काळजी वाढली: बार्शी तालुक्यात शुक्रवार-शनिवार दोन दिवसात 48 कोरोना बधितांची वाढ
कोरोना नियमांची कठोर अंमलबजावणी करण्याची गरज
बार्शी : बार्शी शहर व तालुक्यातील मागील दोन-तीन महिन्यांत कमी झालेला कोरोना बधितांचा आकडा हा कमी झाला होता. मात्र मागील आठवड्यापासून हा आकडा हळूहळू वाढू लागला आहे.शुक्रवार व शनिवार या दोन दिवसात 48 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत.


यात बार्शी शहरात 30 तर ग्रामीण भागात 18 जणांचा समावेश आहे. वाढत्या रुग्ण संख्येच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी काळजी घेण्याची गरज आहे.मागील सहा दिवसातील शहर व तालुक्यातील एकूण पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा हा 69 एवढा आहे.
तालुक्यातील आतापर्यंतच्या बाधितांची एकूण संख्या 7 हजार 100 झाली आहे. बरे होऊन 6 हजार 773 जण घरी गेले आहेत. 210 जणांचा आत्तापर्यंत मृत्यू झाला आहे.
शहर व तालुक्यात रॅपिड अँटीजेन चाचण्याची संख्या देखील वाढवण्यात आली आहे. तालुक्यातील 117 जणांवर उपचार सुरू आहेत.बार्शी शहर मोठी व्यापारी पेठ असल्याने नागरिकांची मोठी गर्दी असते. नगरपालिका आणि पोलीस प्रशासनाने खबरदारी म्हणून विना मास्क फिरणारे नागरिक, दुकानात गर्दी करणारे व्यापारी यांच्यावर कारवाई करण्याची मोहीम उघडली आहे. तरी देखील कित्येक लोक विनामस्क फिरत आहेत. गर्दीच्या कार्यक्रमांचे आयोजन केले जात आहे. लग्न समारंभात कोरोना नियमाचे पालन केले जात नाही.