बॉलिवूडच्या प्रसिद्ध नृत्य दिग्दर्शिका सरोज खान यांचे हृदयक्रिया बंद झाल्याने मुंबई येथे निधन झाले. त्या 71 वर्षांच्या होत्या. काही दिवसांपूर्वी त्यांना श्वसनाला त्रास झाल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तिथे त्यांची कोविड चाचणीही घेण्यात आली होती. मात्र, ती चाचणी निगेटिव्ह आली होती.

सरोज खान यांचा जन्म 22 नोव्हेंबर 1948 रोजी मुंबई येथे झाला. त्यांचं खरं नाव निर्मला नागपाल असं होतं. त्यांनी आजवर 200 हून अधिक चित्रपटांचं नृत्य दिग्दर्शन केलं आहे. त्या आधी सहाय्यक नृत्यदिग्दर्शिका म्हणून काम करत. त्यांना 1974 मध्ये आलेल्या गीता मेरा नाम या चित्रपटापासून नृत्य दिग्दर्शक म्हणून प्रसिद्धी मिळाली.
बॉलिवूडमध्ये आजवर गाजलेल्या अनेक गाण्यांचं नृत्यदिग्दर्शन करण्याचं श्रेय सरोज यांचंच आहे. हवाहवाई, निंबुडा-निंबुडा, काटें नही कटते, एक दो तीन, डोला रे डोला अशी अनेक गाणी त्यांच्या नृत्य दिग्दर्शनामुळे प्रचंड गाजली. सरोज यांना 2007मध्ये आलेल्या जब वी मेट या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट नृत्य दिग्दर्शनाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता.


2002मध्ये देवदास या चित्रपटासाठी राष्ट्रीय पुरस्कार तसेच फिल्मफेअर पुरस्कार, तर 2006मध्ये गुरू या चित्रपटासाठी फिल्म फेअर मिळाला होता. 2001 मध्ये आलेल्या आशुतोष गोवारीकर दिग्दर्शित लगान या चित्रपटातील नृत्य दिग्दर्शनासाठी त्यांना अमेरिकन कोरिओग्राफी पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं.
सरोज खानने 2000 हून अधिक गाण्यांवर कोरिओग्राफ केले. सरोज खानचे खरे नाव निर्मला नागपाल होते हे फारच कमी लोकांना माहिती आहे. सरोजच्या वडिलांचे नाव किशनचंद साधू सिंह आणि आईचे नाव नोनी साधू सिंह आहे.
फाळणीनंतर सरोज खानचे कुटुंब पाकिस्तानमधून भारतात गेले. सरोजने वयाच्या अवघ्या तीन व्या वर्षी बाल कलाकार म्हणून चित्रपटांमध्ये काम करण्यास सुरवात केली. तिचा पहिला चित्रपट नझरना होता ज्यात तिने श्यामा नावाच्या मुलीची भूमिका केली होती.
