
माढा: तुरीच्या पिकांमध्ये बेकायदा बिगर परवाना अंमली पदार्थ गांजाच्या झाडांची लागवड करून जोपासना केल्याप्रकरणी माढा पोलिसांनी छापा टाकत बावी येथील दोन जणांवर कारवाई करत 6 लाख 69 हजार 500 रुपयांचा गांजा जप्त केला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, की माढा तालुक्यातील बावी येथे शेतात तुरीच्या पिकांमध्ये गांजा झाडाची लागवड करून जोपासना करत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिस उपअधीक्षक अभिजित धाराशिवकर यांच्या मार्गदर्शनाखाली माढा पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक अमुल कादबाने, पोलिस उपनिरीक्षक किरण घोंगडे, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक मारुती लोंढे, शेख, प्रकाश मांजरे, संदेश शिकतोडे, सुनील भोसले, पांडुरंग देशमुख, अंगद नलवडे यांच्या पथकाने छापा टाकला.,
त्यात बावी येथील संशयित आरोपी बंडू औदुंबर मोरे व जरिचंद विश्वनाथ कुंभार यांच्या शेतात तुरीच्या पिकांमध्ये बेकायदा बिगर परवाना मानवी मनावर व मेंदूवर परिणाम करणारे अंमली पदार्थ गांजाच्या झाडांची लागवड करून जोपासना करीत असल्याचे निदर्शनास आले.
या संशयित आरोपींनी 2 ते 5 फूट उंचीच्या 134 किलो वजनाच्या 6 लाख 69 हजार 500 रुपये किमतीच्या गांजा रोपांची जोपासना केली होती. तो गांजा जप्त करून पोलिसांनी एकास अटक केली आहे. तर एक जण फरार झाला आहे. याबाबत अधिक तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक अमुल कादबाने करीत आहेत.
