बिहारी नेत्यांमध्ये रोजगार उपलब्ध करून देण्याची ताकद नाही – रोहित पवार
राज्यात मागील चार महिन्यापासून सुरू असलेला लॉकडाऊन हळू-हळू शिथिल करण्यात येत आहे. त्याच बरोबर लॉकडाऊन दरम्यान आपल्या गावी परतणारे परप्रांतीय कामगार पुन्हा कामाच्या निमित्ताने मुंबईच्या दिशेने येऊ लागले आहे हाच मुद्धा पकडत आमदार रोहित पवारांनी बिहार नेत्यांवर निशाणा साधला आहे.

आमदार रोहित पवारांनी आपल्या फेसबुक वॉल वरून बिहारच्या नेत्यांना खडेबोल सुनावले आहेत . बिहारमधील नेत्यांमध्ये तेथील तरुणांसाठी रोजगार निर्माण करण्याची ताकद नसल्यामुळे त्यांना महाराष्ट्रात यावे लागत असल्याचे म्हटले आहे. इतरच नाही तर बिहारमधील नेत्यांनी एकमेकांवर टीका करण्यात जी शक्ती खर्च केली विकासावर केली असती तर चित्र वेगळे असते, असेही रोहित यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
वाचा रोहित पवारांची पोस्ट
महाराष्ट्रात गच्च भरुन येणाऱ्या विशेष ट्रेन पाहिल्या तर लॉक डाऊनच्या काळात स्वगृही गेलेले स्थलांतरित कामगार/मजूर यांनी पुन्हा महाराष्ट्रासारख्या विकसित राज्याची वाट धरल्याचं लक्षात येतं. वास्तविक लॉक-डाऊनच्या काळात महाराष्ट्राने त्यांना त्यावेळीही प्रेम दिलं होतं आणि आजही त्यांच्याप्रती सहानुभूतीच आहे. पण मोठ्या आशेने आपल्या मूळ गावी गेल्यानंतर शेवटी त्यांची भ्रमनिराशाच झाली, असं म्हणावं लागेल.

मी आज जाणीवपूर्वक या विषयावर लिहितोय की बिहारमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून विकास हा नावापुरताही कुठं दिसला नाही. बिहार सरकारने विकासाचं राजकारण करण्याऐवजी केवळ लोकांची दिशाभूल करण्याचंच काम केलं. ‘आधीच्या सरकारने केले नाही म्हणून आमच्याकडं हॉस्पिटल नाहीत’, असं एक वक्तव्य कोविड-१९ च्या काळात बिहारच्या उपमुख्यमंत्र्यांनी केल्याचं मी वर्तमानपत्रात वाचलं. एक सत्ताधारी मंत्री असं बोलतोय हाच एक मोठा विनोद आहे आणि अशा राजकीय वक्तव्यातूनच त्यांची विकासाची ‘दृष्टी’ दिसून येते.

बिहारमध्ये विकास झाला नाही, कामधंदा नाही, उद्योगधंदे नाहीत, म्हणून आम्हाला महाराष्ट्रासारख्या इतर राज्यात जाण्याची वेळ आल्याचं बिहारमधील अनेक लोक मला सांगतात. गेल्या काही दिवसांपासून मी बिहारमधील नेत्यांचं राजकारण पाहतोय पण ते काही विकासाच्या दिशेने सुरू आहे, असं वाटत नाही. एकमेकांवर टीकाटिप्पणी करण्यासाठी त्यांच्याकडून जी ताकद खर्च होते त्यातील काही टक्के जरी ताकद आणि वेळ विकासावर खर्च केला असता तर आज बिहारमधील युवांना उवजीविकेसाठी महाराष्ट्रासारख्या अन्य राज्यात जावं लागलं नसतं. तसंच विकसित भारताचं स्वप्नही साकार झालं असतं.
विकसित भारत म्हणजे केवळ महाराष्ट्र, दिल्ली, तमिळनाडू, पंजाब अशा मोजक्याच राज्यांचा विकास नसतो. तर प्रत्येक राज्याने त्यात आपलं योगदान देणं गरजेचं आहे. स्पर्धा ही विकासाची व्हायला हवी. पण महाराष्ट्रासारखी काही राज्ये विकासाचे नवनवीन प्रकल्प राबवत असताना बिहार मात्र त्यापासून कोसो मैल लांब आहे. तिथल्या कायदा-सुव्यवस्थेबाबत वर्तमानपत्रात अनेक रकानेच्या रकाने भरुन बातम्या मी वाचल्या आणि इथलेच राजकारणी इतर राज्यातील पोलीस यंत्रणेबाबत जेंव्हा बोलतात तेंव्हा हसू येतं.

बिहारी लोक खासकरून युवक हे कष्टाळू आणि चिवट आहेत. त्यांच्यात हुशारीही आहे, पण तरीही विकास का होत नाही ही विचार करण्यासारखी गोष्ट आहे. नेत्यांच्या कुरघोडीच्या राजकारणात युवा शक्तीची ताकद करपून जातेय. म्हणून माझं बिहारच्या युवांनाही आवाहन आहे की ही परिस्थिती बदलण्यासाठी त्यांनीच आता स्वतःहून पुढं यावं. तुमचा भविष्यकाळ तुम्हीच बदलू शकता, पण तुम्हीही फक्त पहात बसलात तर काही नेत्यांच्या फक्त सत्तेच्या राजकारणात तुमच्या उज्ज्वल भवितव्याचं स्वप्न कधी साकार होईल, हे कोणताही भविष्यकार सांगू शकणार नाही.