बार्शी : दि. २४ एप्रिल रोजी रात्री दहाचे सुमारास खानापूर रोड, सोमवार पेठ, बार्शी येथील आमच्या रहात्या बिल्डिंग समोरील रस्त्यावर, सुशांत पाटील, दिनेश देसाई, पवन इटकर, कालीचरण वस्ताद व इतर अन्य २० ते २५ लोकांचा बेकायदेशीर जमाव जमवून, त्यांचेकडील गाड्यांची मोठमोठ्याने रेस करुन, माझे चुलत भाऊ सोनू नायकोजी व आकाश नायकोजी व आम्हांस मोठमोठ्याने शिवीगाळी केली. तसेच त्यांचे हातातील कोयते, लोखंडी रॉड व लाकडी दांडके दाखवून, आम्हास जिवे ठार मारण्याची धमकी दिली. व आमच्या घरावर दगडफेक करुन, आमच्या घराच्या खिडक्यांच्या काचा फोडून नुकसान केले. तसेच आमच्या कुटुंबास जिवे मारण्याची धमकी दिली.
अशी फिर्याद, सागर भास्कर नायकोजी (वय ३३) रा. खानापूर रोड, सोमवार पेठ, बार्शी यांनी सुशांत पाटील, दिनेश देसाई, पवन इटकर, कालीचरण वस्ताद व इतर अन्य २० ते २५ जणांविरुध्द बार्शी शहर पोलिस ठाण्यात दिली आहे.

त्यानुसार भा.दं.सं. १८६० कलम १४३,१४७,१४८,१४९,४२७,५०४,५०६, महाराष्ट्र पोलीस अधिनियम, १९५१ कलम १३५ नुसार गुन्हा दाखल झाला आहे.