अयोध्या, ५ ऑगस्ट : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राम मंदिराच्या भूमिपूजनाचा सोहळा पार पडला आहे. पर्णकुटीत राहणाऱ्या रामलल्लाचे भव्य मंदिर उभं राहणार असल्याचं नरेंद्र मोदी यांनी यावेळी सांगितलं. भूमिपूजन झाल्यानंतर नरेंद्र मोदी यांनी उपस्थितांना संबोधित केलं. नरेंद्र मोदींनी यावेळी मला निमंत्रण देत या ऐतिहासिक क्षणाचा साक्षीदार होण्याचा मान दिल्याबद्दल विश्वस्त मंडळाचे आभार मानले. भूमिपूजनापूर्वी पंतप्रधानांनी हनुमान गढी मंदिरात पूजा केली आणि त्यानंतर वृक्षारोपणही केलं.

यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उपस्थितांना संबोधित केले. मोदी म्हणाले, माझे येथे येणे स्वाभाविकच होते. आज इतिहास रचला जात आहे. कन्या कुमारीपासून क्षीर भवानिपर्यंत, सोमनाथपासून काशी विश्वनाथपर्यंत, बोधगयेपासून अमृतसरपर्यंत, आणि लक्ष्यद्विपपासून लेहपर्यंत आज संपूर्ण भारत राममय आणि प्रत्येक मन दीपमय आहे. एवढेच नाही, तर “राम काज कीन्हे बिनु मोहि कहां विश्राम”, असे म्हणत, शतकांची प्रतीक्षा आज संपत आहे. राम जन्मभूमी आज मुक्त झाली आहे. अनेक वर्षे रामलला टेंटमध्ये होते. मात्र, आता भव्य मंदिर उभारले जात आहे, असे मोदी म्हणाले.
दरम्यान, कोरोना संसर्गामुळे राम मंदिर भूमिपूजन सोहळ्याला फारच मोजक्या लोकांना बोलवण्यात आलं होतं. यावेळी पंतप्रधान मोदींसह आरएसएसचे सरसंघचालक मोहन भागवत, उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि राज्यपाल आनंदीबेन पटेल हे देखील उपस्थित होते.


पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे:
राम आजही आमच्या मना-मनात वसलेले आहेत, ते आमच्या संस्कृतीचा आधार आहेत. आपल्या शास्त्रात असे म्हटले आहे की, संपूर्ण पृथ्वीवर रामासारखे दयाळू कोणी नव्हते. श्रीरामांचा सामाजिक संदेश आहे की, सर्व पुरुष आणि स्त्रिया समान आनंदी असाव्यात. प्रभू रामाने आम्हाला आमची कर्तव्ये पार पाडण्यास शिकवले आहे. जेव्हा-जेव्हा मानवाने रामाला स्वीकारले आहे तेव्हा-तेव्हा आपला विकास झाला आहे. प्रत्येकाच्या भावनांची काळजी आपण घेतली पाहिजे.
आपल्या स्वत:च्या मेहनतीने आत्मविश्वास व स्वावलंबी भारत निर्माण करायचा आहे. राम मंदिराची निर्मिती ही ऐतिहासिक घटना आहे. राम मंदिर म्हणजे इतिहासाचीच पुनरावृत्ती आहे आपण आपल्या मर्यादाचं दर्शन तेव्हाही घडवलं होतं जेव्हा सुप्रीम कोर्टाने आपला याविषयी ऐतिहासिक निर्णय दिला होता. पण रामाचं कार्य आहे म्हटल्यावर ते कार्य कसं मर्यादेत राहून पार पाडलं जातं हे देशवासियांनी जगाला दाखवून दिलं कोरोना व्हायरसमुळे भूमिपूजनाचा कार्यक्रम अतिशय सोशल डिस्टन्सिंग आणि मर्यादा पाळून पार पाडावा लागला. ऐतिहासिक क्षणाचा साक्षीदार झाल्याचा मला अभिमान आहे

अयोध्या राम मंदिरासाठी अनेक पिढ्यांनी प्रयत्न केले. स्वातंत्र्य आंदोलनासारखेच राम मंदिराचं आंदोलन होतं. रामाचं अस्तित्व मिटवण्याचे बरेच प्रयत्न झाले पण राम आजही आमच्या मनात वसतात. राम मंदिरासाठी बलिदान दिलेल्यापुढे नतमस्तक आहे