Big Breaking: पवार कुटुंबीयांची उद्या बारामतीत महत्वाची बैठक; वाचा सविस्तर-
14 ऑगस्ट : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आपला नातू पार्थ पवार यांच्यावर सार्वजनिकरित्या केलेल्या आक्रमक टीकेची महाराष्ट्राच्या राजकारणात मागील दोन दिवसांपासून मोठी चर्चा सुरू आहे. पक्षाच्या भूमिकेविरुद्ध मत मांडत असलेल्या पार्थ यांना शरद पवारांनी खडेबोल सुनावले. साहजिकच याचा परिणाम पक्षासोबतच पवार कुटुंबावरही झाल्याचं बोललं गेलं. पण हाच वाद आता सोडवण्यासाठी संपूर्ण पवार कुटुंब एकत्र येत चर्चा करणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अजित पवारांचे कुटुंबीय शनिवार आणि रविवारी बारामतीत एकत्र भेटणार असल्याची माहिती मिळते आहे.
अजित पवारांचे थोरले बंधू श्रीनिवास पवार यांच्या बारामतीच्या घरी पार्थसंबंधी पवार कुटुंबियांची एकञित बैठक होणार असल्याचं सांगितलं जातं आहे. त्यामुळे या बैठकीत काय चर्चा होणार आणि या सगळ्याबाबत अजित पवार नेमकी काय भूमिका घेतात, याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे.
खरंतर, विधानसभेच्या वेळीही श्रीनिवास पवार यांच्या मध्यस्थीनेच अजित पवार आणि शरद पवारांमध्ये समेट घडला होता. त्यामुळे यावेळीही पवार कुटुंबात पार्थवरून निर्माण झालेला तिढा श्रीनिवास पवारच सोडवणार का? हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे. दरम्यान, पवार कुटुंबाच्या या एकूण वादात संपूर्ण कुटुंब हे पहिल्यांदाच एकत्र येणार आहे.

एकीकडे, मुलगा पार्थ पवारच्या राजकीय भूमिकेवरून राष्ट्रवादीतच रणकंदन सुरू असतानाच दुसरीकडे पुण्यात मात्र अजित पवारांकडून दैनंदिन बैठकांचा धडका सुरूच आहे. पुणे कोरोनाची साप्ताहिक आढावा बैठक घेतली त्यानंतर ते सर्किट हाऊसला आले पण मीडियाचे कॅमेरे असल्याने त्यांनी मागच्या दाराने एन्ट्री करून माध्यमांना चकवा दिला. तिथं पीएमपीची बैठक तसंच पक्ष पदाधिकारी त्यांना भेटताहेत.
थोडक्यात घरात काही झालंच नाही अशा अर्विभावात अजित पवारांनी दिवसभर बैठका आणि भेटीगाठीचं सञं सुरूच ठेवलं आहे. तर दुसरीकडे पार्थ पवार मुंबईहून पुण्याकडे निघाल्याचं सांगितलं जात आहे.
अजित पवारांनी शरद पवारांवर व्यक्त केली नाराजी?
पार्थ प्रकरणावर चर्चा करण्यासाठी शरद पवार यांच्या निवासस्थानी त्यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, अजित पवार यांची बैठक झाली. या बैठकीदरम्यान पार्थ पवार यांच्याबाबतीत नेमकी काय चर्चा झाली, याबाबत राष्ट्रवादीकडून अद्याप अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. मात्र यावेळी अजित पवार यांनी मुलगा पार्थची बाजू सावरण्याचा प्रयत्न केल्याची माहिती आहे.
‘तो अजून लहान आहे, हळूहळू तयार होईल. मात्र त्याला असे सार्वजनिकरित्या खडेबोल सुनावणं योग्य नाही,’ अशा शब्दांत शरद पवार यांच्यासमोर अजित पवारांनी नाराजी व्यक्त केल्याचे समजते. याबाबत ‘लोकमत’ने वृत्त दिलं आहे.