच दिवसापासून शिवसेनेचे आमदार गुवाहाटीमध्ये आहेत. सेनेचे ज्येष्ठ नेते दीपक केसरकर यांनी बंड केले आहे, त्यांनी आज माध्यमांशी संवाद साधला. ‘आम्ही अजुनही शिवसेनेत आहोत, अजुनही आम्ही शिवसेना सोडलेली नाही, असा दावा आमदार दीपक केसरकर यांनी आज केला.
दीपक केसरकर म्हणाले, सध्या सगळीकडे आम्ही शिवसेनेतून बाहेर पडलो अस जाणवले जात आहे, पण आम्ही शिवसेनेतून बाहेर पडलेलो नाही. आम्ही आजही शिवसेनेतच आहोत. आमच्याकडे बहुमत आहे, आम्हाला घाबरवण्याचा प्रयत्न करु नका. मंत्री एकनाथ शिंदे हेच आमचे नेते आहेत.
आम्हाला नोटीस पाठवून घाबरवले जात आहे, एकनाथ शिंदे आमचे गटनेते आहेत. शिवसेनेला राष्ट्रवादी काँग्रेसने हायजॅक केले आहे, दुसऱ्या कोणीही केलेले नाही, असंही ते म्हणाले. आम्हाला पाठवलेल्या नोटीसला आम्ही उत्तर देणार आहे. तर दुसरीकडे शिवसैनिकांना रस्त्यावर उतरवले आहे. मुख्यमंत्री कर्तव्यदक्ष आहेत, शिवसैनिकांनी मोडतोड करु नये, असंही केसरकर म्हणाले.
यावेळी केसरकर यांनी संजय राऊत यांना उत्तर दिले, उमेदवाराच्या नावावर अनेकजण निवडणूक लढतात.पाहू कोणाच्या नावावर मत मागायचे संजय राऊत यांचे बोलणे आम्ही गांभिर्याने घेत नाही, असंही केसरकर म्हणाले.