बार्शी : येथील गाडेगांव रोडवरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुलांच्या वस्तीगृहाच्या बाजूला गांजाची चोरुन विक्री होत असल्याची माहिती बार्शी पोलिसांना मिळाल्यावरुन वरिष्ठांच्या आदेशानुसार व मार्गदर्शनाखाली गुन्हेप्रकटीकरण शाखेचे प्रभारी स.पो.नि. ज्ञानेश्वर दत्तात्रय उदार यांनी व त्यांच्या सहकाऱ्यांनी कारवाई करत गांजा व रोख रक्कम असा मुद्देमाल जप्त केला.
दि. २५ एप्रिल २०२२ रोजी सायंकाळी सहाचे सुमारास केलेल्या कारवाईत, गाडेगांव रोड येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मुलांच्या वस्तीगृहाच्या बाजूला बसलेल्या, अल्ताफ मैनुद्दीन पठाण (वय ३२) रा. नागणे प्लॉट, गाडेगांव रोड, बार्शी याच्याकडे असलेल्या प्लॅस्टिकच्या गुलाबी रंगाच्या पिशवीत बेकायदेशिरपणे विक्रीसाठी बाळगलेला १ किलो ३७३ ग्रॅम वजनाचा अंदाजे ५७०० रुपये किंमतीचा गांजा, तसेच विक्री केलेल्या गांजाची रक्कम ३६३० रुपये रोख मिळून आली. पोलिसांनी सदर मुद्देमाल जप्त करुन आरोपीस ताब्यात घेतले.

स.पो.नि. ज्ञानेश्वर दत्तात्रय उदार यांनी फिर्याद दिल्यावरुन, पठाण विरुध्द गुंगीकारक औषधी द्रव्य आणि मनोव्यापारावर परिणाम करणारे पदार्थ अधिनियम १९८५ चे कलम ८(ब), २०(ब), २(अ) प्रमाणे बार्शी शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.